अच्युत पुरुषोत्तम कानविंदे

अच्युत पुरुषोत्तम कानविंदे (९ फेब्रुवारी, इ.स. १९१६ - २८ डिसेंबर, इ.स. २००२) हे भारतातील आधुनिक वास्तुशिल्पकलेचे भीष्माचार्य होते.[१].

जन्म आणि शिक्षणसंपादन करा

अच्युत पुरुषोत्तम कानविंदे यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा या गावी झाला. कलेचा वारसा त्यांनी आपल्या चित्रकार वडिलांकडून घेतला होता. उत्तम रेखाटन, चित्रकलेची हातोटी, विचारांची झेप व त्याला कल्पकतेची जोड हे सर्व पूरकच ठरले. कलाशिक्षणाकरिता आशियात प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील सर ज. जी. कला महाविद्यालयाच्या वास्तुकला विभागात १९३६ साली त्यांनी प्रवेश घेतला. चार वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा कोर्स त्याच वर्षी सुरू झाला होता. शिक्षण संपल्यावर सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या वास्तुकलेचे मुख्य अध्यापक प्रा. क्लॉड बॅटले यांनी कानविंदे यांना शिफारसपत्र दिले. ते घेऊन ते इंग्लिश वास्तुविशारद डब्ल्यू.डब्ल्यू. वुड्स यांच्याकडे नवी दिल्लीला पोहोचले व पुढे तेथेच स्थायिक झाले.[२]

कारकिर्दसंपादन करा

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान तंत्रज्ञान संशोधनाचे धोरण आखण्यात येत होते.[३] ‘वैज्ञानिक प्रयोगशाळे’च्या अभ्यासासाठी कानविंदे यांची निवड करण्यात आली. शिष्यवृत्ती देऊन १९४६ साली त्यांना हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइन’ येथे उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात आले. कानविंदे यांनी प्रवेश घेतला तेव्हा दुसर्‍या महायुद्धानंतर आधुनिक वास्तुकलेवर मंथन चालू होते. अवकाशाची संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगीकरण यांवर आधारित वास्तुकला मूर्तरूप घेत होती. अशा समकालीन विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडणे क्रमप्राप्तच होते. प्रसिद्ध वास्तुविशारदांचे विविध प्रकल्प अमेरिकेत उभे राहत होते. त्यांच्या हाताखाली मिळत असलेल्या शिक्षणाचा त्यांना फायदा झाला. अनेक नावाजलेले वास्तुविशारद-अध्यापक तेथे शिकवीत. हुषार व तल्लख विद्यार्थ्यांचा संचच तयार झाला होता. त्यात आय.एम. पाय, पॉल रूडॉल्फ यांसारखे विद्यार्थी कानविंदे यांचे वर्गबंधू होते. शेवटच्या वर्षाचे अध्यापक मार्सल ब्रुअर यांनी कानविंदे यांना प्रवेश देताना अट घातली, ‘‘तुझे काम समाधानकारक झाले नाही, तर खालच्या वर्गात जावे लागेल.’’ पण कानविंदे यांची आकलनशक्ती, रेखाटनावरील प्रभुत्व व कल्पकता यांमुळे त्यांना मागे पाहावे लागले नाही. हार्वर्डमधून शिक्षण संपवून ते परतले व ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ या वैज्ञानिक संशोधनाच्या शिखर संस्थेमध्ये प्रमुख वास्तुविशारद म्हण्ाून रुजू झाले. या संस्थेची दिल्लीतील कार्यालयाची इमारत, रूरकी येथील संशोधन संस्थेचे संकुल, पिलानी येथील केंद्रीय इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संस्थेची रचना, या सर्वांच्या संकल्पना त्यांच्यावर सोपविण्यात आल्या. हार्वर्डमधील शिक्षणाचा प्रभाव त्यांच्या सुरुवातीच्या कामावर दिसू लागला. पुनरुज्जीवित विचारांवर आधारलेल्या वास्तुकलेपासून पुढे जाऊन आधुनिक व समकालीन विचारांवर संकल्पलेले स्थापत्य उभे राहिले पाहिजे. त्यात नवे-नवे प्रयोग व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग इमारतींच्या मांडणीवर दिसावयास हवा, असे त्यांना वाटे. १९५३ साली नवी दिल्लीतील ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन’ (आझाद भवन)च्या इमारतीची वास्तुरचना त्यांनी तयार केली. या संकल्पनेवर बाहाउस विचारसरणीवर आधारलेली उपयुक्तता, मूलभूत आकार, अवकाशाची योजना या सर्व घटकांचा आविष्कार निश्चितच आहे. उपलब्ध तंत्रज्ञान व पारंपरिक प्रतीकांचा सुंदर मेळ या वास्तूमध्ये दिसून येतो.

व्यवसायसंपादन करा

१९५६ साली समविचारांचे स्थापत्य अभियंता शौकत राय[४] हे त्यांचे ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च’मधील सहाध्यायी होते. त्या दोघांनी मिळून स्वतंत्र व्यवसाय करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे दोघेही निवृत्त होईपर्यंत त्यांनी बरोबरीने खांद्याला खांदा लावून सहकार्याने काम केले व वास्तुविशारदांच्या व्यवसायात नावलौकिक मिळविला. १९६०-१९७० या दशकातील कामांवर पूर्वीच्या विचारांचा प्रभाव जाऊन त्यांना त्यांची स्वतःचीच ओळख झाल्याचे जाणवू लागले. या काळात त्यांच्या संकल्पनांमध्ये परिवर्तन झाल्याचे दिसून आले. डॉ.विक्रम साराभाई व उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांच्याबरोबर झालेल्या ओळखीमुळे अहमदाबाद येथील ‘अहमदाबाद टेक्स्टाइल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन’ व ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’ यांसारखे प्रकल्प त्यांच्या संयोजनातूनच उभे राहिले. या प्रकल्पांच्या संकल्पनेवर ग्रेपियस यांच्या विचारांचा प्रभाव असला, तरी त्यांत अनुकरण दिसत नव्हते.

उभारलेले प्रकल्पसंपादन करा

त्याच सुमारास जगप्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद ल कॉर्ब्युझिए यांची पंडित नेहरूंनी चंदिगड उभारण्यासाठी निवड केली. त्यांची बरीच कामे पुढे भारतात इतरत्रही चालू झाली. यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी कानविंदे यांना मिळत गेली. कॉर्ब्युझिए यांचे अहमदाबादमध्ये काही प्रकल्प चालले होते, त्या सुमारास तेथेे कानविंदे यांचे प्रकल्पसुद्धा चालू होते. एकदा त्यांच्या ‘अहमदाबाद टेक्स्टाइल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन’ (अटिरा) या प्रकल्पाला ल कॉर्ब्युझिए यांनी भेट दिली व त्या संकल्पनेबाबत अनुकूल प्रतिसाद दिला. १९६० साली ललित कला अकादमीने स्वतंत्र भारतातील वास्तुकला, नागरीकरण व नगररचनांच्या विकासाविषयी विचारमंथन करण्याकरिता परिसंवादाचे आयोजन केले होते. त्याला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, शिक्षणक्षेत्रातील मान्यवर, शास्रज्ञ, विचारवंत, वास्तुविशारद व नगररचनाकार हे उपस्थित होते. काही परदेशी तज्ज्ञही आले होते. त्या परिसंवादात कानविंदे यांनी पुनरुज्जीवन व गतकाळातील वास्तुकलेवर जोर न देता, नवीन विचारांची झेप व प्रगती आणि आधुनिकतेकडे असलेली त्यांची मते समर्थपणे मांडली. त्याची दखल विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी घेतली. या विचारांकडे कानपूर आय.आय.टी.चे डायरेक्टर डॉ.पु.का. केळकर यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी आपल्या नवीन शैक्षणिक संकुलाचे काम कानविंदे यांच्याकडे सोपविले. हा प्रकल्प फलद्रूप होण्यामागे या दोघांमधील सामंजस्य व राष्ट्र उभारण्याच्या कार्यावरील निष्ठा कारणीभूत ठरली. कॅम्पस डिझाइनचा हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा पहिला प्रकल्प. एक्स्पोझ्ड कॉंक्रीट व जवळच उपलब्ध असलेल्या विटांचा अप्रतिम मेळ घालून प्रमाणबद्ध वास्तुशिल्पकलेचा उच्चांक त्यांनी गाठला. यातून आधुनिक भारताची प्रतिमा उभी करण्यात ते यशस्वी झाले. यानंतर त्यांनी पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बॅंक मॅनेजमेंट’ व ‘नॅशनल इन्श्ाुरन्स अकॅडमी’ या संस्थांची संकुले, असे महत्त्वाचे प्रकल्प उभे केले. या अनुभवावर त्यांनी ‘कॅम्पस डिझाइन इन इंडिया’ हा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. दूध उत्पादन क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्त्व डॉ.कुरियन यांच्या मेहसाणा व आणंद येथील प्रकल्पाचे काम हा त्यांच्या वास्तुकला जीवनातील फार महत्त्वाचा टप्पा होता. त्यांनी दूध डेअरीतील कामाची मांडणी, वायुविजनासाठी उंच मनोरे यांचा कौशल्यपूर्ण उपयोग यात केला. अहमदाबाद येथील बाळकृष्ण हरिवल्लभदास यांचे घर, राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बंगलोर येथील कृषी विद्यापीठ, मुंबई व दिल्ली येथील नॅशनल सायन्स सेंटर,[५] शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, ‘इस्कॉन[६]करिता दिल्लीतील मंदिर व वैदिक संस्था, ट्रान्स यमुना एरिया, (दिल्ली) येथील शहररचनेचा प्रकल्प, असे अनेक राष्ट्रीय जडणघडणीतील महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे साकारून राष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे योगदान दिले. तसेच दिल्लीच्या अर्बन आर्ट कमिशनसाठी सक्रिय योगदान दिले. वास्तुशिल्पकलेच्या इतिहासात त्यांना मानाचे स्थान राहील.

पुरस्कारसंपादन करा

वास्तुकलेतील असामान्य कामगिरी व राष्ट्रीय उभारणीतील त्यांच्या अथक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा बहुमान देऊन गौरव केला. भारताच्या वास्तुविशारद संस्थेने त्यांना सुवर्णपदक दिले, तर जे.के. इंडस्ट्रीजचे ‘ग्रेट मास्टर्स अवॉर्ड’ त्यांना बहाल करण्यात आले. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरने त्यांना ‘फेलोशिप’ देऊन त्यांच्या कामाच्या गुणवत्तेला मान्यता दिली, तर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला. शहरांची वाढ, शहररचना, सध्याची शिक्षणपद्धती, वास्तुकलेच्या व्यवसायातील समस्या यांवर ते वेळोवेळी आपले विचार मांडून मार्गदर्शन करीत. त्यांचे विचार वैश्विक स्तरावरचे असत. एक चिंतनशील प्राध्यापक म्हण्ाून त्यांचा लौकिक होता. कानविंदे यांनी दिल्ली मुक्कामी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=36893728 वास्तुयोगी[मृत दुवा]
  2. ^ "Achyut Kanvinde". Archinomy (en-US मजकूर). 2020-03-26 रोजी पाहिले. 
  3. ^ "Achyut Kanvinde on the Quest for Quality Architecture". The Wire. 2020-03-26 रोजी पाहिले. 
  4. ^ Balasubramaniam, Chitra (2019-04-18). "Achyut Kanvinde: The man behind sustainable designs". The Hindu (en-IN मजकूर). ISSN 0971-751X. 2020-03-26 रोजी पाहिले. 
  5. ^ "Achyut Kanvinde | National Science Centre". Archnet. 2020-03-26 रोजी पाहिले. 
  6. ^ Tanuja B.K.; Sanjay Kanvinde; Soumya Rajagopalan; Abhishek Maniktala; Meenakshi Chauhan; P.C. Seth; Sreeja Rajeev; Sunita Kanvinde et al. (2016). "Achyut Kanvinde Chronology of Works". Achyut Kanvinde – Ākār (en मजकूर) 24 (2/3).  |displayauthors= suggested (सहाय्य)