हागिया सोफिया (ग्रीक: Ἁγία Σοφία; लॅटिन: Sancta Sophia; तुर्की: Ayasofya) किंवा आया सोफिया (अर्थ: पवित्र ज्ञान) ही तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक ऐतिहासिक इमारत व सध्या एक संग्रहालय आहे. इ.स. ५३७ मध्ये पूर्णपणे बांधले गेलेले हे प्रार्थनामंदीर इ.स. ३६० ते इ.स. १४५३ दरम्यान काँस्टँटिनोपोलमधील एक कॅथेड्रल होते. बायझेंटाईन सम्राट जस्टिनियन पहिला ह्याच्या हुकुमावरून बांधली गेलेली व तिच्या अतिविशाल घुमटासाठी प्रसिद्ध असलेली ही इमारत बायझेंटाईन वास्तूशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते. ह्या इमारतीची रचना ग्रीक शास्त्रज्ञ व गणितज्ञांनी केली.

हागिया सोफिया

ट्रिनिटीमधील लोगोसच्या प्रार्थनेसाठी बांधण्यात आलेले ह्या कॅथेड्रलचा वापर इ.स. १२०४ ते इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याने रोमन कॅथलिक चर्च असा केला. इ.स. १४५३ मध्ये ओस्मानी साम्राज्याने काँस्टँटिनोपोलवर कब्जा मिळवल्यानंतर दुसऱ्या मेहमेदच्या आदेशानुसार ह्या इमारतीचे रूपांतर मशीदीमध्ये करण्यात आले. ओस्मानांनी ह्या वास्तूमधील सर्व ख्रिस्ती चिन्हे नष्ट करून येथे नवे मिनार, घुमट इत्यादी बांधले. तेव्हापासून इ.स. १९३१ सालापर्यंत जवळजवळ ५०० वर्षे मशीद म्हणून वापरल्या गेलेल्या हागिया सोफियाच्या रचनेवरून स्फूर्ती घेऊन ओस्मानांनी सुल्तान अहमद मशीद, शहजादे मशीद, सुलेमानिया मशीद, रुस्तम पाशा मशीद इत्यादी अनेक मशीदी इस्तंबूलात बांधल्या.

हागिया सोफियाच्या घुमटावरील नक्षीकाम

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 41°0′31″N 28°58′48″E / 41.00861°N 28.98000°E / 41.00861; 28.98000