हनुमान मंदिर, पहारे
ठाणे जिल्ह्यातील पहारे येथे असलेले हनुमान मंदिर सामाजिक दृष्ट्या खुप महत्त्वाचे आहे. गावातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम याच मंदिराच्या परिसरात साजरे केले जातात. तसेच कार्यक्रमांना गावातील सर्व समाजाचे लोक एकत्र येतात.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पासून १८ किमी अंतरावर असलेल्या 'पहारे' या गावात मध्यम आकाराचे हनुमानाचे मंदिर आहे. मंदिराची रचना अत्यंत शोभिवंत असुन त्यामध्ये जवळ-जवळ ४.५ फुट उंच व ३ फुट रूंद हनुमानाची दगडाची सुंदर पुरातन मुर्ती आहे.
मुर्तीचे मुख व मंदिराचे द्वार पुर्वेला असल्याने सुर्याची किरणे थेट मुर्तीवर पडतात. पूर्वी हे मंदिर अत्यंत साध्या स्वरूपाचे होते. परंतु वाढत्या प्रसिद्धीने मंदिराचा जिर्नोद्धार करण्यात आला. या मंदिरात सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवले आहेत. गावात वीज नसली तरीही मंदिरात नेहमी प्रकाश असतो. सन २००० पासून मंदिरात अखंड हरीनाम सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
या मंदिराचे वैशिष्ट्ये हे आहेत की,
१} हे मंदिर गावाच्या मधोमध असल्याने गावकऱ्याना मंदिरात जाण्यासाठी फारसे चालावे लागत नाही.
२} या मंदिराच्या परिसरात खूप जागा असल्याने गावचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तेथेच होतात.
३}या मंदिरात दर शनिवारी मोठ्रया प्रमाणात भक्त नारळ फोडण्यासाठी येतात.
४} या मंदिरातील हनुमान नवसाला पावतो, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
५} या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला 'अखंड हरीनाम सप्ताह' कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमात गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक गावकरी ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसतात. कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी किर्तन होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन व काल्याचाप्रसाद म्हणजेच सामूहिक गावजेवण केले जाते.
हे मंदिर पहारे गावाचा एक सांस्कृतिक वारसा आहे. ह्या मंदिरावर गावातील लोकांची खूप श्रद्धा आहे.
-परेश भोईर