रेचल कार्सन ( २७ मे १९०७ व मृत्यू: १४ एप्रिल १९६४ ) ह्या अमेरिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ तसेच निसर्गमानव यांचा परस्पर संबंध दाखवून देणाऱ्या प्रभावी लेखिका म्हणून ओळखल्या जातात.[१]

रेचल कार्सन

जन्म व बालपण संपादन

रेचल कार्सन यांचा जन्म २७ मे १९०७ साली अमेरिकेतील पेनसिल्वेनियातील स्प्रिंगडेल येथे झाला. लहानपणापासून त्यांना निसर्गाची आवड होती. लहानवयापासूनच त्यांना पशुपक्ष्यांच्या गोष्टी वाचण्याचा व लिहिण्याचा छंद होता.वयाच्या दहाव्या वर्षी निसर्गावर लिहिलेली त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली होती.[२]

शिक्षण संपादन

१९३२ मध्ये रेचल कार्सन यांनी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी यू.एस.ब्युरो ऑफ फिशरीजमध्ये अर्धवेळ नोकरी करायला सुरुवात केली. नंतर येथेच त्या संशोधक म्हणून कायम झाल्या. सागरी संशोधनावर आधारित पत्रके तयार करणे हा तेथील कामाचाच भाग होता. तेव्हाच फावल्या वेळात त्या स्थानिक वर्तमानपत्र व नियतकालिकांमध्ये मत्स्यजीवशास्त्राविषयी लिहू लागल्या. तेथून पुढे त्यांचा पर्यावरण संबंधी लेखनाकडे प्रवास सुरू झाला.[३]

रेचल कार्सन यांचे पर्यावरणविषयक लेखन संपादन

रेचल कार्सन यांचे ‘अंडर द सी विंड’ हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यांनी ‘रोमान्स अंडर द वॉटर’या नावाची ५२ भागांची शैक्षणिक मालिका आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी लिहिली. १९५१ मधील त्यांच्या ‘द सी अराउंड अस’ या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १९५५ मध्ये त्यांचे ‘द एज ऑफ द सी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. ‘रिमेम्बरन्स ऑफ द अर्थ’ हे पुस्तकही त्यांनी तयार केले. यांबरोबरच त्यांनी अनेक घटना, दुष्परिणाम, पशुपक्षी, कीटकनाशकांचे दुष्परिणाम अशा अनेक विषयांवर लेख लिहिले. त्यांचे १९६२ मध्ये ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले. ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक जगातील सर्वोत्तम २५ शास्त्रीय पुस्तकांपैकी एक मानले जाते.

मृत्यू संपादन

रेचल कार्सन यांचा कर्करोगाने १४ एप्रिल १९६४ साली ५७व्या वर्षी मृत्यू झाला. त्यापूर्वी त्यांची निवड ‘अमेरिकन अकादमी ऑफ सायन्स अँड आर्ट्स’ मध्ये झाली होती.

मिळालेले सन्मान संपादन

१९८० मध्ये कार्सन यांना अमेरिकेचे प्रेसिडेन्शीयल मेडल ऑफ फ्रीडम बहाल करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित केले गेले. ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक त्यांनी ज्या घरात बसून लिहिले ते राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखण्यात येऊ लागले. त्यांच्या कार्याची ओळख राहावी यासाठी अमेरिकेतील बऱ्याच संरक्षित क्षेत्रांना रेचल कार्सन यांचे नाव देण्यात आले. पर्यावरणाच्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना रेचल कार्सन पुरस्कार दिले जातात.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Rachel Carson, Biography". www.rachelcarson.org. Archived from the original on 2020-03-18. 2020-03-18 रोजी पाहिले.
  2. ^ "रेचल कार्सन - मराठी". archive.org. 2020-03-18 रोजी पाहिले.
  3. ^ "Who was Rachel Carson? Everything You Need to Know". www.thefamouspeople.com (इंग्रजी भाषेत). 2020-03-18 रोजी पाहिले.