साचा:उदयोन्मुख लेख सदर
फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये रशियावरील मोहीम (फ्रेंच: Campagne de Russie) व रशियामध्ये १८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года, Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते.
ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व स्मोलेन्स्क येथील लढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले.
रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे.
रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले.