श्रीधर बळवंत टिळक

(श्रीधरपंत टिळक या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीधर बळवंत टिळक (सु. मार्च १, १८९६ [ दुजोरा हवा] - मे २५, १९२८) मराठी लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे धाकटे पुत्र होते. श्रीधरपंतांचा जन्म १८९६ साली झाला असावा, असे अनुमान केले जाते. आतापर्यंत त्यांची जन्मतारीख निश्चित स्वरूपात कळलेली नाही.[ दुजोरा हवा] १९२८ साली त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-खाली आत्महत्या केली.[१]

श्रीधर बळवंत टिळक

१९१० च्या सुमारास घेतलेले टिळकांचे प्रकाशचित्र
टोपणनाव: श्रीधरपंत, बापू
जन्म: १८९६
मृत्यू: मे २५, १९२८
शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: दलित चळवळ
संघटना: समता संघ
धर्म: हिंदू
प्रभाव: गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, भीमराव रामजी आंबेडकर
वडील: लोकमान्य टिळक
आई: तापीबाई टिळक
अपत्ये: जयंत टिळक

समाज सुधारणेत सहभाग संपादन

श्रीधरपंतांचा लोकमान्यांशी पहिला खटका त्यांच्या लग्नात उडाला. ब्राम्हणांच्या आग्रहावरून टिळकांनी प्रायश्चित्त म्हणून पंचगव्यप्राशनाची तयारी केली. श्रीधरपंतांनी त्याला विरोध केला. 'माझ्या लग्नासाठी जर प्रायश्चित्त घेणे, तर ते लग्नच न झालेले बरे.’ हा विरोध फार काळ चालला नाही. पण पुढे टिळकवाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून त्याचेही प्रायश्चित्त त्यांनी घेतले.

टिळकवाड्यातले सहभोजन , समतासंघाची स्थापना तसेच गणेशोत्सवात बहुजनमेळाव्याचा कार्यक्रम घेणे ही पुण्यासाठी क्रांतीच होती. पण सामाजिक चळवळी करणाऱ्यांनी राजकीय चळवळींत अडथळे बनू नये, असा परखड सल्लाही ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत. त्यांची भूमिका कायम सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर(महाड सत्याग्रहाला श्रीधरपंतचा पाठिंबा होता. याआधी श्रीधरपंत हे 'देशाचे दुष्मन'या पुस्तकातील जेधे,जवळकरांच्या लिखाणामुळे आपल्या पित्याची बदनामी होते म्हणून त्यांच्या विरुद्ध कोर्टात दावा दाखल करण्यासाठी गेले होते व प्रतिवादींच्या बचावासाठी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.)प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, जवळकर असे ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक अध्वर्यू त्यांचे जवळचे मित्र होते.

लेखन संपादन

श्रीधरपंत प्रागतिक विचारांचे होते. श्रीधरपंत महाविद्यालयीन जीवनापासूनच लेखन करीत आले होते. त्यातच त्यांना रुची होती. ज्या आगरकरांशी लोकमान्य टिळकांचा वैचारिक संघर्ष झाला त्यांचीच भूमिका श्रीधरपंतांनी स्वीकारली. ‘जातीयता शक्य तितक्या लवकर नष्ट व्हावी’ हे आणि अशाप्रकारचे विचार ते पुन्हापुन्हा आपल्या लेखांमधून मांडत होते. पुढे चालून ‘ज्ञानप्रकाश‘, ‘विविधवृत्त‘ यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी बरेच लेखन केले. त्यांचे बंधू रामभाऊ यांचे प्रोत्साहन लाभून, त्यांनी आपल्या निवडक लेखनाचे पुस्तक माझा व्यासंग या नावाने प्रकाशित केले.[२]


A Midsummer Nights dream! किंवा ‘ऐन उन्हाळ्यातील एक स्वप्नदृश्य!‘ हे आणि ‘मराठी शाकुंतलाचे परीक्षण‘ हा लेख वाङ्‌‌मयसमीक्षेचा नमुना म्हणता येतो. ‘बादरायण संबंध‘, ‘एक चुटका‘, ‘सामूहिक आरोग्य व नागरिकांची कर्तव्ये!‘, ‘नवरात्रातील फेरफटका‘, ‘कलमबहादुराचे शेलापागोटे!‘, ‘कोंढाणा म्युनिसिपालिटीचा कारभार‘ या लेखांचे स्वरूप विनोदी आहे. तर ‘एका असामान्य चित्रकाराचा गुणगौरव‘, ‘लोकमान्यांचे निधन‘ व ‘टिळकांचा एक स्वभावदोष‘ हे लेख व्यक्तिचित्रणात्मक आहेत Which first -Politics or Social Reform? व ‘हिंदूंच्या धर्मक्रांतीचा उषःकाल‘ या दोन लेखांमध्ये त्यांची सामाजिक मते व्यक्त झाली आहेत.

लोकमान्य टिळक हयात असताना श्रीधरपंत कॉलेजच्या नियतकालिकामधून लेखन करीत होते. स्वतः लोकमान्य त्यांच्याकडून कवितांचे अनुवाद करून घेत असत. हे पाहता श्रीधरपंतांचे कोणत्याही स्वरूपाचे लेखन ‘केसरी‘त का प्रसिद्ध होऊ शकले नाही, याबद्दल कुतूहल वाटते. याचे कारण कदाचित असे असू शकेल की, लोकमान्यांचा ‘केसरी‘ असला तरी उत्तरोत्तर त्यांना स्वतःला त्यात लक्ष घालायला वेळ मिळत नव्हता. त्यांच्या राजकीय कार्याची व्याप्ती वाढली होती. कारणे काही असली तरी श्रीधरपंतांचे सुरुवातीचे लेखन ‘केसरी‘त व्हायला काहीच अडचण नव्हती. पण तसे घडले नाही आणि लोकमान्यांच्या मृत्यूनंतर तर केळकर-विद्वांस मंडळींनी त्यांना गायकवाड वाडा गायकवाडवाड्यात पाय ठेवायला परवानगीच नाकारली. काकासाहेब लिमये यांनी मात्र ‘ज्ञानप्रकाश‘मध्ये लिहायला त्यांना मोकळीक दिली, त्याचा परिणाम असा झाला की, त्यांच्याकडून थोडेफार लेखन झाले.

श्रीधरपंत महाविद्यालयीन जीवनापासूनच लेखन करीत आले होते. त्यातच त्यांना रुची होती. पुढे तर ‘ज्ञानप्रकाश‘, ‘विविधवृत्त‘ यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी भरपूर लेखन केले. आपल्या निवडक लेखनाचे पुस्तक करावे, असे त्यांना वाटले. त्यांचे बंधू रामभाऊ यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. ‘माझा व्यासंग‘च्या प्रस्तावनेत श्रीधरपंतांनी उल्लेख केला आहे-

ती. लोकमान्य टिळकांचे पश्चात साहित्यसेवेचे कामी खऱ्या कळकळीने उत्तेजन देणारे असे माझे वडीलबंधूंखेरीज मला कोणी उरलेले नाही.‘ शिवाय ‘माझा व्यासंग‘ला (१९१८ ते १९२७) असा कालनिदर्शक मजकूर कंसामध्ये दिला आहे. याचा अर्थ असा की, श्रीधरपंतांना पुस्तक काढण्याची घाई झाली होती आणि आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात तेव्हाही थैमान घालीत होते, हे स्पष्ट दिसते. कारण याच पानावर त्यांनी थॉमस हार्डीच्या कवितेतील पुढील ओळी उद्‌धृत केल्या आहेत-

Rose-leaves smell when roses thrive, Here'smy work while I'malive; Rose-leaves smell when shrunk and shed, Rose-leaves smell when shrunk and shed, Here's my work when I am dead.

याशिवाय, this I saw and knew: this, if anything of mine, is worth your memory

हे जॉन रस्किनचे वाक्यही त्यांनी प्रस्तावनेच्या प्रारंभीच नोंदविलेले आहे. पुढे ‘कोर्टाच्या भावनाशून्य वातावरणात नाइलाजास्तव गुरफटलो गेल्यामुळे यापुढे माझे हातून काही विशेष वाङ्‌‌मयसेवा होईल, अशी अपेक्षा करण्यात आता फारसे हंशील नाही,‘ असेही त्यांनी म्हटले आहे. श्रीधरपंतांच्या मनात नैराश्येचे ढग १९२३ पासूनच जमू लागले होते आणि ‘मृत्यू‘ या एकाच विषयाने त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता, हे स्पष्ट करणारे पुरावे त्यांच्या लेखनात सापडतात; उदाहरणार्थ, दिनांक १३-१०-१९२३ च्या ‘ज्ञानप्रकाश‘च्या पुरवणीत प्रसिद्ध झालेली त्यांची ‘माझी निराशा‘ ही कविता -

‘गेला सर्व हुरूप, ओसरुनि ये बुद्धीवरी झापडे।
आता मी जगलो कशास न कळे, हृद्रोग चित्ता जडे।

‘लोकमान्य स्मृतिदिनानिमित्त असहकार-युगास अनुलक्षून‘ नावाची कविता त्यांनी लिहिली होती. तिच्या शेवटच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.

‘कंटाळून निराश जीव विटला या सर्व गोष्टींप्रति।‘

या साऱ्याचा इत्यर्थ असा की, श्रीधरपंतांचा मनःपिंड कमकुवत होता आणि हळूहळू त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार बळावू लागले होते. ‘माझा व्यासंग‘मध्ये १५ लेख, आठ कविता व तीन परिशिष्टे आहेत. त्यापैकी दोन लेख इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्यांनी जे लेखन केले, त्यापैकी पुष्कळसे इथे निवडलेले आहे. याशिवाय ‘ज्ञानप्रकाश‘ व अन्य नियतकालिकांमधील लेखनाचा समावेश केलेला असला, तरी त्यांची संख्या कमी आहे. श्रीधरपंतांच्या व्यक्तित्वाविषयी विचार करताना असे जाणवते की, एकाच वेळी त्यांच्या मनात मृत्यूविषयी विचार असले तरी त्यांच्याकडे उपजत विनोदबुद्धीही होती.

समता संघाची स्थापना संपादन

१९२५ नंतर श्रीधरपंत आंबेडकरांकडे ओढले गेले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधरपंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृतमध्ये आहेत. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधरपंतांची शुभेच्छांची तार सर्वांत आधी वाचून दाखवण्यात आली होती. लो. टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे बंधू मुंबईस आले तर साहेबांना ( आंबेडकरांना ) भेटल्याशिवाय पुण्यास जात नसत. साहेब पुण्यास गेले तर साहेबांना गायकवाडवाड्यातील आपल्या राहात्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे त्यांना समजावून सांगून साहेब त्यांना परत पाठवीत.[२]

१९२५ साली प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या पुण्यातील वास्तव्यात श्रीधरपंत टिळकांनी त्यांची पहिल्याच दिवशी भेट घेतली. त्या भेटीत मागास बहुजनसमाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी आपली कळकळ त्यांनी मनमोकळी व्यक्त केली होती.

श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्‌घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते.

समतासंघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां. ना. राजभोज तेथे होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाजसमता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तऱ्हेने श्रीधरपंतांना त्रास देण्यास सुरुवात केली. सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकरांसह सहभोजन आनंदाने पार पडले.[३]

टिळकांच्या वाड्यात अस्पृश्यांचा मेळा संपादन

टिळक बंधू यंदा अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात घेऊन येणार अशी भुमका पुण्यात पसरली होती. आणि ती खरीही होती. एकीकडे दंगलबाज छत्रपती मेळ्याची दहशत आणि त्यातच टिळक बंधूंचा हा उपद्व्याप! ट्रस्टी मंडळी भेदरून गेली. ब्राम्हणेतर मंडळींच्या पाठिंब्याने रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करतील ही त्यांची खात्री असल्यामुळे, त्यांनी दोन मार्ग पत्करले. पहिला अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारून त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला.

लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात! संपादन

सकाळी एक दोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊनी बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलेस तर याद राखून ठेव, असे धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेले. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसताच, ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदांत ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला, अहो नाझर साहेब, आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केलीत ना? आता सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार ? आला तसा निमूट परत गेला.

याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार, असे बजावून रामभाऊने श्रीधरपंतांना प्रबोधनकार ठाकऱ्यांकडे जाऊन बसण्यास सांगितले. वाड्यात काय चालले आहे याची माहिती श्रीधरपंतांनी प्रबोधनकारांना दिली. श्रीधरपंत सबंध दिवस ठाकऱ्यांकडे बसलेले होते.

संध्याकाळी दिवेलागणी होताच श्रीधरपंत पुणे कँपात भोकरवाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन ते प्रबोधन कचेरीवर आले. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. कचेरी असलेल्या सदाशिव पेठेसारख्या ब्राम्हणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली होती. मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता.

इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्या सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५ , १०-१० मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊंच्या सूचना आणीत होता. खुशाल या , असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची गर्दी होतीच. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती.

मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू(श्रीधपंत टिळक) आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जंटाने दोन्ही हात पसरून 'यू कॅनॉट एंटर द वाडा' असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलीसनी सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य-गायनाला जोरात सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर, गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिशीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले गेले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटिशीचा कागद हातात घेतला आणि टरटर फाडून टाकला.

मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. प्रबोधनकारांनी केलेल्या लोकहितवादी साप्ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, 'गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी', या मथळ्याखाली लोकहितवादी साप्ताहिकात सबंध पानभर हकीकत छापून वक्तशीर बाहेर पडली.

सत्यशोधक समाजासंबधी मत संपादन

१९२७ मध्ये महात्मा फुलेजयंतीचे शताब्दीवर्ष होते. त्यानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत होते. अशाप्रकारच्या कार्यक्रमांत श्रीधरपंतांचा सहभाग होता. मुंबईत गिरगाव व परळ या भागांमध्ये सभा झाल्या. त्यामध्ये श्रीधरपंतांची उपस्थिती लोकांचे लक्ष वेधून गेत होती. या भाषणात त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांमुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा अधिकच उजळून निघाली.

त्यांच्या भाषणांचा विविधवृत्तामध्ये आलेला गोषवारा असा -

सत्य, न्याय व समानतेच्या सर्वमान्य तत्त्वांवर हिंदू समाजाची पायाशुद्ध नवी उभारणी करण्याचा सत्यशोधक समाजाचा हा प्रयत्न होता. ब्राह्मणेतर समाजाला आपल्या हक्कांची जाणीव प्रथम जोतिरावांनीच करून दिली. या दृष्टीने विचार केल्यास मागासलेल्या वर्गावर व अस्पृश्य समाजावर त्यांचे अलोट उपकार आहेत. महात्मा फुले हे आपल्या हिंदुधर्मीयांचे मार्टिन ल्युथर होत. ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध म्हणजे ब्राह्मण्याविरुद्ध त्यांची तक्रार हा आपल्याकडील प्रोटेस्टॅन्टिझम होय. आणि गेल्या दहा वर्षातील सत्यशोधक समाजाची चळवळ ही आमच्याइकडील रिफॉर्मेशनची चळवळ होय , हे तरुण पिढीने लक्षात ठेवावे... सरते शेवटी मला माझ्या ब्राह्मणेतर बंधूंना एवढेच सुचवायचे आहे की , सामाजिक व धार्मिक वादग्रस्त प्रश्न व त्यावरील मतभेद राजकीय चळवळीच्या आड येऊ देऊ नका.[४]

रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली संपादन

श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली गायकवाड्यातच व्हायच्या.[५]

केसरीवरच्या ताब्यासाठी संघर्ष संपादन

टिळकवादी आणि श्रीधरपंतांच्या संघर्षाचे कारण केसरीवरचा ताबा होता. केसरीच्या ताब्यावरूनच कोर्टकज्जे झाले. ' केसरी ताब्यात आला की महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईन', अशी श्रीधरपंतांची मनीषा होती. तर न. चिं. केळकर आणि केसरीच्या अन्य ट्रस्टींना हा टिळकदोह वाटत होता. त्यामुळे चांगला व्यासंग आणि तर्कशुद्ध लेखनशैली असूनही त्यांचे लेखन कधी केसरीत छापून आले नाही. त्यांच्या मृत्यूचीही बातमी फक्त एका छोट्या चौकटीत होती. त्या चौकटीत मात्र त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक होते.

आत्महत्या संपादन

श्रीधरपंतांनी २५ मे १९२८ रोजी भांबुर्डा येथे मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली जीव दिला. त्यांनी आत्महत्येआधी तीन पत्र लिहिली; एक पुण्याच्या कलेक्टरला , दुसरे विविधवृत्त साप्ताहिकाला आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना.(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'दुनिया' या साप्ताहिक मधे श्रीधरपंत विषयी लिहिले की,केवळ टिळकांचा मुलगा म्हणून नाही तर एक भारदस्त लेखक म्हणून श्रीधर टिळकांना केसरीमधे स्थान दिले गेले पाहिजे होते."टिळक घराण्यातील कोणाला लोकमान्य ही पदवी खरी शोभत असेल तर ते म्हणजे श्रीधरपंत टिळक.")कलेक्टरला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. '... मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता... एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो.'

त्यावेळी ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादावादी, बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्कीपर्यंत प्रकरणे चालली होती. अरसपरस फिर्यादींचे सत्र चालू होते. वाड्यातल्या राजकारणामुळे श्रीधरपंत नेहमी वैतागलेले असत. 'केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दखवीन' असे त्यांचे म्हणणे असल्याचा उल्लेख प्रबोधनकार ठाकरे करतात. श्रीधरपंतांचा(बापूचा) स्वभाव त्रासिक असला तरी फार सोशिक होता.

मनातली खळबळ, संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे, श्रीधरपंतांना अवघ्या पुण्यात प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे बिऱ्हाड हे एकच ठिकाण होते. वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली, तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झाले का बापू तडाड उठून प्रबोधनकार ठाकरेंकडे यायचे. अगदी मध्यरात्रीसुद्धा. पुणेरी राजकारणाच्या कंकासाला कंटाळून पुण्याला रामराम ठोकून ठाकरे दादरला आले नसते, तर कदाचित बापूने आत्महत्या केलीच नसती.

असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने ठाकऱ्यांपुढे ओकला का धीराच्यानी विवेकाच्या चार उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून ते त्याला शांत करीत असत. हरएक बऱ्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला , म्हणजे ते लोक मनांतल्या मनांत कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच श्रीधरपंत टिळकांची आत्महत्या ही दुदैवी घटना घडली!

[६][७]

स्रोत संपादन

श्रीधरपंतांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे साहित्य मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. रामभाऊ टिळक आणि प्रबोधनकार ठाकरे यांची आत्मचरित्रे , जयंतराव टिळकांनी लिहिलेले वारसा हे पुस्तक, य. दि. फडकेंनी लिहिलेला टिळकांचा मुलगा हा लेख, असे मोजकेच साहित्य आहे. श्रीधर बळवंत टिळक या नावाचे प्रा. डॉ. अनंत देशमुख यांनी लिहिलेले चरित्रही २००८ साली प्रकाशनाधीन होते.

बाह्यदुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Google's cache of It is a लोकसत्ता snapshot of the page as it appeared on 22 Dec 2009 09:17:43 GMT.[मृत दुवा]
  2. ^ a b Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3311682.cms. It is a snapshot of the page as it appeared on 18 Dec 2009 08:12:36 GMT.
  3. ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3311682.cms. जयवंतराव टिळकांची आठवण It is a snapshot of the page as it appeared on 18 Dec 2009 08:12:36 GMT.
  4. ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3311682.cms. विविधवृत्त It is a snapshot of the page as it appeared on 18 Dec 2009 08:12:36 GMT.
  5. ^ Google's cache of http://www.dainikgomantak.com/Gomantak/05072009/NT0008C2DE.htm.[मृत दुवा]It is a snapshot of the page as it appeared on 12 Dec 2009 07:35:30 GMT.
  6. ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3311665.cms. It is a snapshot of महाराष्ट्र टाईम्स the page as it appeared on 22 Dec 2009 01:18:18 GMT.
  7. ^ [Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3311664.cms. महाराष्ट्र टाईम्स snapshot of the page as it appeared on 22 Dec 2009 01:25:23 GMT.]