विंडोज २०००
विंडोज २००० ही मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या व्यक्तिगत संगणक[श १], सर्व्हर व लॅपटॉप या संगणकांवर वापरल्या जाणाऱ्या संचालन प्रणाल्यांच्या मालिकेतील एक संचालन प्रणाली[श २] आहे. विंडोज २००० ही डिसेंबर १५, १९९९ रोजी उत्पादनासाठी प्रकाशित तर रिटेलसाठी फेब्रुवारी १७, २००० रोजी प्रकाशित झाली. तो विंडोज एनटी ४.० या संचालन प्रणालीची अनुक्रमिक आहे. या प्रणालीच्या प्रकाशनानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोजची विंडोज ९क्ष मालिका खंडित करून विंडोज एनटी मालिकेला मुख्य मालिका केले. या प्रणालीचे अनुक्रमिक विंडोज एक्सपी ऑक्टोबर २००१ रोजी प्रकाशित झाले. विंडोज सर्व्हर २००३ ही खास सर्व्हरसाठीची प्रणाली विंडोज २००० सर्व्हर आवृत्तीची अनुक्रमिक ठरली व ती एप्रिल २००३ मध्ये प्रकाशित झाली. विंडोज एमई ही संचालन प्रणाली विंडोज २००० च्या सात महिने नंतर व विंडोज एक्सपीच्या एक वर्ष आधी प्रकाशित झाली, पण ती विंडोज २०००ची अनुक्रमिक ठरली नाही व तसा मूळ उद्देशही नव्हता. विंडोज एमईची रचना घरगुती वापरासाठी होती तर विंडोज २०००ची रचना व्यावसायिक वापराकरिता होती.
विंडोज २००० | |
---|---|
मायक्रोसॉफ्ट विंडोज चा एक भाग | |
"विंडोज २००० व्यावसायिक" ची झलक | |
विकासक | |
मायक्रोसॉफ्ट | |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
आवृत्त्या | |
प्रकाशन दिनांक | रिटेल: १७ फेब्रुवारी २००० (माहिती) |
सद्य आवृत्ती | ५.० (बिल्ड २१९५, सर्व्हिस पॅक ४) (सप्टेंबर १३, २००५) (माहिती) |
परवाना | प्रताधिकारित व्यापारी सॉफ्टवेर |
केर्नेल प्रकार | हायब्रिड केर्नेल |
पूर्वाधिकारी | विंडोज एनटी ४.० |
उत्तराधिकारी | विंडोज एक्सपी, विंडोज सर्व्हर २००३ |
समर्थन स्थिती जुलै १३, २०१० पासून असमर्थित |
विंडोज २००० च्या एकूण चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. इथे त्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत: प्रोफेशनल (व्यावसायिक), सर्व्हर, ॲडव्हान्स्ड सर्व्हर (सुधारित सर्व्हर) आणि डेटासेन्टर सर्व्हर (माहितीकेंद्र सर्व्हर). मायक्रोसॉफ्टने विंडोज २००० च्या सर्व्हरसाठीच्या विंडोज २००० ॲडव्हान्स्ड सर्व्हर लिमिटेड एडिशन आणि विंडोज २००० डेटासेन्टर सर्व्हर लिमिटेड एडिशन या दोन आवृत्त्या प्रकाशित केल्या. या आवृत्त्या ६४-बिट इंटेल इटॅनियम लघुप्रक्रियकांवर[श ३] चालणाऱ्या होत्या. या आवृत्त्या मायक्रोसॉफ्टने २००१ मध्ये प्रकाशित केल्या. विंडोज २००० च्या आवृत्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी असल्या तरीही त्यांच्या गाभ्यातील मायक्रोसॉफ्ट मॅनेजमेंट कन्सोल आणि मानक प्रणाली प्रशासनासारख्या अनेक सुविधा सारख्याच होत्या.
अपंग व्यक्तींसाठी असलेल्या सुविधा विंडोज एनटी ४.० पेक्षा विंडोज २००० मध्ये अधिक प्रमाणात आहेत. विंडोज २००० मध्ये अनेक सहाय्यक तंत्रज्ञाने आहेत तसेच मायक्रोसॉफ्टने वेगवेगळ्या भाषांमधून ही प्रणाली वापरण्याची सुविधा दिली आहे.
विंडोज २००० च्या सर्व आवृत्त्या एनटीएफएस (नवीन तंत्रज्ञान संचिका प्रणाली) व एन्क्रिप्टिंग फाइल सिस्टिम (सांकेतिक संचिका प्रणाली) त्याचप्रमाणे मूलभूत व गतिमान डिस्क स्टोरेज या सर्व संचिका प्रणाल्यांना समर्थन देतात. विंडोज २००० च्या सर्व्हरसाठीच्या आवृत्त्यांमध्ये ॲक्टिव्ह डिरेक्टरी सेवा पुरवण्याची सुविधा (स्रोतांचा श्रेणीबद्ध साचा) आणि डिस्ट्रिब्युटेड फाइल सिस्टिम (वितरित संचिका प्रणाली) (संचिका इकडून तिकडे नेण्याची सुविधा असलेली संचिका प्रणाली) या अतिरिक्त सुविधा होत्या. विंडोज २०००ची स्थापना ही मानवचलित किंवा स्वयंचलित या दोन प्रकारे करता येते. स्वयंचलितरित्या विंडोज २०००ची स्थापना करताना त्यातील सॉफ्टवेर उत्तर संचिकांचा आधार स्थापनेत विचारलेली माहिती भरते.
मायक्रोसॉफ्टने विंडोज २०००ची जाहिरात त्यावेळची विंडोज मालिकेतील सर्वांत सुरक्षित प्रणाली अशी केली. तरीही ती त्यावेळी कोड रेड व निम्डा सारख्या अनेक संगणकीय विषाणूंचे लक्ष्य बनली व त्यांना बळी पडली. विंडोज २०००ला तिच्या प्रकाशनानंतर जुलै १३, २०१० रोजी असमर्थित होण्यापूर्वी सलग दहा वर्षे दर महिन्याला सुरक्षेतील त्रुटी भरून काढण्यासाठी अद्ययावते मिळत असत.
इतिहास
संपादनहे सुद्धा पहा: मायक्रोसॉफ्ट विंडोजचा इतिहास
विंडोज २००० ही संचालन प्रणाली मायक्रोसॉफ्टच्या विंडोज एनटी या संचालन प्रणाल्यांच्या मालिकेतील एक संचालन प्रणाली आहे. तिची पूर्वक्रमिक विंडोज एनटी ४.० आहे. विंडोज २००० साठी प्रथम विंडोज एनटी ५.० हे नाव ठरवण्यात आले होते. विंडोज एनटी ५.०ची पहिली बीटा आवृत्ती सप्टेंबर १९९७ मध्ये प्रकाशित झाली तर दुसरी बीटा आवृत्ती ऑगस्ट १९९८ मध्ये प्रकाशित झाली. ऑक्टोबर २७, १९९८ रोजी मायक्रोसॉफ्टने या संचालन प्रणालीचे अंतिम नाव "विंडोज २०००" असेल असे घोषित केले. हे नाव या प्रणालीच्या प्रकाशन दिनांक दर्शवत होते. जानेवारी १९९९ मध्ये विंडोज २०००ची तिसरी बीटा आवृत्ती प्रकाशित झाली. विंडोज २०००ची सांकेतिक नावे विंडोज एनटी ५.० व मेम्फिसएनटी (MemphisNT) ही आहेत. विंडोज २००० सेवा पॅक १ चे सांकेतिक नाव "ॲस्टेरॉइड" असे ठरवण्यात आले होते तर विंडोज २००० ६४-बिट प्रणालीचे सांकेतिक नाव "जानस" ठेवण्यात आले होते. विकासाच्या काळात डीईसी अल्फा संगणकासाठी एक आवृत्ती तयार करण्यात आली होती. प्रकाशन उमेदवाराच्या[श ४] प्रकाशनानंतर कॉम्पॅक या कंपनीने डीईसी अल्फासाठीचे विंडोज एनटीचे समर्थन काढून घेतल्यावर ही आवृत्ती तशीच सोडून देण्यात आली होती. येथून मग पुढे मायक्रोसॉफ्टने जुलै १९९९ ते नोव्हेंबर १९९९ या काळात तीन प्रकाशन उमेदवार प्रकाशित केले आणि अखेरीस डिसेंबर १२, १९९९ रोजी विंडोज २००० ही मायक्रोसॉफ्टच्या भागीदारांसाठी प्रकाशित झाली. लोकांसाठी विंडोज २०००ची संपूर्ण आवृत्ती फेब्रुवारी १७, २००० रोजी प्रकाशित झाली. या घटनेच्या तीन दिवस आधी मायक्रोसॉफ्टने विंडोज २०००ची जाहिरात "विश्वाससार्हतेतील एक मानक" म्हणून केली. याच दिवशी मेरी जो फोले यांच्याकडून मायक्रोसॉफ्टने सादर केले एक स्मृतिपत्र फुटले व त्यात विंडोज २००० मध्ये "६३,०००हून अधिक ज्ञात त्रुटी" असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर मायक्रोसॉफ्टने मेरी जो फोले यांना काही काळासाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकले. तरीही, अब्राहम सिल्बर्टचात्झ आणि इतरांनी "विंडोज २००० ही मायक्रोसॉफ्टने त्यावेळी प्रकाशित केलेली सर्वांत जास्त विश्वासार्ह व स्थिर संचालन प्रणाली होती. ह्यातील विश्वासार्हता ही परिपक्व स्रोत संहितेतून[श ५], प्रणालीचा बाह्य ताण तपासणे व चालकांतील अनेक महत्त्वाच्या चुका स्वयंचलितरीत्या ओळखणे यातून येते." असे विधान त्यांच्या संगणक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून केले. इन्फर्मेशनवीक या साप्ताहिकाने विंडोज २००० च्या परीक्षणाचा सारांश "आमची परीक्षणे सांगतात की विंडोज एनटी ४.० च्या अनुक्रमिकामध्ये आम्हाला जे अपेक्षित होते ते सर्व आहे. अर्थातच, विंडोज २००० परिपूर्ण नाही." अशा शब्दात सांगितला. वायर्ड न्यूजने नंतर विंडोज २००० या संचालन प्रणालीचे "सुमार" म्हणून वर्णन केले. नोवेल या कंपनीने मायक्रॉसॉफ्टच्या ॲक्टिव्ह डिरेक्टरीची चिकित्सा केली आणि असे प्रतिपादन केले की मायक्रोसॉफ्टची ॲक्टिव्ह डिरेक्टरी ही नोवेलच्या स्वतःच्या नोवेल डिरेक्टरी सर्व्हिसेस पेक्षा कमी विश्वासार्ह आहे.
विंडोज २००० ही आधी ठरवल्याप्रमाणे विंडोज ९८ व विंडोज एनटी ४.० या दोन्ही प्रणाल्यांची अनुक्रमिक ठरणार होती. परंतु, यात बदल होऊन विंडोज ९८ची एक अद्ययावत केलेली आवृत्ती विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती १९९९ मध्ये प्रकाशित झाली तर विंडोज एमई ही संचालन प्रणाली २००० च्या उत्तरार्धात प्रकाशित झाली. विंडोज २००० सेवा पॅक १ च्या प्रकाशित होण्याच्या काळातच मायक्रोसॉफ्टने विंडोज २००० डेटासेन्टर सर्व्हर आवृत्ती प्रकाशित केली. सप्टेंबर २९, २००० रोजी प्रकाशित झालेल्या विंडोज २००० डेटासेन्टर सर्व्हर आवृत्तीमध्ये ३२ प्रक्रियकांना समर्थन होते.
फेब्रुवारी २४, २००४ रोजी किंवा त्याच्या थोडा काळ आधी मायक्रोसॉफ्ट विंडोज २००० व विंडोज एनटी ४.० यांच्या स्रोत संहितांचा काही भाग आंतरजालावर बेकायदेशीररित्या उपलब्ध झाला. स्रोत संहिता बेकायदेशीररित्या प्रकाशित करणारा मात्र अघोषित आहे. या घटनेस प्रत्त्युत्तर म्हणून मायक्रोसॉफ्टने खालील निवेदन प्रसारित केले:
"मायक्रोसॉफ्टची स्रोत संहिता ही स्वामित्वाधिकारित[श ६] आहे आणि व्यापारातील गुपित म्हणून संरक्षितही आहे. या कारणास्तव ती प्रसारित करणे, इतरांना उपलब्ध करून देणे, उतरवून घेणे व वापरणे बेकायदेशीर आहे."
मायक्रोसॉफ्टच्या या इशाऱ्याचा काहीही परिणाम झाला नाही. फुटलेली स्रोत संहिता असलेला संग्रह संचिका आदानप्रदान जालावर मोठ्या प्रमाणात पसरला.
नवीन आणि अद्ययावत केलेल्या सुविधा
संपादनविंडोज २००० ने विंडोज एनटी मालिकेमध्ये विंडोज ९८ व विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती यांत असलेल्या अनेक नवीन सुविधा आणल्या, जशा की विंडोज डेस्कटॉप अपडेट, इंटरनेट एक्सप्लोरर ५ (इंटरनेट एक्सप्लोरर ६, २००१ मध्ये प्रकाशित झालेला असला तरीही तो विंडोज २००० साठी उपलब्ध आहे), आउटलूक एक्सप्रेस, नेटमीटिंग, फॅट३२ समर्थन, विंडोज ड्रायव्हर मॉडेल, इंटरनेट कनेक्शन शेअरिंग, विंडोज मीडिया प्लेयर, वेबडीएव्ही समर्थन इत्यादी. काही नवीन सुविधा विंडोज २००० च्या सर्व आवृत्त्यांमध्ये सारख्याच आहेत, जशा की एनटीएफएस (न्यू टेक्नॉलॉजी फाइल सिस्टिम) ३.०, मायक्रोसॉफ्ट मॅनेजमेंट कन्सोल, यूडीएफ (युनिव्हर्सल डिस्क फॉरमॅट) समर्थन, एन्क्रिप्टिंग फाइल सिस्टिम (ईएफएस) समर्थन, लॉजिकल डिस्क मॅनेजर, इमेज कलर मॅनेजमेंट (चित्र रंग व्यवस्थापन) २.०, पोस्टस्क्रिप्ट ३ आधारित छापकांसाठी[श ७] समर्थन, ओपनटाईप (.OTF) व टाईप १ पोस्टस्क्रिप्ट (.PFB) या प्रकारच्या टंकांसाठी समर्थन, डेटा प्रोटेक्शन एपीआय (डीपीएपीआय), एलडीएपी/ॲक्टिव्ह डिरेक्टरी सक्षमित केलेले ॲड्रेस बुक, सामर्थ्य सुधारणा आणि अनेक भाषांसाठी समर्थन इत्यादी. विंडोज २००० ने यूएसबी छापकांसाठी युएसबी उपकरण प्रकार चालक, मास स्टोरेज प्रकार उपकरणे, छापक व स्कॅनर[मराठी शब्द सुचवा] यांसाठी सुधारित फायरवायर सीरियल बस प्रोटोकॉल २ समर्थन आणि साठवण उपकरणांसाठी सुरक्षितरीत्या काढणे नावाचा छोटा प्रोग्राम (ॲप्लेट) या गोष्टी सादर केल्या. विंडोज २००० चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती विंडोज मालिकेतील संचालन प्रणाली पातळीवरील निष्क्रियावस्थेला (संचालन प्रणालीने नियंत्रित केलेली सुधारित संरुपण आणि शक्ती व्यक्तिरेखा एस४ निद्रावस्था) समर्थन देणारी पहिली संचालन प्रणाली आहे. विंडोज ९८ या प्रणालीला यासाठी यंत्रसामग्री[श ८] उत्पादकाकडून किंवा चालक विकासकाकडून विशेष चालकांची गरज भासे.
विंडोज २००० मध्ये अत्यंत महत्त्वाच्या संचालन प्रणालीच्या संचिकांचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन विंडोज संचिका संरक्षण नावाचे संरक्षण सादर करण्यात आले. यामुळे विंडोजच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रणाली संचिकांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या संचालन प्रणालीसाठीच्या अद्ययावतांची कार्यतंत्रे जसी की पॅकेज स्थापक, विंडोज स्थापक सोडून बाकी कोणत्याही प्रोग्रामद्वारे बदल करता येणे अशक्य झाले. विंडोज प्रणाली संचिका तपासक या नवीन सुविधेमुळे वापरकर्त्यांना सर्व सुरक्षित केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या प्रणाली संचिकांची एकात्मता तपासता येते तसेच जर गरज भासली तर त्यांना दुरुस्त करता येते. या अतिमहत्त्वाच्या संचिका जर नष्ट झाल्या असतील तर "डीएलएलकॅशे" (DLLCACHE) या स्वतंत्र विषयसूचीत[श ९] साठवून ठेवलेल्या विदागारातून[श १०] त्यांना परत आणता येते. वापरकर्ता नष्ट झालेल्या अतिमहत्त्वाच्या प्रणाली संचिका स्थापन माध्यमातूनही आणू शकतो.
मायक्रोसॉफ्टच्या असे लक्षात आले की एका गंभीर दोषामुळे किंवा एका थांबवण्याच्या दोषामुळे सर्व्हरमध्ये दोष उद्भवतात. सर्व्हर हे सतत चालू असणे आवश्यक असते परंतु या दोषांमुळे सर्व्हरचे कार्य सुरळीत होत नाही. यावर उपाय म्हणून मायक्रोसॉफ्टने एक नवीन प्रणाली मांडणी पुरवली जिच्यामुळे वरीलप्रमाणे दोष उद्भवल्यास सर्व्हर स्वतःचा बंद होतो व पुन्हा सुरू होतो. मायक्रोसॉफ्टने विंडोज २००० वापरणारे सर्व्हर सुधारावेत म्हणून प्रणाली प्रशासकांना पार्श्वभूमी सेवांसाठी किंवा ॲप्लिकेशन्ससाठी संचालन प्रणालीची स्मृती आणि प्रक्रियक वापर प्रतिमाने सुधारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. विंडोज २००० ने विंडोज स्थापक, विंडोज मॅनेजमेन्ट इन्स्ट्रुमेन्टेशन व इव्हेंट ट्रेसिंग फॉर विंडोज या गाभा प्रणाली प्रशासन व व्यवस्थापन सुविधा उपलब्ध करून दिल्या.
'प्लग अँड प्ले' आणि यंत्रसामुग्री समर्थनातील सुधारणा
संपादनविंडोज २००० मधील सर्वांत उल्लेखनीय बदल संपूर्ण सुधारित संरुपण आणि शक्ती व्यक्तिरेखा व विंडोज चालक प्रतिमानासाठी समर्थन असणाऱ्या "प्लग अँड प्ले"ची भर होय. विंडोज ९क्ष मालिकेतील प्रणाल्यांप्रमाणे विंडोज २००० ही स्थापन केलेल्या यंत्रसामुग्री स्वयंचलितरीत्या ओळखणे, यंत्रसामुग्री स्रोत विभागणी, योग्य ते चालक चढवणे, पीएनपी ॲपीआय (ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) व उपकरण सूचनाप्रसंग यांना समर्थित करते. केर्नेल पीएनपी व्यवस्थापक आणि शक्ति व्यवस्थापक यांची भर या विंडोज २००० मधील दोन महत्त्वपूर्ण उपप्रणाल्या आहेत.
विंडोज २००० ने छापण्यासाठीच्या चालकांची तृतीय आवृत्ती (वापरकर्ता प्रकार छापक चालक) सादर केली. उपकरणांवरील ताण तपासण्यासाठी व उपकरण चालकातील त्रुटी शोधण्यासाठी ड्रायव्हर व्हेरीफायर (चालक पडताळक) सादर करण्यात आला.
बाह्यावरण
संपादनविंडोज २००० ने पारदर्शकता, अर्धपारदर्शकता तसेच सावल्या, प्रवणता पूर्तके व सर्वोच्च पातळीच्या खिडक्यांसाठी अल्फा एकजीव चित्रमय वापरकर्ता व्यक्तिरेखा घटक हे वापरता यावेत म्हणून स्तरित खिडक्या सादर केल्या. सूची धूसर (Fade) या नवीन संक्रमण परिणामासाठी समर्थन देतात.
विंडोज २००० मधील सुरुवात सूची वैयक्तिकीकृत सूची, प्रसरणशील विशेष फोल्डर्स तसेच SHIFT
(शिफ्ट) ही कळ तशीच धरून ठेवून सूची बंद न करता अनेक प्रोग्राम्स उघडण्याची सुविधा सादर करते. एक Re-sort (रि-सॉर्ट) नावाची कळ सर्वच्या सर्व सुरुवात सूचीतील नावे वर्णक्रमानुसार लावण्यास भाग पाडते. कार्यपट्टी फुग्यांद्वारे सूचना दाखविण्याच्या सुविधेस समर्थन देते. ही सुविधा ॲप्लिकेशनचे विकासकही वापरू शकतात. विंडोज २००० मधील एक्सप्लोरर अनुकूलित करता येण्याजोग्या विंडोज एक्सप्लोरर साधनपट्ट्या, विंडोज एक्सप्लोररमधल्या "रन बॉक्स" व पत्तापट्टीमध्ये स्वयंरीत्या मजकूर पूर्ण करणे, सुधारित संचिका प्रकार समाज सुविधा, लघुपथांमध्ये साधनटिपण्या म्हणून अभिप्राय दर्शवणे, "सविस्तर माहिती" या दर्शन प्रकारात विस्तारक्षम स्तंभ ("आयकॉलमप्रोव्हायडर" व्यक्तिरेखा), संचिकाचिन्हे अधिचित्रित, विंडोज एक्सप्लोररमध्येच सामावलेली शोधपट्टी, सूचींसाठी "सॉर्ट बाय नेम" (नावानुसार विल्हेवारी लावणे) ही नवीन सुविधा, "ओपन" (उघडणे) व "सेव्ह" (जतन करणे) या सामान्य चौकटींमध्ये "प्लेसेस बार" (स्थानपट्टी)ची भर या नवीन सुविधा विंडोज २००० एक्सप्लोररमध्ये सादर करण्यात आहेत.
विंडोज २००० मध्ये विंडोज एक्स्प्लोरर या महत्त्वाच्या घटकामध्ये खूपच सुधारणा करण्यात आली आहे. ती ॲक्टिव्ह डेस्कटॉप हा घटक असणारी विंडोज एनटी मालिकेमधील पहिलीच संचालन प्रणाली आहे. ॲक्टिव्ह डेस्कटॉप हा घटक इंटरनेट एक्सप्लोरर ४ ह्या मायक्रोसॉफ्टच्या आंतरजाल न्याहाळकातील (विशेषतः विंडोज डेस्कटॉप अपडेट) एक भाग म्हणून सादर करण्यात आला. त्यावेळी हा घटक फक्त विंडोज ९८ या संचालन प्रणालीमध्येच पूर्वस्थापित होता. या सुविधेद्वारे वापरकर्त्यांना फोल्डरच्या दिसण्यामध्ये बदल करून ते अनुकुलित करता येतात. तसेच याद्वारे एचटीएमएल मध्ये लिहिलेले साचे वापरून या फोल्डर्सच्या दिसण्याची वर्तणूक बदलण्याची मुभा मिळाली. एचटीएमएल मध्ये लिहिलेल्या साचांचा संचिकेच्या प्रकाराचे सांकेतिक नाव HTT
हे असते. संगणकीय विषाणूंनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. जावा भाषेतील छोटे प्रोग्राम्स वापरणारे, वाईट संहिता वापरणारे व ॲक्टिव्हएक्स नियंत्रके वापरणाऱ्या संगणकीय विषाणू यात आघाडीवर होते. ते ज्या गोष्टी वापरत त्यांचा त्यांना फोल्डर साचा संचिकांमध्ये प्रवेश करण्यासाठी विषाणूवाहक म्हणून उपयोग होत असे. या सुविधेचा अशाप्रकारे गैरवापर करणारे दोन ज्ञात संगणकीय विषाणू व्हीबीएस/रूर-सी (VBS/Roor-C) व व्हीबीएस.रेडलॉफ.ए. (VBS.Redlof.a.) हे आहेत. अनुकूलित करता येण्याजोग्या विंडोज एक्सप्लोरर साधनपट्ट्या, विंडोज एक्सप्लोररमधल्या "रन बॉक्स" व पत्तापट्टीमध्ये स्वयंरीत्या मजकूर पूर्ण करणे, सुधारित संचिका प्रकार समाज सुविधा, लघुपथांमध्ये साधनटिपण्या म्हणून अभिप्राय दर्शवणे, विंडोज एक्सप्लोररमध्येच सामावलेली शोधपट्टी, सूचींसाठी "सॉर्ट बाय नेम" (नावानुसार विल्हेवारी लावणे) ही नवीन सुविधा, "ओपन" (उघडणे) व "सेव्ह" (जतन करणे) या सामान्य चौकटींमध्ये "प्लेसेस बार" (स्थानपट्टी)ची भर याही नवीन सुविधा विंडोज २००० एक्सप्लोररमध्ये सादर करण्यात आहेत.
विंडोज २००० मध्ये आंतरजाल शैलीसारखे फोल्डरचे दृश्य तयार करण्यात आले असून मूलतः तेच ठेवण्यात आले आहे. यामध्ये सर्वांत डावीकडील तावदान निवडलेल्या संचिकेची माहिती दर्शवते. चित्र तसेच इतर माध्यमे प्रकारच्या काही विशेष संचिकांसाठी त्यांचे पूर्वावलोकनही डावीकडील तावदानावर दर्शवले जाते. विंडोज व्हिस्टा या संचालन प्रणालीने त्यामधील एक्सप्लोररमध्ये नवीन अनेक सुविधा असलेले डावीकडील तावदान सादर करेपर्यंत विंडोज २००० हे आंतरक्रिया माध्यम[श ११] चालक हा मूलतः श्रवणीय व दर्शनीय प्रकारच्या संचिकाचे पूर्वावलोकन करणारा म्हणून असलेले एकमेव विंडोजचे प्रकाशन होते. परंतु विंडोज २००० आधीच्या विंडोजच्या संचालन प्रणाल्यांमध्ये या प्रकारचा पूर्वावलोकन करणारा फोल्डर अनुकूलीकरण साच्यांच्या वापरामार्फत विंडोज डेस्कटॉप अपडेटच्या माध्यमातून चालू करता येतो. विंडोज २००० मध्ये संचिकेचे नाव जेथे दर्शवलेले असते तेथे संगणकीय स्थानदर्शक[श १२] नेल्यास वापरकर्त्याला संचिकेचे शीर्षक, संचिका लेखक, विषय व टिपण्या इत्यादी गोष्टी दिसतात. ही माहिती संचिका जर एनटीएफएसवर असेल तर विशेष एनटीएफएस प्रवाहातून वाचता येते किंवा जर संचिका ही संरचित दस्तऐवज असेल तर ओएलईच्या संरचित संचयनातून वाचता येते. सर्व मायक्रोसॉफ्ट ऑफिस दस्तऐवज ऑफिस ४.० आवृत्तीपासून संरचित संचयनाचा वापर करतात त्यामुळे त्यांची माहिती ही विंडोज २००० च्या संगणकीय स्थानदर्शकाने दिसू शकते. संचिका लघुपथसुद्धा टीपा साठवू शकतात व त्या संगणकीय स्थानदर्शक लघुपथावर नेल्याने दिसतात. एक्सप्लोररच्या "तपशील दाखवा" (Details View) मधील माहिती हाताळक, चिन्ह[श १३] हाताळक व स्तंभ हाताळक याद्वारे बाह्यावरण वृद्धी समर्थन देते.
विंडोज २००० एक्सप्लोररमधील उजवीकडचा फलक[श १४] जो आधीच्या प्रणाल्यांमध्ये फक्त संचिका व फोल्डर यांची यादी दाखवे तो या आवृत्तीत अनुकूलित करण्याची सुविधा उपलब्ध झाली. उदाहरणार्थ, प्रणालीच्या फोल्डरमधील संचिका दर्शविल्या जात नाहीत, तर त्याजागी वापरकर्त्याला या फोल्डरमधील घटक बदलण्याने संगणक प्रणालीला धोका पोहोचेल असे लिहिलेला एक इशारा येतो. फोल्डर साचा संचिकांमध्ये डीआयव्ही मूलतत्त्वे वापरून अधिक एक्सप्लोररचे फलक तयार करणे शक्य झाले आहे. अनुकूलनाची ही पातळी विंडोज २००० मध्ये नवीन आहे, विंडोज ९८ किंवा डेस्कटॉप अद्ययावते यांना ते पुरवणे शक्य झाले नाही. विंडोज २००० च्या एक्सप्लोररमध्ये डीएचटीएमएलवर आधारित शोधफलक हा एक्सप्लोररमध्येच एकत्रित केला आहे. आधीच्या आवृत्त्यांमध्ये मात्र शोध घेण्यासाठीची चौकट ही एक्सप्लोररपासून वेगळी असे. अनुक्रमण[श १५] सेवासुद्धा संचलन प्रणालीबरोबर एकत्रित करण्यात आली असून एक्सप्लोररमधील शोधफलक त्याच्या माहितीसंग्रहाने अनुक्रमित संचिकांचा शोध घेण्याची मुभा देतो.
एनटीएफएस ३.०
संपादनमायक्रोसॉफ्टने विंडोज २०००चा भाग म्हणून नवीन तंत्रज्ञान संचिका प्रणाली (एनटीएफएस)ची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली, जी गाभा आवृत्तीच्या क्रमांकामुळे कधीकधी चुकून एनटीएफएस ५ अशी संबोधली जाते. यामध्ये चकती वाटे (कोटाॲडव्हायजर यांनी पुरवले), संचिका-प्रणाली पातळीवरील कूटबद्धता[श १६], विरळ संचिका व रिपार्स बिंदू या नवीन सुविधा उपलब्ध झाल्या. विरळ संचिकांमुळे फर मोठ्या तरीही मोठ्या भागात शून्ये असलेल्या माहिती संचांची कार्यक्षम साठवण करणे शक्य होते. रिपार्स बिंदू हे वस्तू व्यवस्थापकास संचिका नामविश्व तपासणी पुनर्निर्धारित करू देतात व संचिका प्रणाली चालकांना पारदर्शक पद्धतीने बदललेली कार्यक्षमता अंमलात आणू देतात. रिपार्स बिंदू हे व्हॉल्युम माउंट बिंदू, जंक्शन बिंदू, श्रेणीबद्ध साठवण व्यवस्थापन, स्थानिक संरचित साठवण व एक-उदाहरण साठवण इ. अंमलात आणण्यासाठी वापरले जातात. व्हॉल्युम माउंट बिंदू व डायरेक्टरी जंक्शन बिंदू हे एक संचिका किंवा निर्देशिकेला दुसऱ्या निर्देशिकेत पारदर्शकपणे उल्लेख करण्याची मुभा देतात.
विंडोज २००० मध्ये दुवा शोधण्याची वितरित सेवा सादर करण्यात आली जिच्यामुळे दुव्याचे लक्ष्य हे स्थानांतरित झाले किंवा लक्ष्याचे नाव बदलण्यात आले तरीही तो दुवा कार्यरत राहू शकतो. लक्ष्य संचिका एकमेव अभिज्ञापक[श १७] हा एनटीएफएस ३.० मध्ये दुवा संचिकेत साठवला जातो. विंडोज ही दुवा शोधण्याची वितरित सेवा दुव्यांची लक्ष्ये शोधण्यासाठी वापरू शकते, त्यामुळे लक्ष्य संचिका जरी दुसऱ्या हार्ड डिस्कवर स्थानांतरित झाली तरी दुवा आपोआप अद्ययावत होऊ शकतो.
संचिका प्रणालीमधील कूटबद्धता
संपादनसंचिका प्रणालीमधील कूटबद्धतेने विंडोजमध्ये संचिका प्रणाली पातळीवर शक्तिशाली कूटबद्धता सादर केली. यामुळे एनटीएफएस खंडामधील कोणतीही संचिका किंवा संचिकासमूह वापरकर्ता पारदर्शकपणे कूटबद्ध करू शकतो.
सामान्य व गतिमान साठवण
संपादनविंडोज २००० ने तार्किक चकती व्यवस्थापक व गतिमान साठवणीसाठी डिस्कपार्ट आज्ञा सुविधा या नवीन सुविधा सादर केल्या. मूलभूत चकत्यांबरोबरच विंडोज २००० च्या सर्व आवृत्त्या तीन प्रकारच्या गतिमान चकती खंडांना समर्थन देतात: साधा खंड, पसरलेला खंड व पट्ट्यांचा खंड.
- साधा खंड: एका चकतीपासून घेतलेली चकती जागा असलेला खंड.
- पसरलेला खंड: यामध्ये ३२ चकत्या एकच म्हणून दाखवल्या जातात, त्यामुळे आकारमान वाढते पण कार्यक्षमता वाढत नाही. एक चकती बिघडल्यास सर्व रचना नष्ट होते. काही माहिती पुन्हा मिळणे शक्य असते. हे आरएआयडी-१ शी जुळत नाही, तर जेबीओएडशी जुळते.
- पट्ट्यांचा खंड: आरएआयडी-० या नावानेही ओळखला जातो. यामध्ये माहिती विविध चकत्यांमध्ये पट्ट्यांच्या स्वरूपात साठवली जाते. यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होते कारण चकतीचे लेखन व वाचन हे अनेक चकत्यांमध्ये समप्रमाणात विभागले जाते. पसरलेल्या खंडांप्रमाणेच रचनेतील एक चकती बिघडल्यास सर्व रचना नष्ट होते. काही माहिती पुन्हा मिळवणे शक्य असते.
या तीन चकती खंडांबरोबरच विंडोज २००० सर्व्हर, विंडोज २००० ॲडव्हान्स्ड (प्रगत) सर्व्हर, विंडोज २००० डेटासेन्टर (माहितीकेंद्र) सर्व्हर हे आरशासारखा खंड व साम्य असलेला पट्ट्यांचा खंड यांना समर्थन देऊ शकतात.
- आरशासारखा खंड: हा आरएआयडी-१ या नावानेही ओळखला जातो. या खंडपद्धतीत माहितीच्या तंतोतंत प्रती दोन किंवा अधिक चकत्यांवर (आरशासारख्या) साठव्ल्या जातात. यामुळे एका चकतीत दोष उत्पन्न झाला अन्य पद्धतींप्रमाणे माहिती नष्ट होत नाही तर दुसऱ्या चकत्या सर्व्हरला सर्व्हर बंद करून सदोष चकती बदलेपर्यंत कार्यरत ठेऊ शकतात.
- साम्य असलेला पट्ट्यांचा खंड: हा आरएआयडी-५ या नावानेही ओळखला जातो. ह्याची कार्यपद्धती ही पट्ट्यांचा खंड (आरएआयडी-०) यासारखीच असते, फक्त माहितीसोबत "समान माहिती" ही सर्व चकत्यांमध्ये भरण्यात येते. यामुळे जर रचनेतील एक चकती बदलण्याची गरज भासल्यास सर्व माहिती परत मिळवणे शक्य होते.
प्रवेशयोग्यता
संपादनविंडोज २००० सह मायक्रोसॉफ्टने विंडोज ९क्ष प्रणाल्यांमधील दृष्टी व श्रवण दोष तसेच अन्य प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठीच्या प्रवेशयोग्यता सुविधा प्रथमच एनटी कुळातील प्रणाल्यांमध्ये आणल्या.
स्थानिक भाषांमध्ये उपलब्धता
संपादनविंडोज २००० मध्ये प्रथमच बहुभाषीय वापरकर्ता व्यक्तिरेखा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. इंग्लिश भाषेशिवाय विंडोज २००० मध्ये हिब्रू, अरबी, अर्मेनियन, मध्य युरोपीय, रशियन, जॉर्जियन, ग्रीक, भारतीय, जपानी, कोरियन, पारंपरिक व सुलभ चिनी, थाई, तुर्की, व्हितनामी व पश्चिम युरोपीय इ. भाषा व त्यांच्या लिपी यांना समर्थन आहे.
दृश्य खेळ
संपादनविंडोज ९८ वर खेळ विकासकांनी वापरलेली डायरेक्टएक्स एपीआयची ७.० ही आवृती विंडोज २००० मध्ये समाविष्ट करण्यात आली होती. विंडोज एक्सपीच्या सर्व्हिस पॅक २ बरोबर पाठवण्यात आलेली डायरेक्टएक्स ९.०सी (शेडर मॉडेल ३.०) ही विंडोज २००० वर चालू शकणारी डायरेक्टएक्स एपीआयची सर्वांत अद्ययावत आवृत्ती आहे.
आवृत्त्या
संपादनमायक्रोसॉफ्टने विंडोज २००० च्या वेगवेगळ्या बाजारपेठांसाठी व व्यवसायांसाठी विविध आवृत्त्या प्रकाशित केल्या.
पारिभाषिक शब्दसूची
संपादन- ^ व्यक्तिगत संगणक (इंग्लिश: Personal Computer - पर्सनल कम्प्युटर)
- ^ संचालन प्रणाली (इंग्लिश: Operating System - ऑपरेटिंग सिस्टिम)
- ^ लघुप्रक्रियक (इंग्लिश: Microprocessor - मायक्रोप्रोसेसर)
- ^ प्रकाशन उमेदवार (इंग्लिश: Release Candidate - रिलीज कँडिडेट)
- ^ स्रोत संहिता (इंग्लिश: Source Code - सोर्स कोड)
- ^ स्वामित्वाधिकारित (इंग्लिश: Copyrighted - कॉपीराइटेड)
- ^ छापक (इंग्लिश: Printer - प्रिंटर)
- ^ यंत्रसामग्री (इंग्लिश: Hardware - हार्डवेर)
- ^ विषयसूची (इंग्लिश: Directory - डिरेक्टरी)
- ^ विदागार (इंग्लिश: Archive - अर्काइव्ह)
- ^ आंतरक्रिया माध्यम (इंग्लिश: Interactive Media - इंटरॅक्टिव्ह मीडिया)
- ^ संगणकीय स्थानदर्शक (इंग्लिश: Cursor - कर्सर)
- ^ चिन्ह (इंग्लिश: Icon - आयकॉन)
- ^ फलक (इंग्लिश: Pane - पेन)
- ^ अनुक्रमण (इंग्लिश: Indexing - इंडेक्सिंग)
- ^ कूटबद्धता (इंग्लिश: Encryption - एन्क्रिप्शन)
- ^ अभिज्ञापक (इंग्लिश: Identifier - आयडेन्टिफायर)