आयझॅक आसिमॉव्ह (रशियन: Айзек Азимов, Исаак Юдович Озимов ; इंग्रजी: Isaac Asimov, Isaak Yudovich Ozimov ;) (जानेवारी २, इ.स. १९२० - एप्रिल ६, इ.स. १९९२) हा इंग्लिश भाषेत विज्ञान कथा लिहिणारे अमेरिकन लेखक व बॉस्टन विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.

आयझॅक आसिमॉव्ह

चरित्र

संपादन

आसिमॉव्ह यांचा जन्म ४ ऑक्टोबर इ.स. १९१९ आणि २ जानेवारी इ.स. १९२० दरम्यान रशियातील एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मतारखेबद्दल ग्रेगरियन आणि हिब्रू कॅंलेंडर यातील वादामुळे निश्चित माहिती नाही. आयझॅक स्वतः त्यांचा जन्म २ जानेवारीचा मानून त्या दिवशी वाढदिवस साजरा करीत. आई-वडील नेहमी इंग्लिश आणि यिडीश भाषेत बोलत असल्याने आयझॅक यांना रशियन भाषा येत नव्हती.

आयझॅक ३ वर्षांचे असतांना आसिमॉव्ह कुटुंब अमेरिकेत स्थाईक झाले. वयाच्या ५ व्या वर्षी आयझॅकने शिकण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी इंग्लिश आणि यिडीश भाषांवर प्रभुत्व मिळविले. लहान वयातच आयझॅक यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण झाली. या विषयाचे पुस्तके मिळवून ते वडिलांच्या मनाविरूद्ध वाचीत असत. वयाचा ११व्या वर्षी आयझॅकने लिखाण सुरू केले तर वयाच्या १९व्या वर्षापर्यंत त्यांचे लिखाण मासिकांमध्ये छापून येण्यास सुरुवात झाली. त्यांचे शालेय शिक्षण न्यू यॉर्क पब्लिक स्कूलमध्ये झाले.. १९३९ साली त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केले. आसिमॉव्ह हे जीवरसायनशास्त्र आणि भौतिकरसायन या दोन विषयात पीएच.डी. होते तर १४ विविध विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली होती. त्याशिवाय अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा वेळोवेळी पुरस्कार देऊन सत्कार केला होता. नुकतेच (इ.स. २००९ साली) आसिमॉव्ह यांच्या सन्मानार्थ मंगळ ग्रहावरील एका विवराला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या आसिमॉव्ह यांनी खगोलशास्त्र, जीवशास्त्र, गणित, अमेरिकेचा इतिहास, पुराणकथा, भयकथा, गूढकथा, लघुकथा, निबंध अशा विविध विषयांवर ५१५हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या १९ पुस्तकांची सुजाता गोडबोले यांनी केलेली मराठी भाषांतरे www.arvindguptatoys.com या संकेतस्थळावर आहेत.

एप्रिल ६ इ.स. १९९२ रोजी आयझॅक आसिमॉव्ह यांचे हृदयविकाराने आणि मूत्रपिंडातील दोषामुळे निधन झाले.

बाह्य दुवे

संपादन