१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड
१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड (स्वातंत्र्यानंतर १६१वी इन्फंट्री ब्रिगेड) ही भारताचे सैन्याची तुकडी आहे. याची रचना १९४१मध्ये ब्रिटिश भारतीय लष्करात झाली. भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर झालेल्या ब्रिटिश भारतीय लष्कराच्या विभागणीत ही ब्रिगेड भारताच्या वाट्यास आली.
दुसरे महायुद्ध
संपादनदुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४१मध्ये ही ब्रिगेड ५व्या इंडियन इन्फंट्री डिव्हिजनचा भाग होती. १९४२मध्ये या ब्रिगेडला सायप्रसमध्ये तैनात करण्यात आले. तेथे जर्मन आक्रमण झाले तर त्याचा मुकाबला करण्यासाठी ही ब्रिगेड तेथे होती. एप्रिल १९४२मध्ये ही ब्रिगेड इजिप्तमध्ये पाठविण्यात आली व तेथे तीस मोटर ब्रिगेडचा दर्जा देण्यात आला. जून-जुलै १९४२मध्ये या ब्रिगेडने १०व्या ब्रिटिश चिलखती डिव्हिजनचा भाग म्हणून अल अलामीनच्या पहिल्या लढाईत भाग घेतला. त्यानंतर पुन्हा ५व्या डिव्हिजनमधून १६१वी ब्रिगेड म्यानमारमध्ये गेली. तेथे ही ब्रिगेड २ऱ्या ब्रिटिश इन्फंट्री डिव्हिजनमध्ये आणि नंतर ७व्या इंडियन इन्फंट्री डिव्हिजनमधून लढली. ७व्या डिव्हिजनमध्ये असताना १६१व्या ब्रिगेडने कोहिमाच्या लढाईत भाग घेतला होता. त्यानंतर काही काळ ५व्या डिव्हिजनमध्ये आल्यावर १६१व्या ब्रिगेडची मार्च १९४५मध्ये काही दिवस पुन्हा एकदा ७व्या डिव्हिजनमध्ये रवानगी झाली. एप्रिल १९४५ नंतर महायुद्ध संपेपर्यंत ५व्या डिव्हिजनमधून ही ब्रिगेड मलायावरील आक्रमणाची तयारी करीत होती परंतु आक्रमणाआधीच युद्ध संपले. त्यानंतर डच ईस्ट इंडीजमधील डच राजवटीविरुद्धचा उठाव दाबण्यासाठी या ब्रिगेडला तेथे पाठविण्यात आले.
भारतीय सेना
संपादनभारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर १६१वी ब्रिगेड भारतीय सेनेच्या वाटणीस आली. तेव्हा त्यातील इंडियन असे नामाभिधान काढून टाकण्यात आले. ५व्या डिव्हिजनबरोबर या ब्रिगेडने रांची येथे तळ ठोकला. भारताच्या फाळणी दरम्यान झालेल्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी १६१व्या ब्रिगेडला पंजाबमध्ये पाठविण्यात आले परंतु अचानक तेथून जम्मू आणि काश्मीरमध्ये विमानाने पाठविले गेले. तेथे या ब्रिगेडने १९४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी सैनिक आणि इतर आक्रमकांचा सामना केला व श्रीनगर, आणि पूंचचा पाडाव रोखला. याशिवाय ही ब्रिगेड बदगामच्या लढाईत आणि शालाटेंगच्या लढाईतही लढली.