सुभाष खोत
सुभाष खोत (जन्म : १० जून १९७८) हे एक भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि सैद्धांतिक संगणक शास्त्रज्ञ आहेत. ते न्यू यॉर्क विद्यापीठात 'कूरंट इन्स्टिटयूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस'मध्ये संगणक शास्त्राचे ज्युलियस सिल्व्हर प्राध्यापक आहेत. कॉम्प्युटेशनल कॉप्लेसिटी या क्षेत्रातील अत्यंत गुंतागुंतीचे आणि अनेक शास्त्रज्ञांना न सुटलेल्या समस्यांबद्दल त्यांनी केलेले संशोधन हे या क्षेत्रात मूलभूत समजले जाते. या त्यांच्या संशोधनाने अनेक समस्यांचे निराकरण करण्यात इतर शास्त्रज्ञांना यश मिळाले. ते युनिक गेम कंजेक्शन सिद्धान्ताचे जनक म्हणून ओळखले जातात.
शिक्षण
संपादनयांचे प्राथमिक शिक्षण इचलकरंजीच्या श्री.सौ. गंगामाई विद्यामंदिर व माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल येथे शिष्यवृती मिळवत झाले. १९९५ सालच्या आय.आय.टी., मुंबईच्या प्रवेश परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आय.आय.टी., मुंबई येथून संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयातील पदवी १९९९ मध्ये संपादन केली. जागतिक गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत त्यांनी भारताचे दोन वेळा प्रतिनिधित्व करताना रजत पदके मिळवली.
पुरस्कार
संपादन- २००५ साली त्यांना मायक्रोसॉफ्ट रिसर्च न्यू फॅकल्टी फेलोशिप अवॉर्ड मिळाले. ही फेलोशिप या जगातील सर्वात आव्हानात्मक सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन करण्याची क्षमता असलेल्या संशोधकाला दिली जाते.
- २०१० साली खोत यांना प्रतिष्ठित अशा एलन टी. वॉटरमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जे शास्त्रज्ञ त्यांच्या तरुण वयात त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान करतात अशा शास्त्रज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. अमेरिकेतील राष्ट्रीय विज्ञान फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार अमेरिकेतील सर्वात नामांकित समजला जातो.
- संगणक शास्त्रातील गणित या विषयावर २०१० सालच्या आंतरराष्ट्रीय गणित काँग्रेसमध्ये खोत यांना आमंत्रित केले गेले.
- डॉ.सुभाष खोत यांना २०१४ मध्ये रॉल्फ नेव्हालिना पुरस्काराने गौरवण्यात आले.
- २०१६ साली त्यांना त्यांच्या क्षेत्रातील अपवादात्मक कल्पकतेसाठी मक आर्थर फेलोशिपने गौरवण्यात आले. या फेलोशिपला 'जीनियस ग्रँट' असेही म्हणले जाते.
- २०१७ साली गणित, अभियांत्रिकी विज्ञान आणि वैद्यकीय विज्ञानातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- आय.आय.टी. मुंबईच्या संकेतस्थळावरील खोत यांच्या बद्दलचा मजकूर
- मॅक आर्थर फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील माहिती
- टाईम्स ऑफ इंडियामधील नेवालीना पुरस्काराची बातमी
- मॅक आर्थर फेलोशिपची बातमी
- Universalis, Encyclopædia (2014-09-15). "Biographie de SUBHASH KHOT (1978- )". Encyclopædia Universalis (फ्रेंच भाषेत).