विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१७

विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स. १९८८:दिल्ली, भारत - ) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएन च्या जगातील सर्वात जास्त विख्यात अॅथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे.

दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने एकदिवसीय विशेषज्ञ हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले. त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

२०१२ मध्ये कोहलीची एकदिवसीय क्रिकेट मध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोणीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.

पुढे वाचा... विराट कोहली