आळंदी
आळंदी (देवाची) हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.[१]महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे
ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व
संपादनसंत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० (की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.
आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते.[२] या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. (चित्र पहा.)
इतिहास
संपादनचांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.[३]
आळंदी माहात्म्य
संपादनआळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन माहात्म्ये आहेत. मात्र, ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही.
स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे. १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते.
‘अलका माहात्म्य’ नावाचे दुसरे हस्तलिखितही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे. यामध्ये ४६ पाने असून संतकवी बालमुकुंद केसरी या ग्रंथाचे लेखक आहेत. एकूण श्लोकसंख्या १३३ असून यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन-अलकावति-अलका या नावाने आहे. तर, इंद्रायणी नदीचा ‘कौबेरास्य महानदी’ म्हणजे कुबेरगंगा असा उल्लेख आहे. हे संतकवी १६ व्या शतकातील असावेत.
‘ज्ञानलीलामृत’ हा कवी सदाशिव यांनी आळंदी माहात्म्य कथन करणारा मराठी ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. हे हस्तलिखित आळंदीकरांनी ‘बापरखुमादेवीवरू’ मासिकाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते. त्यातील बराचसा भाग मासिकातून क्रमश: प्रसिद्धही झाला होता. मात्र तो ग्रंथरूपात आलेला नाही. या ग्रंथाचे संक्षिप्त रूपांतर चित्रशाळा प्रेसने नोव्हेंबर १९६५ मध्ये प्रसिद्ध केले होते.
एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी यांनी ‘आमची आळंदी’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. यामध्ये १८ अध्याय असून सुमारे दोनशे ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरिना ग्लुश्कोव्हा यांनी पाहिले होते. या ग्रंथाची हाताने लिहिलेली नकल प्रत डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या संग्रहातून मराठी हस्तलिखित केंद्राकडे आली आहे.
आळंदी मधील धर्मशाळेच वेगळे वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे वारकरी सांप्रदायिक धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या शिकाऊ विद्दार्थी वर्गाला शिक्षणसाठी विनामूल्य सोय करणे होय.
काय बघाल?
संपादनआळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे :-
- माऊलींच मंदिर
- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी कडे जाणारा नंदी खालील भुयारी मार्ग.
- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी पुर्वी पासुनचे स्वयंभु शिवलिंग. ( शिव पिठ हे जुनाट -- संत एकनाथ महाराज. )
- वारकरी शिक्षण संस्था ,आळंदी .वै.ह.भ. प. मारुती बुवा गुरव ,मामासाहेब दांडेकर ,इ. च्या प्रयत्नातून वै. ह भ प जोग महाराज यांनी सदर संस्था स्थापन केली.
- इंद्रायणी नदी
- कृष्ण मंदिर
- मुक्ताई मंदिर
- राम मंदिर
- विठ्ठल रखुमाई मंदिर
- स्वामी हरिहरेंद्र मठ
- छत्रपती संभाजी महाराज समाधी, तुळापूर
चित्रदालन
संपादन-
संत ज्ञानेश्वर मंदिर
-
आळंदीतील सिद्धीविनायक मंदिर
-
प्रवेशद्वार
-
आतील दृश्य
-
नदी
-
स्तंभ
-
आळंदीचे अजून एक दृश्य
-
स्वामी नरसिंह सरस्वती मूर्ती, आळंदी
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ author/lokmat-news-network (2021-06-26). "शिक्षणसंस्था चालविणे फार जिकिरीचे : मोहिते-पाटील". Lokmat. 2021-07-01 रोजी पाहिले.
- ^ ऑनलाईन, सामना (2024-04-18). "आळंदी मंदिरातून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 29 जूनला प्रस्थान, पालखी सोहळा दिंडी समाज बैठकीत निर्णय" (इंग्रजी भाषेत). 2024-06-27 रोजी पाहिले.
- ^ http://www.maharashtra-tourism.com/pilgrimage/alandi.htm