हिंदुस्थानी संगीतात ज्या काही थोड्या संकल्पना वादविषय ठरत आल्या आहेत, त्यांत ‘घराणे’ ही प्रमुख संकल्पना होय. धृपद, ख्याल, ठुमरी यांसारखे गायनप्रकार असोत सतार, तबला इ. वाद्ये असोत किंवा नृत्यकला असो घराणे या संकल्पनेचा त्यात आढळ झाल्याखेरीज राहत नाही.

राण्यांविषयीचे आजपर्यंतचे लिखाण मुख्यतः ऐतिहासिक स्वरूपाच्या संगीतविचारात झालेले आढळते. घराण्यांचे आद्यपुरुष तसेच त्यांचे शिष्य-प्रशिष्य यांची चरित्रात्मक माहिती कमीअधिक स्वरूपात आणि थोड्याफार व्यवस्थित पद्धतीने लिहिली गेली आहे. घराण्यांविषयीची तात्त्विक चर्चा मात्र त्या मानाने कमी झाली आहे. वास्तविक पाहता घराणे म्हणजे काय, हाच मूलभूत प्रश्न सर्वांसमोर असला, तरी त्याचे उत्तर शोधण्याची दिशा ही आजपर्यंत बऱ्याचशा प्रमाणात माहिती गोळा करणे, ह्याच स्वरूपाची राहिली आहे. घराणे या संकल्पनेचा उलगडा करण्याच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. उपपत्ती म्हणून पद्धतशीरपणे न मांडल्या गेलेल्या, पण रूढ असलेल्या काही मतांच्या संक्षिप्त विचारांतून हे सहजपणे ध्यानात येईल.

घराणे म्हणजे त्यातील मुख्य कलावंताच्या मूळ गावाच्या नावापलीकडे फारसे काही नाही, असे एक मत आहे. आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर इ. ख्यालगायकांच्या घराण्यांची नावे दिल्ली, बनारस, लखनौ, इ. तबलावादकांच्या घराण्यांची नावे किंवा ठुमरीगायकांतील लखनौ, बनारस इ. नावे पाहून हे मत स्वीकारणीय वाटले, तरी ते तितकेसे ग्राह्य नाही. त्याला दोन कारणे आहेत. एक तर गावाच्या नावावरून न ओळखली जाणारी घराण्यांची नावेही आढळतात. उदा., ख्यालगायनात गोखले घराणे धृपदगायनात डागर, नौहार वगैरे घराणी. याहूनही महत्त्वाचे कारण असे, की गावावरून घराण्याचे नाव ठरणे, ही या संकल्पनेच्या विकासातील केवळ एक अवस्था ठरते. कारण आज घराण्याची नावे घेताच बोध होतो, तो गायन-वादन पद्धती, पेशकारीच्या शैली यांमधील वैशिष्ट्ये आणि फरक यांचाच. ग्रामनामांवरून घराण्यांच्या ऐतिहासिक विकासावर प्रकाश पडला, तरी तात्त्विक चर्चेत त्यामुळे काही भर पडत नाही. तात्त्विक विचारासाठी घराण्यांचा स्वरूपविचार हाच मार्ग समोर राहतो.

घराण्यांविषयी आणखी एक मतही मांडले गेले आहे. एकोणिसाव्या शतकात राजाश्रय सुटल्यावर कलावंत मोठमोठ्या शहरांत येऊन स्थायिक झाले. सोयीसाठी त्यांच्या त्यांच्या ग्रामनामांनुसार त्यांना वेगळे ओळखण्यात येऊ लागले, तेव्हा घराण्यांचे वेड संगीतात नव्यानेच शिरले, असे म्हणण्यास हरकत नाही. ह्याच मताला आणखी एक वळसा देऊन असे म्हणण्यात येते, की मध्ययुगापासूनचा कलावंतांचा राजाश्रय सुटल्यावर कला अशिक्षित तसेच स्वार्थप्रेरित वा धंदेवाईक लोकांच्या हातांत जाऊन आपल्या हातचा मक्ता जाऊ नये, म्हणून घराण्याच्या कल्पनेला खतपाणी करण्यात आले.

या दोन्ही मतांत सत्यांश आहे पण तो समाजशास्त्रीय आहे. पुन्हा मुद्दा असा, की घराण्यांना एकोणिसाव्या शतकात नावे मिळाली, असे जरी सिद्ध करता आले, तरी त्यांच्या कलाविष्कारांतील फरक काही त्याच शतकात एकदम निर्माण झाला असणे शक्य नाही. हा फरक ठळकपणे लक्षात येण्यासारखी वैचारिक परिस्थितीही आधीपासूनच असणार. म्हणजे जरी घराण्यांचे नामकरण एकोणिसाव्या शतकात झाले असले, तरी वेगवेगळ्या नावांतून व्यक्त होणारा फरक कलास्वरूपात्मक होता आणि त्यावर समाजशास्त्रीय विचारांतून काही फारसा प्रकाश पडत नाही. गावांच्या नावांतील फरक व त्यांचा उपयोग हा इथे एका अर्थाने प्रतीकात्मक आहे. अधिक अंतर्गत आणि सूक्ष्म असा स्वरूपात्मक फरक व्यक्त करण्याचे साधन म्हणूनच या ग्रामनामांचा उपयोग संगीतविषयक लिखाणातून आणि अलिखित अशा चर्चा-विचारांतून करण्यात येतो.

घराणे म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर संगीत-स्वरूपविषयक तात्त्विक विचारात शोधण्याचेही प्रयत्न काही प्रमाणात झाले. वा. ह. देशपांडे यांच्या घरंदाज गायकी (१९६१) या ग्रंथात घराण्यांविषयीचा महत्त्वाचा तात्त्विक विचार आढळतो. काही पिढ्यांचे सातत्य, घराण्याचे असे खास कायदे आणि प्रभावशाली गुरूचे आवाजधर्म या मूलभूत तत्त्वांवर घराण्यांची निर्मिती अवलंबून असते, असे देशपांडे यांचे विवेचन आहे. स्वर आणि लय हे दोन ध्रुव आणि मधली संदिग्ध व सूक्ष्म समतोलकेंद्रे ह्यांवर अनुक्रमे किराणा, आग्रा, ग्वाल्हेर व जयपूर या ख्यालगायकींतील घराण्यांची स्पष्टीकरणासह ते स्थापना करतात.

या उपपत्तीवरील आक्षेप पुढीलप्रमाणे नोंदविता येतील : (१) स्वर आणि लय सर्व घराण्यांत असल्याने या तत्त्वांची द्विध्रुवात्मक मांडणी अयोग्य ठरते. त्याचप्रमाणे समतोलकेंद्रांतील घराण्यांच्या तरतमभावाचे साधार विवेचन आढळत नाही. (२) घराणे ही संकल्पना वाद्यसंगीत, सुगम संगीत इत्यादींनाही लागू होत असल्याने केवळ ख्यालगायकीपुरतेच विवेचन मर्यादित ठेवून घराण्यांविषयीची उपपत्ती मांडणे तर्कशुद्ध नाही. (३) साध्या क्रियेपेक्षा गुंतागुंतीची क्रिया सुंदर, नक्की वा जोरकस आवाजाच्या लगावापेक्षा मोकळा आणि आकारयुक्त आवाज सुंदर यांसारखी तत्त्वे वा यांसारख्या कसोट्या सगळीकडे सारख्याच पात्रतेच्या असतात, असा देशपांड्यांच्या विवेचनाचा रोख आहे पण त्यात फारसे तथ्य नाही. कारण ख्यालगायन या संगीतव्यवहारातील मर्यादित क्षेत्रापुरतेच हे खरे असू शकेल. एकंदर सांगीतिक आशयाच्या संदर्भात चिरक्या आवाजासारख्या वरवर पाहता असांगीतिक वाटणाऱ्या गोष्टीही कलाकृतीच्या सिद्धीतील महत्त्वाचा घटक ठरू शकतात. खरे पाहता सुंदर-असुंदर यापेक्षा प्रस्तुत-अप्रस्तुत ही भाषाच कलाविचारात योग्य होय. नाहीपेक्षा निम्म्याहून अधिक संगीतव्यवहार बाद ठरवावा लागण्याची आपत्ती ओढवेल. डॉ. बी. सी. देव यांनी घराण्याविषयीची तात्त्विक चर्चा भाषाशास्त्रीय दृष्टिकोण स्वीकारून केली आहे. (इंडियन म्यूझिक, १९७४). भारतीय संगीत हे सर्वसामान्य म्हणजे मोठे वर्तुळ. त्यात हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत ही विशेष भेद दर्शविणारी उपवर्तुळे व या उपवर्तुळांत घराणे आणि ‘बाणी’ ही लहान उपवर्तुळे असतात. शिवाय घराण्याच्या उपवर्तुळात प्रत्येक कलांवंताचे स्वतःचे उपवर्तुळ अशी ही एकूण मांडणी. या आकृतिबद्ध मांडणीस तुल्यबळ अशा भाषिक मांडणीही देव पुढे ठेवतात. एकंदर शब्दकळा, तीत विविध बोली, बोली वापरणाऱ्यांच्या विविध रचना या तऱ्हेने ही परंपरा सिद्ध होते.

वाद्यसंगीत व ख्याल हा गायनप्रकार एवढ्यांपुरतेच घराण्यांविषयीचे हे विवेचन मर्यादित आहे, हा या उपपत्तीवरील एक आक्षेप. शिवाय भारतीय संगीत हे रागसंगीत असल्याने ख्यालामध्ये अथवा इतर आविष्कारप्रकारांत आलाप इ. जे टप्पे अपरिहार्यतेने येतात, त्यांचे विवेचन घराण्याविषयीच्या उपपत्तीच्या संदर्भात झालेले नाही.

अशोक रानडे यांनी संगीताचे सौंदर्यशास्त्र (१९७१) या पुस्तकात घराणे म्हणजे संगीतविश्वातील घटकांची व्यवस्था लावणारा सम्यक दृष्टिकोण, अशी व्यापक उपपत्ती मांडली आहे. सर्व घराण्यांना अभिप्रेत असलेले सांगीतिक साध्य वेगवेगळे असल्याने विविध घटकांना कमीअधिक महत्त्व देऊन त्यांची मांडणी होत असते आणि प्रसारण व संकुचन या अधिक व्यापक सांगीतिक प्रवृत्तींनी प्रभावित होऊन संगीतप्रकारांचा आविष्कार करणारी घराणी आपापला सांगीतिक संसार थाटत असतात, असा रानड्यांच्या विवेचनाचा इत्यर्थ आहे. घराण्यासंबंधीच्या उपपत्तीच्या संदर्भात ख्यालगायकीच्या टप्प्यांचे विवेचनही त्यांनी केले आहे. ख्यालगायकीखेरीज इतर संगीत व्यवहाराचा विचार न करण्याची मर्यादा याही उपपत्तीत दिसते.

एकंदरीने स्वरूपात्मक विचार हा सौदर्यशास्त्रीय विचाराचा भाग असल्याने घराण्यांचा विचार अजून जोमाने वाढीस लागलेला दिसत नाही. इतर संगीतपद्धती, नृत्यादी अन्य प्रयोगसिद्ध कला वगैरेंच्या व्यापक संदर्भासहित घराणे या संकल्पनेचा विचार होणे आवश्यक आहे. अशा तऱ्हेचा विचार झाल्यानंतर कदाचित घराणे म्हणजे शिस्त, विशिष्ट बंधक व सम्यक दृष्टिकोण, एकंदर सांगीतिक व्यवहारातील परंपरा-नवता, समाजमान्य संगीत व व्यक्तिगत भाष्य यांसारख्या कलास्वरूपविषयक घडामोडींना पायाभूत असणारी संकल्पना होय, असा निर्णय घेता येण्याची शक्यता निर्माण होते.