कैकेयी (संस्कृत: कैकेयी ; थाई: Kaiyakesi, कैयाकेसी; ख्मेर: Kaikesi, कैकेसी ; बर्मी: Kaike, कैके ; भासा मलायू: Kekayi, केकायी ;) ही रामायणातील उल्लेखांनुसार अयोध्येचा राजा दशरथ याच्या तीन पत्नींपैकी दुसरी पत्नी व अयोध्येची राणी होती. ती केकय देशाच्या अश्वपति राजाची कन्या होती. दशरथापासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. भरतास अयोध्येचे राज्य मिळावे या हेतूने तिने आपला सावत्र मुलगा राम यास वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. कैकेयीस आधी दिलेल्या वरांच्या पूर्ततेसाठी दशरथाला कैकेयीची मागणी मान्य करावी लागली. परंतु पुत्रविरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे वाल्मिकीकृत रामायणात व त्यावर आधारलेल्या उत्तरकालीन साहित्यात कैकेयीचे स्वभावचित्रण खलनायकी छटेत केले गेले आहे.

रामाला वनवासास धाडावे या मागणीसाठी विलापाचे निमित्त करणारी कैकेयी व तिला सावरायाला येणारा दशरथ (चित्रकार: राजा रविवर्मा; इ.स. १८९५)