श्यामजी कृष्णवर्मा

श्यामजी कृष्णवर्मा भन्साळी (४ ऑक्टोबर, इ.स. १८५७:मांडवी, कच्छ जिल्हा, गुजरात - ३० मार्च, इ.स. १९३०:जिनिव्हा, स्वित्झर्लंड) हे भारतातील एक संस्कृत पंडित आणि सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी येथे झाला. यांचे वडील कृष्णवर्मा भन्साली आणि श्यामजींची आई दोघे श्यामजींच्या लहानपणी १८६७ साली वारले. श्यामजी यांचे पाथमिक शिक्षण मांडवी येथे तर हायस्कूल शिक्षण भूजमध्ये इंग्रजीतून झाले. त्यांच्या वडिलांच्या भाटिया नावाच्या मित्राने त्यांना मुंबईला नेले. तेथे विल्सन हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. त्याचवेळी त्यांनी एका पाठशाळेत संस्कृतचा अभ्यास केला. १८७५मध्ये त्यांना गोकुळदास कन्हैयादास बक्षीस मिळाले.

रामदास या श्रीमंत व्यापाऱ्याच्या भानुमती या बहिणीशी त्यांचा विवाह झाला (१८७५). माधवदास रघुनाथदास या सुधारकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विधवाविवाह चळवळीत भाग घेतला; तसेच स्वामी दयानंदांच्या आर्यसमाजाचे प्रचार-प्रसार कार्य करण्याकरिता त्यांनी नासिक, पुणे, अहमदाबाद, भूज, लाहोरपर्यंत दौरा केला (१८७७-७८). एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये असताना त्यांचा मोनिअर-विल्यम्सशी परिचय झाला होता. त्यावेळी विल्यम्स त्यांच्या संस्कृत व्यासंगाने थक्क झाले होते. त्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार करून, तसेच रामदास यांच्याकडून काही आर्थिक साहाय्य घेऊन उच्च् शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले (१८७९). ऑक्सफर्ड विदयापीठातून ते बी.ए. (१८८३) व नंतर बार अ‍ॅट लॉ झाले (१८८५). दरम्यान बर्लिन (जर्मनी) येथील अखिल प्राच्यविदया परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले (१८८४).

मुंबईला उच्च न्यायालयात वकिली करावी असे त्यांनी ठरविले; पण रतलामला त्यांना दिवाण म्हणून नेमणूक मिळाली. प्रकृति-अस्वास्थ्यामुळे पुढे त्यांनी राजीनामा दिला (१८८८). नंतर त्यांनी उदेपूर आणि जुनागढ संस्थानांतही दिवाण म्हणून काम केले; पण जुनागढच्या नबाबाशी मतभेद झाल्याने नोकरी सोडून ते पुण्यात आले (१८९५). लोकमान्य टिळकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला आणि ते प्रखर राष्ट्वादी बनले. लोकमान्य टिळकांच्या अटकेमुळे ते अस्वस्थ झाले (१८९७) आणि बिटिशांच्या अन्याय्य व भारतविरोधी धोरणाबद्दल त्यांच्या मनात द्वेष उत्पन्न झाला. ते इंग्लंडला गेले आणि लंडनमध्ये राहू लागले. लंडनमधल्या आयरिश, रशियन आणि इतर देशांच्या क्रांतिकारकांशी त्यांनी सौहार्दाचे संबंध जोडले. स्पेन्सर-मिल यांच्या लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तत्पूर्वी त्यांनी आफ्रिकेतील बोअर युद्धात बिटिशांविरूद्घ आवाज उठविला (१८९९).

बाह्य दुवेसंपादन करा