विकिपीडिया:सदर/मे २३
अल्बर्ट आईन्स्टाईन हे नाव सार्या जगाला ठाऊक आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी या विज्ञान-तपस्वीने एक सिद्धांत मांडला ज्याने या विश्वाचे रूप आणि मांडणी अधिक प्रगल्भतेने सांगितली. काळ आणि अवकाश हे एकमेकांना सापेक्ष असून सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितल्या प्रमाणे निरपेक्ष नाहीत असे त्यांनी या सिद्धांताद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही या क्रांतिकारक सिद्धांताला त्याच्या कसोटीनंतरच मान्यता मिळाली आणि त्यासाठी तब्बल दहा वर्षे वाट पहावी लागली. याचे एक कारण कदाचीत हे असावे की तत्कालीन प्रस्थापित शास्त्रज्ञ वर्गाला अल्बर्ट आईन्स्टाईन यांना नेमके काय सांगायचे आहे तेच लवकर उमगले नाही. इ.स. १९१५ साली एका ग्रहणाच्या वेळी घेतलेल्या निरक्षणांवरून अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सिद्धांताची यशस्वी पडताळणी झाली आणि "अवकाशाला वाकविणार्या आणि काळाच्या गतिला बदलविणार्या" शास्त्रज्ञास रातोरात प्रसिद्धीने आपलेसे केले. अल्बर्ट आईन्स्टाईन एवढी प्रसिद्धी कोणत्याही शास्त्रज्ञास ना त्यापूर्वी मिळाली आणि ना त्यानंतर आजपर्यंत.
जून ३० इ.स. १९०५ या दिवशी त्यांनी सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला आणि कित्येक जुने सिद्धांत कोसळून पडले आणि कित्येक नवीन सिद्धांतांनी त्यांची जागा घेतली. या सिद्धांताला आणि त्याच्या जनकाला अभिवादन करण्यासाठी इ.स. २००५ हे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
"झालेत बहु होतील बहु, परि या सम हाच!" - असे सार्थ वचन त्यांना लागू पडते.