एकादशी
एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत) प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा० ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादश्यांच्या बाबतीत होत नाही.
कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या पाठोपाठ दोन एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्ल पक्षातल्या, तर दुसरे कृष्ण पक्षातल्या एकादशीचे आहे). :
हिंदू महिना (इंग्रजी) | पालक देव | शुक्लपक्षातली एकादशी | कृष्णपक्षातली एकादशी |
---|---|---|---|
चैत्र (मार्च–एप्रिल) | विष्णू | कामदा एकादशी | वरूथिनी एकादशी |
वैशाख (एप्रिल–मे) | मधुसूदन | मोहिनी एकादशी | अपरा एकादशी |
ज्येष्ठ (मे–जून) | त्रिविक्रम | निर्जला एकादशी | योगिनी एकादशी |
आषाढ (जून–जुलै) | वामन | शयनी एकादशी | कामिका एकादशी |
श्रावण (जुलै-ऑगस्ट) | श्रीधर | पुत्रदा एकादशी | अजा एकादशी |
भाद्रपद (ऑगस्ट–सप्टेंबर) | हृषीकेश की वामन? | परिवर्तिनी एकादशी/पद्मा एकादशी | इंदिरा एकादशी |
आश्विन (सप्टेंबर–ऑक्टोबर) | पद्मनाभ | पाशांकुशा एकादशी | रमा एकादशी |
कार्तिक (ऑक्टोबर–नोव्हेंबर) | दामोदर | प्रबोधिनी एकादशी | उत्पत्ती एकादशी |
मार्गशीर्ष (नोव्हेंबर–डिसेंबर) | केशव | मोक्षदा एकादशी | सफला एकादशी |
पौष (डिसेंबर–जानेवारी) | नारायण | पुत्रदा एकादशी | षट्तिला एकादशी |
माघ (जानेवारी–फेब्रुवारी) | माधव | जया एकादशी | विजया एकादशी |
फाल्गुन (फेब्रुवारी–मार्च) | गोविंद | आमलकी एकादशी | पापमोचिनी एकादशी |
अधिक मास (३ वर्षांतून एकदा) | पुरुषोत्तम | कमला एकादशी | कमला एकादशी |
महिना-शुक्लपक्ष; कृष्णपक्ष
संपादन- चैत्र - कामदा; वरूथिनी
- वैशाख - मोहिनी; अपरा
- ज्येष्ठ - निर्जला/पांडव/भीमसेनी; योगिनी
- आषाढ - शयनी; कामिका
- श्रावण - पुत्रदा; अजा
- भाद्रपद - परिवर्तिनी/पद्मा; इंदिरा
- आश्विन - पाशांकुशा; रमा
- कार्तिक - प्रबोधिनी/देवउठणी; उत्पत्ती एकादशी, उत्पन्ना एकादशी, देवी एकादशीचा प्रकटदिन
- मार्गशीर्ष - मोक्षदा; सफला
- पौष - पुत्रदा; षट्तिला
- माघ - जया; विजया
- फाल्गुन - आमलकी; पापमोचनी
अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते. (पर्यायी नावे - पहिली पद्मिनी, दुसरी परम)
पर्यायी नावे
संपादन- अजा एकादशी : अन्नदा एकादशी
- आमलकी एकादशी : फाल्गुन शुक्ल एकादशीला काशीमध्ये रंगभरी/रंगभरनी/रंगभरणी एकादशी म्हणतात. ह्या दिवशी बाबा विश्वनाथाचा विशेष श्रृंगार होतो आणि काशीमध्ये होळीच्या पर्वकालाचा प्रारंभ होतो. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. जे लोक आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाहीत, त्यांनी या दिवशी आवळा सेवन केला पाहिजे, असे सांगितले जाते. या एकादशीला विष्णूची पूजा फलदायी मानली जाते. मथुरा येथे रंगभरनी एकादशी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.
- उत्पत्ती एकादशी : उत्पन्ना एकादशी
- (अधिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातली) कमला एकादशी : पद्मिनी एकादशी
- (अधिक महिन्यातल्या कृष्ण पक्षातली) कमला एकादशी : परम एकादशी
- जया एकादशी : भैमी/भौमी एकादशी, भीष्म एकादशी (कर्नाटकात)
- निर्जला एकादशी : पांडव एकादशी, भीमसेनी एकदेशी. या दिवशी गायत्री जयंती असते.
- परिवर्तनी एकादशी : पार्श्व एकादशी
- पुत्रदा एकादशी : पवित्रोपना एकादशी
- (पौष महिन्यातील) पुत्रदा एकादशी : पौष पुत्रदा एकादशी
- (श्रावण महिन्यातली) पुत्रदा एकादशी : श्रावण पुत्रदा एकादशी
- प्रबोधिनी एकादशी : देव उत्थान एकादशी; देवउठणी एकादशी
- मुख्य एकादशीनंतर जर दुसऱ्या दिवशीही एकादशी असेल तर तिला गौण एकादशी किंवा वैष्णव एकादशी म्हणतात. उदा० गौण जया एकादशी, वैष्णव जया एकादशी, वगैरे.
एकादशीचे धार्मिक महत्त्व
संपादनआषाढ शुद्ध एकादशीला नुसते आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला नुसते कार्तिकी असे म्हणायची रूढी आहे.
आषाढी एकादशी
संपादनआषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णू झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ला होतो व कार्तिक शुक्ल ११ला संपतो. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात. चातुर्मासात जैन साधू गावोगावी न जाता एकाच देरासरात स्थानकवासी होतात.
चातुर्मासाचे शुद्ध नाव चतुर्मास आहे. पण चातुर्मास म्हणायची पद्धत आहे.
आषाढ शुद्ध एकादशीच्या एक-दोन दिवस आधी येणाऱ्या नवमीला महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणतात.
कार्तिकी एकादशी
संपादनदेवउठणी एकादशी. प्रबोधिनी एकादशी. या दिवशी, आषाढी एकादशीला शेषशायी झालेले विष्णू भगवान जागे होतात. कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाह सुरू होतात, ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी करता येतात. पंढरपूरची यात्रा या दिवशी संपते.
एकादशीची व्रते व उपवास
संपादनएकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.
१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..
२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.
३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.
४. एकादश्या जर दोन असतील तर भागवत आणि स्मार्त असे दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.
५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.
६. पक्षात पहिल्यांदा येणाऱ्या (स्मार्त) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.
७, एकादशी हा अनेकांचा उपासाचा दिवस असतो. हा उपवास द्वादशीला सोडतात. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथिवासर/हरिवासर) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. हा तिथिवासराचा काळ संपल्यानंतरच उपास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.
सूर्योदयापूर्वीच तिथिवासर संपले असेल तर पंचांगात तसे लिहिण्याची गरज नसते. अश्यावेळी सूर्योदयानंतर केव्हाही उपवास सोडता येतो.
एकादशी या विषयावरील मराठी पुस्तके
संपादन- एकादशी (श्रीपाद सातवळेकर)
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |