सदाशिव रामचंद्र गाडगीळ

प्राचार्य डॉ. सदाशिव रामचंद्र ऊर्फ स.रा. गाडगीळ (इ.स. १९१६:कुरुंदवाड - ऑक्टोबर २, इ.स. २००८:मुंबई) हे मराठीतील समीक्षक तसेच भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक होते. स्त्रीप्रधान समाजव्यवस्था, बौद्धधर्म, मानववंशशास्त्र आणि भारतीय साहित्यशास्त्र हे गाडगीळांचे चिंतनाचे विषय होते. महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी मूलगामी चिंतन करून लिंगायत धर्माची भूमिका गाडगीळांनी परखडपणे मांडली. 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाचेही ते काही काळ संपादक होते.

जीवन संपादन

इ.स. १९५० ते इ.स. १९७७ या काळात स.रा. गाडगीळ नांदेड येथील पीपल्स कॉलेजमध्ये मराठीइंग्रजी या विषयांचे प्राध्यापक होते. अध्यापनाच्या अखेरच्या काही वर्षांत इ.स. १९७३ ते इ.स. १९७७ या कालखंडात त्यांनी त्याच कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही काम केले.

लेखन संपादन

  • काव्यशास्त्रप्रदीप (व्हीनस प्रकाशन) - भरतमुनीची रसचर्चा आणि नाट्यशास्त्राची मांडणी यावर आधारित ग्रंथ. भारतीय व पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा एकत्र परिचय करून देणारे प्राचार्य डॉ. स. रा. गाडगीळ यांचे साहित्य विचार. (नरहर कुरुंदकरांची प्रस्तावना )
  • प्राचीन भारतीय धर्मविचार आणि मराठी संत (प्रा. गं. बा. सरदार यांची प्रस्तावना)
  • मराठी काव्यांगणातील इंदधनु हे इंदिरा संतांच्या काव्याचे सौंदर्य कथन करणारा ग्रंथ
  • मराठी काव्याचे मानदंड खंड एक आणि दोन( पद्मगंधा प्रकाशन)
  • लोकायत (लोकवाङ्मय गृह प्रकाशन) - देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या लोकायत ग्रंथावर आधारित.
  • विचारमंथन (प्रतिमा प्रकाशन }
  • वैदिक यज्ञ-मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग - स.रा. गाडगीळांनी पदवीसाठी लिहिलेला प्रबंध.
  • शोकात्म विश्वरूपदर्शन (राजहंस प्रकाशन -महाराष्ट्र सरकारचा १९९९-२०००चा पुरस्कार) - शोकात्म साहित्याच्या नाट्याचे अंतरंग, कॅथॉर्सिस आणि शोकात्मतेचा भावनात्मक परिणाम, शोकात्म नाट्याचा नायक, ग्रीक शोकात्म नाट्य, ग्रीक शोकात्म नाट्यातील कलात्म सौंदर्य आणि वैचारिक मौलिकता, शेक्सपियरियन शोकात्मिका, इब्सेनयुग, महाभारत, अशा पद्धतीच्या शोकात्मिकांचे संपूर्ण व सर्वांगीण विवेचन स.रा. गाडगीळांनी या ग्रंथात मांडलेले आहे.
  • सभासद बखरीचे संपादन
  • सवाई माधवराव यांचा मृत्यू: एक चिकित्सक अभ्यास
  • साहित्यमीमांसा आणि समाजदर्शन (पद्मगंधा प्रकाशन)
  • हॅम्लेट: एक चिकित्सक अभ्यास ( वि. स. खांडेकरांची प्रस्तावना)

मराठी रंगभूमीसाठीचे कार्य संपादन

इ.स. १९९३ साली शासकीय संगीत नाट्यस्पर्धा झाली त्यात स.रा. गाडगीळांनी दिग्दर्शन केलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकास आठ पुरस्कार मिळाले होते.
ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक होते. त्यांनी बसविलेल्या 'संगीत मानापमान', 'कट्यार काळजात घुसली', दत्ता भगत लिखित 'अश्मकने इतिहास घडविला होता', या नाटकांनी दिल्लीपर्यंत जाऊन अनेक पारितोषिके प्राप्त केली होती.

पुरस्कार संपादन

  • उत्कृष्ट वाङ्‌मयमूल्य असलेल्या ग्रंथास, दरवर्षी महाराष्ट्र साहित्य परिषद स.रा.गाडगीळ पुरस्कृत विजया गाडगीळ स्मृती पुरस्कार देते.
  • ’कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी महाराष्ट्र सरकारचे ८ पुरस्कार (१९९३)
  • महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची जीवन गौरववृत्ती २००८-२००९
  • ’शोकात्म विश्वरूप दर्शन’ या स.रा. गाडगीळलिखित राजहंस प्रकाशित पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९९-२०००चा उत्कृष्ट ग्रंथासाठीचा पुरस्कार
  • ’शोकात्म विश्वरूप दर्शन’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा रा.श्री. जोग पुरस्कार(१९९९-२०००)
  • ’शोकात्म विश्वरूप दर्शन’ला केशव भिकाजी ढवळे पुरस्कार(२०००)
  • ’शोकात्म विश्वरूप दर्शन’ला स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे द.दि. पुंडे समीक्षा ग्रंथ पुरस्कार(२०००)