एचएमएस करेजस (५०)
एच.एम.एस. करेजस (५०) ही रॉयल नेव्हीची विमानवाहू नौका होती. ही नौका १९१६मध्ये क्रुझर रूपात बांधली गेली होती आणि १९२४मध्ये तिचे रूपांतर विमानवाहू नौकेत करण्यात आले. करेजस प्रकारच्या क्रुझरांपैकी पहिली असलेल्या या नौकेवर २६ तोफा होत्या आणि हीचे चिलखतही फारसे फक्कम नव्हते. पहिल्या महायुद्धात या नौकेने मुख्यत्वे उत्तर समुद्रात गस्त घालण्याची कामगिरी बजावली तसेच हेलिगोलॅंडच्या दुसऱ्या लढाईतही भाग घेतला. हे युद्ध संपल्यावर करेजसला निवृत्ती देण्यात आली परंतु १९२४मध्ये हीची विमानवाहू नौका म्हणून पुनर्बांधणी करण्यात आली. यावर इतर शस्त्रांशिवाय ४८ विमाने ठेवण्याची क्षमता होती. उरलेला काळ ही नौका ग्रेट ब्रिटन व आयर्लंडजवळच्या समुद्रात गस्त घालीत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस जर्मन पाणबुडी यु-२९ने करेजसवर टोरपेडोने हल्ला करून तिला बुडविले. नौकेबरोबर त्यावरील ५००पेक्षा अधिक खलाशी, सैनिक व अधिकारी समुद्रात बुडाले.