कृष्ण गंगाधर दीक्षित
कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ कवी संजीव (एप्रिल १४, १९१४ - फेब्रुवारी २८, १९९५) हे मराठी कवी व गीतकार होते.
कृष्ण गंगाधर दीक्षित | |
---|---|
जन्म नाव | कृष्ण गंगाधर दीक्षित |
टोपणनाव | कवी संजीव |
जन्म |
एप्रिल १४, १९१४ वांगी, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू |
फेब्रुवारी २८, १९९५ सोलापूर |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
वडील | गंगाधर गोविंद दीक्षित |
जीवन
संपादनकवी संजीवांचा जन्म एप्रिल १४, १९१४ रोजी महाराष्ट्रात सोलापुराजवळील 'वांगी' या गावी झाला. लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बॉंबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले.
संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे संजीवांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली.
कारकीर्द
संपादनप्रकाशित साहित्य
संपादननाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
अत्तराचा फाया | कवितासंग्रह | १९७९ | |
आघात | कवितासंग्रह | १९८६ | |
गझलगुलाब | कवितासंग्रह | १९८० | |
देवाचिये द्वारी | कवितासंग्रह | १९८६ | |
दिलरुबा | कवितासंग्रह | १९३५ | |
प्रियंवदा | कवितासंग्रह | १९६२ | |
माणूस | कवितासंग्रह | १९७५ | |
रंगबहार | कवितासंग्रह | १९८३ |
चित्रपट
संपादनवर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | सहभाग |
---|---|---|---|
१९५७ | चाळ माझ्या पायात | मराठी | गीतरचना |
१९६७ | पाटलाची सून | मराठी | गीतरचना |
१९५७ | भाऊबीज | मराठी | गीतरचना |
१९५६ | सासर माहेर | मराठी | गीतरचना |
कृ.गं. दीक्षित यांनी लिहिलेली व गाजलेली गीते
संपादन- अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; लावणी)
- असा कसा खट्याळ तुझा (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; लावणी)
- आवाज मुरलीचा आला (भावगीत; गायिका - माणिक वर्मा; संगीत दिग्दर्शक - डी.यू. कुलकर्णी)
- कधी शिवराय यायचे (चित्रपट - थोरातांची कमळा; गायिका - उषा मंगेशकर; संगीत दिग्दर्शक - दत्ता डावजेकर)
- खुलविते मेंदी माझा रंग (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; राग - भैरवी)
- चाळ माझ्या पायात (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; लावणी)
- झुळझुळे नदी ही बाई (चित्रपट - थोरातांची कमळा; गायिका - उषा मंगेशकर, मीना खडीकर; संगीत दिग्दर्शक - दत्ता डावजेकर)
- तो शूरपणा आता रणात कसा नाही। इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही।। (कविता)
- पडला पदर खांदा तुझा (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; लावणी)
- वेड्या बहिणीची रे वेडी (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते)