शरद व्याख्यानमाला, कारंजा लाड

वाशीम जिल्ह्यातील लाड कारंजे या शहरात इ.स. १९५८ साली प्राचार्य राम शेवाळकर यांच्या प्रेरणेतून शारदीय नवरात्रात या व्याख्यानमालेची सुरुवात झाली. लोकवर्गणीतून ही व्याख्यानमाला चालते. पहिले वक्ता कविभूषण बाबासाहेब खापर्डे होते. प्रबोधनाचा खुला मंच असे या व्याख्यानमालेचे स्वरूप आहे. सलग सात दिवस निरनिराळे वक्ते या व्याख्यानमालेत आपले विचार मांडतात. शहरातील मुळजी जेठा नगर परिषद शाळेच्या मैदानावर ही व्याख्याने होतात. श्रोतृवर्गात महिला आणि युवा वर्गाची लक्षणीय उपस्थिती असते.

पुढील काळात सेतू माधवराव पगडी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, नानासाहेब गोरे, प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी या व्याख्यानमालेत व्याख्याने दिली.

डॉ. कुमार सप्तर्षी, अरुण गुजराथी, विवेक घळसासी, प्रवीण दवणे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी देखील व्याख्यानमालेमध्ये हजेरी लावली आहे.