कृष्णा कल्ले (जन्म:१८ डिसेंबर, १९४० - १५ मार्च, २०१५) या एक मराठी सुगम संगीत गायिका होत्या. त्यांनी १९६० तसेच १९७० च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी, पंजाबी, गुजराती व शंभरहून जास्त मराठी गाणी गायली आहेत.[ संदर्भ हवा ]

कृष्णा कल्ले

कृष्णा कल्ले
आयुष्य
जन्म डिसेंबर १८, इ.स. १९४०
जन्म स्थान मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू १५ मार्च, २०१५ (वय ७४)
संगीत साधना
गायन प्रकार चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत, गझल
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन

जन्म आणि शिक्षण संपादन

कृष्णा कल्ले यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० मध्ये मुंबईत झाला. परंतु, वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे वास्तव्य कानपूरमध्ये होते. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते आणि आत्या तारा कल्ले या एक प्रथितयश गायिका होत्या. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण दरभंगा घराण्याचे रामसेवक तिवारी आणि रामपूर घराण्याचे अफझल हुसैन निझामी यांच्याकडे झाले. नंतर सुगम संगीताचे शिक्षण त्यांनी कानपूरचे युनुस मलिक यांच्याकडे घेतले.[ संदर्भ हवा ] महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक राष्ट्रीय स्तराच्या गायन स्पर्धांमध्ये पहिले स्थान पटकावले. कृष्णा कल्ले यांना १९५८ साली सैगल मेमोरिअलतर्फे होणाऱ्या गायन स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक व ‘गोल्डन व्हॉइस ऑॅफ इंडिया’ हा मानाचा किताब मिळाला.[ संदर्भ हवा ]

सांगीतिक कारकीर्द संपादन

कानपूरमध्ये शिक्षण पूर्ण करून, लग्नानंतर त्या १९६४ साली मुंबईमध्ये आल्या. कानपूरमध्ये त्या आकाशवाणीवर ‘अ’ श्रेणीच्या कलाकार होत्या. मुंबईमध्ये आल्यावर परत परीक्षा द्यावी लागेल का? हे विचारण्यासाठी त्या आकाशवाणी केंद्रावर गेल्या. त्या वेळी संगीत विभागाचे मुख्य यशवंत देव होते. कृष्णा कल्ले यांचा आवाज आवडल्यामुळे यशवंत देव यांनी त्यांच्या आवाजात मराठी गाणे ध्वनिमुद्रित करायचे ठरवले. आपल्याला मराठी अजिबात येत नाही, आपण फक्त हिंदीमध्ये गाऊ शकतो, असे कृष्णा कल्ले यांनी नम्रपणे सांगितले. पण यशवंत देव यांनी त्यांच्याकडून मराठी गाणे गाऊन घेण्याची संपूर्ण जबाबदारी उचलली आणि त्यांच्याकडून ‘मन पिसाट माझे अडले रे’ हे पहिले मराठी गाणे आकाशवाणीसाठी गाऊन घेतले.[ संदर्भ हवा ]

एच.एम.व्ही.ने कृष्णा कल्ले यांच्या स्वरात या गीतासह आणखी तीन गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. ही सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली. त्यानंतर वंदना विटणकर यांचे ‘परीकथेतील राजकुमारा’ हे गीत संगीतकार अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून गाऊन घेतले.[ संदर्भ हवा ]

संगीतकार दत्ता डावजेकर यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून ‘पडछाया’ या चित्रपटासाठी ‘उठ शंकरा सोड समाधी’ हे शास्त्रीय बैठक असलेले गीत गाऊन घेतले. श्रीनिवास खळे यांनी ‘मैना राणी चतुर शहाणी’सारखी सुंदर गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतली.[ संदर्भ हवा ] अशा सर्व मातब्बर संगीतकारांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी गीते गाऊन घेतली. मराठी मातृभाषा नसतानाही अनेक मराठी गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून त्या यशस्वी झाल्या.[ संदर्भ हवा ]

हिंदीतील संगीतकारांनीही कृष्णा कल्ले यांच्याकडून अनेक हिंदी चित्रपटांसाठी गीते गाऊन घेतली. जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांतही कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. कृष्णा यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मीनू पुरुषोत्तम, उषा तिमोथी आदी गायकांसोबतही गाणी गायली. त्यांनी ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, जयदेव, शंकर-जयकिशन, आदी संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांची १०-१२ वर्षांच्या काळात जवळपास ५०० गाणी ध्वनिमुद्रित झाली.[ संदर्भ हवा ]

त्यांना महाविद्यालयात असताना १९५६ ते १९६० च्या दरम्यान चित्रपट संगीताची कारकीर्द सुरू होण्याआधी डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते आकाशवाणीचे सुवर्णपदक, नभोवाणी मंत्री वसंत साठे यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी यांच्या हस्ते कानपूर येथील युवा महोत्सवात प्रथम पारितोषिक असे अनेक पुरस्कार मिळाले होते.[ संदर्भ हवा ]

कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी (कंसात संगीत दिग्दर्शकाचे नाव)[ संदर्भ हवा ] संपादन

  • अंतरंगी रंगलेले गीत (अनिल मोहिले)
  • अशा या चांदराती (विठ्ठल शिंदे)
  • अशी नजर घातकी बाई (श्रीनिवास खळे)
  • आईपण दे रे (श्रीनिवास खळे)
  • इथे मिळाली सागर-सरिता (हेमंत केदार)
  • ऊठ शंकरा सोड समाधी (दत्ता डावजेकर)
  • कशी रे आता जाऊ घरी (विठ्ठल शिंदे)
  • कामापुरता मामा (यशवंत देव)
  • कुणि काहि म्हणा (यशवंत देव)
  • कुंजात विहरतो सुगंध शिंपित (वीरधवल करंगुटकर)
  • गुपित मनिचे राया (एस्‌. मदन)
  • गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी (हृदयनाथ मंगेशकर)
  • चंद्र अर्धा राहिला रात्र (यशवंत देव)
  • चंद्रकळा रुक्मिणी नेसली (विश्वनाथ मोरे)
  • तांडा चालला रे गड्या (राम कदम)
  • तुझ्याचसाठी कितीदा (यशवंत देव)
  • तू अनश्वरातील अमरेश्वर (वीरधवल करंगुटकर)
  • तू अबोल हो‍उन जवळी मजला (श्रीनिवास खळे)
  • तू माझ्या स्वप्नांची कल्पना (ओम दत्ताराम)
  • देश हीच माता देश जन्मदाता, घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता (श्रीनिवास खळे)
  • नाचतो डोंबारी रं (राम कदम)
  • पत्र तुझे ते येता अवचित (बाळ चावरे)
  • परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का (अनिल मोहिले)
  • पुनवेचा चंद्रमा आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी (बाळ पार्टे)
  • फुलं स्वप्नाला आली गं (सुधीर फडके)
  • बिब्बं घ्या बिब्बं, शिक्ककाई गल्लीबोळातनं वरडत जाई (राम कदम)
  • मन पिसाट माझे अडले रे (यशवंत देव)
  • मीरेचे कंकण, भक्तीचे दर्पण, स्मरे ते रंगून, हरीनाम
  • मैना राणी चतुर शहाणी (श्रीनिवास खळे)
  • रामप्रहरी रामगाथा (श्रीनिवास खळे)

कृष्णा कल्ले यांनी गायिलेली हिंदी-पंजाबी-गुजराती गाणी[ संदर्भ हवा ] संपादन

  • आज जश्ने-खुशनसीबी है (हिंदी चित्रपट आलम आरा, सहगायिका चंद्राणी मुखर्जी आणि इतर)
  • आजा ले ले (पंजाबी चित्रपट -अज दी हीर)
  • ओ मेरे राजा (हिंदी चित्रपट -गरीबी हटाओ)
  • तेरा वादे पे वादा होता गया (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी, सहगायिका प्रीती सागर)
  • पाटणना चौकमां गरबो (गुजराती चित्रपट -गुणसुंदरीनो घर संसार, कोरस)
  • मेरी ह्सरतोंकी दुनिया (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी, सहगायक मोहम्मद रफी)
  • मेहंदी रचेगी (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी)
  • हाल ए दिल क्या करें (हिंदी चित्रपट -आतिश)
  • हीर जत्ती दा विलायती रांझा (पंजाबी चित्रपट -अज दी धार)
  • हीरनी दोरी हलरा दू (गुजराती चित्रपट -गुणसुंदरीनो घर संसार)

पुस्तक संपादन

कृष्णा कल्ले यांच्या जीवनावर 'गायिका कृष्णा कल्ले : एक कृतार्थ गानप्रवास' नावाचे पुस्तक वसुधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार आणि सन्मान[ संदर्भ हवा ] संपादन

  • जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते यूथ फेस्टिवल पुरस्कार
  • राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १९५७ मध्ये गायनासाठी पुरस्कार
  • १९५८ मध्ये अखिल भारतीय सुगम संगीताचे पहिले पारितोषिक
  • पी. सावळाराम प्रतिष्ठान आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘गंगा जमुना पुरस्कार’
  • अरुण दाते यांच्या आग्रहाखातर कृष्णा कल्ले यांनी १९६५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या गायन स्पर्धेत भाग घेतला आणि सेहगल मेमोरियलतर्फे देण्यात येणारा गोल्डन 'गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया'चा किताब मिळवला.
  • महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

संदर्भ संपादन

१.[१]

  1. ^ "कृष्णा कल्ले". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2022-07-24 रोजी पाहिले.

[१]

  1. ^ विभास, alka vibhas | अलका. "कृष्णा कल्ले| Krishna Kalle | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online". आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani. 2022-07-24 रोजी पाहिले.