सहानगड किल्ला (भंडारा)
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्हा या भागात असलेला हा एक छोटा किल्ला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ऐतिहासिक 'सहानगड' म्हणजेच सध्याचे सानगडी (सान=लहान, गढी=गडी) गाव. येथील भोसलेकालीन गडी म्हणजेच सहानगड किल्ला आजही आपल्या वैभवाची साक्ष देत अस्तित्वाशी झुंजतोय. येथील भव्य परकोट, तटबंदी, पडझड झालेले बुरूज, बाहुली विहिर, तोफ अशा ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार वस्तू पहावयास मिळतात.[१]
भंडारा शहराच्या पुर्वेलाअसलेल्या साकोली पासून १७ कि.मी. अंतरावर सानगडी हे गाव आहे. सहानगड या लहानशा किल्ल्यावरूनच या गावाला 'सानगडी' हे नाव पडले आहे. गावाबाहेरील उंच टेकडीवर नागपूरचे रघूजी राजे भोसले यांनी १७३४[२] मध्ये हा किल्ला बांधला. किल्ल्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असून दरवाज्याच्या आतील भागास पहारेकऱ्यांसाठी देवडया असून येथील एका देवडीच्या आतील बाजुस कोठार आहे. दरवाजावर कोणत्याही प्रकारचे कोरीव काम अथवा शिल्प दिसून येत नाही. देखरेख नसल्याने किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पडक्या तटबंदी मधून गडावर प्रवेश होतो. आयताकृती आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर दीड एकर परिसरात पसरला आहे. मध्यभागी असलेल्या या बुरुजावरून संपूर्ण किल्ला व दूरवरचा परिसर दृष्टीस पडतो. गेल्या दोन वर्षाच्या काळात ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे या हेतूने सानगडी येथील गावकऱ्यांच्या पुढाकाराने गट्ट लावून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. किल्ल्याची तटबंदी व खालील भाग दगडांनी व वरील भाग विटांनी बांधला आहे. किल्ल्याची भिंत काही भागात गोलाकार आहे. प्रवेशद्वार मजबूत विटांचे असून मागील भागात चौकीदारासाठी एक कक्ष आहे. किल्ल्याच्या मधोमध एक गोलाकार तोफ फिरविण्याचे स्थान असून त्याचा आकार १० ते १२ मीटर आहे. त्यावर नव्याने भारताची राजमुद्रा उभारलेली आहे.
बाहुली विहीर
संपादनसानगडीमध्ये दोन प्राचीन बाहुली विहिरी (पायरीची विहीर) आहेत. ही बावडी केवळ जलस्त्रोतच नव्हे तर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. बांधकाम केवळ दगड चुन्याने केले आहे.[३] या विहिरीत ५० ते ६० पायऱ्या आहेत. आतील भागात राहण्यासाठी मोठमोठ्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये भोसलेकालीन लोक युद्धाच्या वेळी मुक्कामाने राहायचे. गुप्त खलबते, सल्लामसलती करण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा. खोल्यांच्या पुढे आतमध्ये गेल्यावर खोल गर्तेत वर्षभर थंडगार पाणी असते. परंतु, अलीकडे त्यांचा वापर कोणी करीत नाही. दोनपैकी एक विहीर बुजली आहे.[४]
ऐतिहासिक पार्श्वभूमी
संपादनइ.स. १७०० मध्ये बख्त बुलंदशहा यांची छिंदवाडा जिल्ह्यात राजधानी असताना भंडारा विभागात सानगडी ते प्रतापगड आणि तिरोडा ते आंबागड पर्यंतचा प्रदेश आपल्या राज्याला जोडून घेतला. याच वंशातील वलीशहा यांचा पराभव करून रघूजी राजे भोसले यांनी ते राज्य राणी रतनकुंवरला परत केले. या राणीने रघूजी राजे भोसले यांना आपला तृतीय पुत्र मानून आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा नागपूर आणि भंडारा हे दोन प्रांत भेट स्वरूपात दिले. तेव्हा भंडाऱ्याची वैनगंगा प्रांत अशी ओळख होती. राजे रघूजी यांच्या वंशातील शेवटचे राजे अप्पासाहेब भोसले यांचे सहानगड येथे देहावसान झाले. या किल्ल्याच्या आवारात वलीखान यांची समाधी असून एक जुनी विहीर आहे.[४]
अष्टधातूची तोफ
संपादनसहानगड किल्ल्याच्या बुरुजावर व्याघ्रमुखी अष्टधातूंची मोठी व वजनदार तोफ आहे. तिची लांबी ११ फूट व व्यास ५ फूट असून पाच कडे आहेत. इंग्रजांनी ही तोफ नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. तोफेपासून काही अंतरावर १० ते १२ किलो वजनाचा लोखंडी गोळा आहे. पुढे या तोफेशी काही दंतकथा जोडून लोकांनी तिची पूजाअर्चा करायला सुरुवात केली. आता ती तोफमाय, 'तोफेश्वरी देवी' म्हणून प्रसिद्ध आहे. भोसल्यांनीसुद्धा शेकडो बैलजोड्या व हत्ती लावून तिला हलविण्याचा प्रयत्न केला; पण ती जागची हलली नाही. नवस फेडण्याच्या नावाखाली प्राण्यांचा बळी देण्याचे प्रकार होत असल्याने हा ऐतिहासिक वारसा दुरावत आहे.[४]
स्वातंत्र्य लढ्यात योगदान
संपादनपारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख केंद्र म्हणून या गावाची ओळख होती. देशभक्ती व स्वातंत्र्याच्या ऊर्मीने भारावलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात योगदान दिले. याच सहानगड किल्ल्यावर १४ ऑगस्ट १९४७ ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्याच मध्यरात्री जगन्नाथ गोल्लीवार, सोमाजी बोकडे व गावकऱ्यांनी तिरंगा ध्वज फडकविला होता. या ही ऐतिहासिक घटनेचाहा किल्ला साक्षीदार आहे.
वारसा हरवला
संपादनआजही भोसलेकालीन इतिहास व वैभवाची साक्षीदार म्हणून ही वास्तू तटस्थपणे उभी आहे. प्रवेशद्वारासमोर काही अंतरावर चौकोनी भिंत असून तिचे छत पडले आहे. यालाच पूर्वी रंगमहल म्हणत असत. उत्तर- पूर्व व दक्षिण दिशेत दोन-दोन द्वार आहेत. किल्ल्याच्या परिसरात पाच विहिरी होत्या. त्या झाडेझुडपे व मातीने बुजल्यात. एक जुनी अष्टकोनी विहीर असून त्यात आता मोठया प्रमाणात झाडे वाढली आहेत. सहानगड साक्षीदार जोपासनेकडे दुर्लक्ष सहानगड किल्ल्याच्या परिसर निसर्गरम्य असून नजीक तलाव आहे. पर्यटक, भाविक व हवसेनवसे येथे हजेरी लावतात. परंतु, किल्ल्याच्या परिसरात ओल्या पार्ट्या रंगतात. मद्यपान केले जाते. स्वयंपाकाचे उरलेले अन्न टाकून दिले जाते. या ऐतिहासिक वारशाची जोपासना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या स्थळाच्या नावाने असलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून अनेकदा याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.[४]
अन्य स्थळे
संपादनगावात प्रसिद्ध पुरातन मंदिरे आहेत त्यात २१ हनुमान मंदिरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि रामदास स्वामींचा मठ पाहण्यासारखा आहे.
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Maharashtra, Discover (2020-07-20). "सानगडी | Sangadi Fort | सहानगड किल्ला". Discover Maharashtra (इंग्रजी भाषेत). 2023-01-04 रोजी पाहिले.
- ^ "भंडारा | युवकों ने की सहानगड किले की सफाई | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2023-01-04 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network (2022-04-20). "सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील बावडी झाली कचराकुंडी". Lokmat. 2023-01-04 रोजी पाहिले.
- ^ a b c d "भोसलेकालीन इतिहासाचा साक्षीदार सहानगड किल्ला...वाचा सविस्तर". eSakal - Marathi Newspaper. 2023-01-04 रोजी पाहिले.