विकास महात्मे
डॉ. विकास हरिभाऊ महात्मे (जन्म : अमरावती, ११ डिसेंबर १९५७) हे एक भारतीय नेत्र शल्यचिकित्सक आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. [१]महात्मे यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वास्तव्य नागपूर येथे आहे. त्यांच्या धर्मादाय आणि सामाजिक कामासाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी एस. महात्मे नेत्र कल्याण धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय नागपूरमध्ये चालवले जाते. रुग्णालयाच्या मुंबई, अमरावती, गडचिरोली आणि पुणे येथे शाखा आहेत. नेत्रतज्ज्ञ म्हणून केलेल्या धर्मादाय कामासाठी महात्मे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला.[२] जून २०१६ मध्ये, डॉ. महात्मे राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, ही निवडणूक ते बिनविरोध जिंकले.[३] त्यांच्या उमेदवारीला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला होता. सध्या (२०१९ साली) ते भारतीय नर्सिंग परिषदेचे सदस्य आहेत.
डॉ. विकास महात्मे | |
---|---|
जन्म |
११ डिसेंबर, १९५७ अमरावती |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | नेत्रशल्य चिकित्सक |
प्रसिद्ध कामे | महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय |
पदवी हुद्दा | राज्यसभा खासदार |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
जोडीदार | डॉ. सुनिता महात्मे |
वडील | हरिभाऊ महात्मे |
पुरस्कार | पद्मश्री |
संकेतस्थळ http://www.mahatmehospital.com/ |
पार्श्वभूमी आणि शिक्षण
संपादन१९५७ मध्ये अमरावतीमधील वाठोडा शुक्लेश्वर या दुर्गम खेड्यात जन्मलेल्या महात्म्यांना लहानपणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घरी वीज नसल्यामळे ते मित्रांच्या घरी अभ्यासासाठी जात असत. त्यामुळे त्यांच्या स्वभावात तीव्र इच्छाशक्ती आणि नम्रता आली, असे त्यांना वाटते. त्यांचे वडील केंद्रिय अबकारी खात्यात काम करत होते. वडलांची बदली झाल्याने महात्मे त्यांच्याबरोबर नागपूरला आले आणि तेथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षा पूर्ण होईपर्यंत नागपूरलाच राहिले. नेत्रचिकित्सेत पदव्युत्तर पदवी घेतल्यावर त्यांनी नागपूर शहरातील आपल्या घराच्या अंगणात दवाखाना उघडला. [४]नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी व्याख्याता म्हणूनसुद्धा काम केले.
कारकीर्द
संपादननेत्र शल्यविशारद म्हणून डॉ. विकास महात्मे यांची मोठी कारकीर्द आहे. भारतातील अनेक ठिकाणी तसेच मलेशिया, इंडोनेशिया, रोमानिया, इजिप्त, इराक या देशांमध्ये त्यांनी शल्यचिकित्सेची प्रात्यक्षिके दाखविली. त्यांनी डोळ्यांची एक लाखाहून जास्त ऑपरेशन्स केलेली आहेत. ते जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. तसेच ते अमेरिकन ॲकॅडमी ऑफ ऑप्थल्माॅलॉजी, तसेच ऑल इंडिया ऑप्थल्माॅलॉजी सोसायटीचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी साईट सेव्हर, हेल्पेज इंडिया, इम्पॅक्ट इंडिया, एम्पथी फाउंडेशन, ऑर्बिस इंटरनॅशनल, आरपीजी फाउंडेशन, साद फाउंडेशन, वोकहार्ट फाउंडेशन, व्हिजन २०२० अशा अनेक स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर काम केले आहे.
समाजसेवा
संपादनमहात्मे नेत्र पेढी आणि नेत्र रुग्णालय
संपादनडाॅ. विकास हे महात्मे नेत्रपेढी आणि नेत्र रुग्णालयाचे संस्थापक आणि वैद्यकीय संचालक आहेत. २०१७ पर्यंत या रुग्णालयात, ८०,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेल्या आहेत.
सामाजिक कार्य
संपादनडॉ. महात्मे यांनी महाराष्ट्रातील विदर्भ भागात पहिली नेत्रपेढी सुरू केली आणि तिथे नेत्रदान चळवळीला चालना दिली. त्यांची टीम ग्रामीण, आदिवासी भाग, तसेच झोपडपट्ट्यांना भेट देते आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी शिबिरे भरवते. त्यांनी दुर्गम ग्रामीण भागात नेत्र तपासणीसाठी आंखवाली पम- पम (फिरते नेत्र तपासणी केंद्र) सुरू केली.
आरोग्य जागृती मोहिमा
संपादनदूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, वृत्तपत्रातील लेख, पथनाट्ये याद्वारे आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात विकास महात्मे यांचा पुढाकार असतो. सामान्य माणसासाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजना आणि लोकांचे आरोग्याबद्दलचे हक्क याची माहिती देण्यासाठी त्यांनी ‘ आरोग्याचा अधिकार चळवळ’ सुरू केली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे जमणाऱ्या लाखो लोकांसाठी त्यांचा ट्रस्ट दरवर्षी मोफत नेत्र तपासणी शिबीर भरवतो.
संदर्भ
संपादन- ^ "Dr. Vikas Mahatme | National Portal of India". www.india.gov.in. 2019-11-10 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-10 रोजी पाहिले.
- ^ "Piyush Goyal, Chidambaram, Suresh Prabhu, Sharad Yadav elected to Rajya Sabha". The Economic Times. 2016-06-03. 2019-11-10 रोजी पाहिले.
- ^ Edition, Ocular Surgery News Asia Pacific; April 2010. "From one room, ophthalmologist builds eye hospital network". www.healio.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-10 रोजी पाहिले.