सुधाकर डोईफोडे
सुधाकर विनायक डोईफोडे (जन्म : १४ सप्टेंबर[१], इ.स. १९३७; - २२ जानेवारी, इ.स. २०१४) हे एक मराठी पत्रकार आणि लेखक होते. मराठवाड्यातील नांदेडहून निघणाऱ्या सुप्रसिद्ध दैनिक प्रजावाणीचे ते संपादक होते. १९६२ साली त्यांनी सुरू केलेल्या प्रजावाणी या साप्ताहिकाचे डोईफोडे यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने दैनिकात रूपांतर केले आणि ते दैनिक नावारूपास आणले.
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. १९७५ साली देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी संघर्ष केला होता.
इतिहास, परराष्ट्रसंबंध, संरक्षण, भौगोलिक परिस्थिती हे डोईफोडे यांचे आवडीचे विषय होते. यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख आणि अग्रलेख लिहिले. आणीबाणीच्या काळात 'प्रजावाणी'चे तीन अग्रलेख सरकारजमा झाले होते. याच काळात सुधाकर डोईफोडे यांना, त्यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे १५ दिवसांचा कारावास भोगावा लागला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलन, कच्छ बचाओ या आंदोलनांत सुधाकर डोईफोडे यांचा सहभाग होता. शेवटची अनेक वर्षे ते मराठवाडय़ातील रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी झटत होते. प्रत्येक रेल्वेमंत्र्याला भेटून मराठवाडय़ातील प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधत. गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर रेल्वे प्रश्नाचे जाणकार म्हणून डोईफोडे यांचेच नाव घ्यावे लागेल. वृत्तपत्रीय तसेच विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केले.
सुधाकर डोईफोडे हे नांदेड नगरपालिकेचे दोनदा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. नगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती असताना त्यांनी पालिकेचे लोहिया वाचनालय उत्तमोत्तम ग्रंथांनी समृद्ध करण्यात पुढाकार घेतला नरहर कुरुंदकर यांच्या नावाने पालिकेतर्फे व्याख्यानमाला सुरू करण्यातही त्यांचे योगदान मोठे होते.
सुधाकर डोईफोडे यांची प्रकाशित पुस्तके
संपादन- परवड (हैदरबाद मुक्तीलढ्यावरील कादंबरी)
- प्रतर्दनाचे दिवस (हैद्राबाद स्वातंत्र्यलढयाची माहिती देणारे पुस्तक; प्रतर्दन हे विष्णूचे विशेषण असून त्याचा अर्थ दुष्टांचा संहार करणारा असा आहे.)
- शब्दबाण -( दैनिक प्रजावाणीतील अग्रलेखांचा संग्रह)
पुरस्कार
संपादन- डोईफोडे यांच्या ’शब्दबाण’ या अग्रलेखांच्या संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता..
- नांदेडभूषण हा पुरस्कार
- दैनिक प्रजावाणीला १९७८, १९७९, १९८० या तीन वर्षी, सर्वोत्कृष्ट अग्रलेखांसाठीचे डहाणूकर पारितोषिक मिळाले होते.
- नांदेडच्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.
- सुधाकर डोईफोडे यांना २०११चा "प्रकाश देशमुख स्मृती पत्रकारिता पुरस्कार' मिळाला होता.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "मराठवाड्याचा लढवय्या पत्रकार सुधाकर डोईफोडे". २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.