मसूरकर महाराज

(श्री मसुरकर महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)

धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर हे धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींचे स्रोत होते. मसुरकर महाराजांनी 'मसुराश्रम' या आश्रमाची स्थापना १९२० साली गोरेगाव पूर्व, मुंबई येथे केली. त्यांनी समर्थ संप्रदायाचा प्रसार केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बलवान स्वातंत्र्य सैनिक तयार करण्यासाठी सूर्यनमस्काराची उपासना व दासबोधाचे वाचन ही मसूरकर महाराजांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली मोहीम होती. मसुरकर महाराज यांना भेटण्यासाठी सुभाषबाबू सन १९३१ साली कराड येथील मसुराश्रमाच्या शिबिरात आले होते. रत्‍नागिरी येथे १९३१ साली पतितपावन मंदिराची स्थापना झाली. त्या वेळी स्वामी मसुरकरमहाराजांची व संतश्रेष्ठ गाडगेमहाराजांची भेट झाली.

धर्मांतरास विरोध

संपादन

मसुराश्रम येथे गुजरातगोवा येथील ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे मोठे कार्य केले व करत आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार व बलोपासनेचाही त्यांनी पुरस्कार केला. शुद्धी चळवळीला एक दिशा देण्याचे काम केलेले मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथजी, वामनमूर्ती व इतर अनेकांनी केले. युखॅरिस्ट काँग्रेस, वादग्रस्त फादर फेरार प्रकरण, केरळमधील नन्सच्या विक्रीचे स्कॅंडल, भिवंडीची व जळगावची दंगल, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेले भारताचे विभाजन प्रयत्न, आंध्रच्या किनारपट्टीवर मिशनऱ्यांनी ‘ख्रिस्तस्थान’ तयार करण्याची केलेली रचना या विरोधात आश्रमाने कार्य केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम

संपादन

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस घेऊन येणारा गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी त्यांनी जनजागृती केली. स्वागतयात्रा, शोभायात्रा आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. या मध्ये पारंपरिक ध्वजपथक, लेझीम, मानवी मनोरे, तलवारबाजी, मंगळागौर असे देखावे उभारण्यात मसुराश्रम अग्रणी आहे. तसेच मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन (गोरेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही येथे केले गेले आहे. पांडुरंगवाडीत रसिकांसाठी "दीपावली स्वरप्रभात", "पहाटराग मैफल' आयोजित केली जाते. यात शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात. मंगला पाध्येंचे शास्त्रीय गायन यात झाले आहे. तसेच डॉ. भालचंद्र फडणवीस यांचे संतुरवादन सादर झाले आहे. येथे 'हिंदू युवा संघटन मेळावा' आयोजित केला जातो. संस्कार भारती-गोरेगाव आणि मसुराश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यानेही आयोजित केली जातात.

पुस्तके

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन