राम पटवर्धन (जन्म : आगरगुळे-रत्‍नागिरी जिल्हा, मार्च २१, इ.स. १९२८ - - ठाणे, जून ३, इ.स. २०१४) हे मराठी अनुवादक आणि संपादक होते. [४]

विकिक्वोट
विकिक्वोट
रामचंद्र वामन पटवर्धन हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.


रामचंद्र वामन पटवर्धन
[[File:(कॉपीराईट फ्री साचा:छायाचित्र हवे)|frameless|upright=1]]
जन्म नाव रामचंद्र वामन पटवर्धन
टोपणनाव आप्पा [१]
जन्म मार्च २१, इ.स. १९२८ - [२]
गणेशगुळे (पूर्वीचे आगरगुळे), रत्‍नागिरी जिल्हा [२]
मृत्यू जून ३, इ.स. २०१४
ठाणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, शिक्षण
साहित्य प्रकार संपादन, अनुवाद
वडील वामन पटवर्धन
पत्नी ललिता
अपत्ये श्रीरंग, अनिरुद्ध (अनिल) [३]

व्यक्तिगत जीवन संपादन करा

राम पटवर्धनांचा पेहराव खादीचा कुडता, पांढरा लेंगा व खांद्याला झोळी असा असे.[५]

बालपण आणि शिक्षण संपादन करा

राम पटवर्धनांचे शालेय शिक्षण रत्‍नागिरीत झाले. मराठी सातवीनंतर ते मुंबईत आले. मुंबईच्या ओरिएन्ट हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. पु.ल. देशपांडे तेथे त्यांचे शिक्षक होते. शालेय जीवनात त्यांनी एका लेेखाचा अनुवाद करून पु.ल. देशपांडे यांना दाखवला. पुलंनी तो अनुवाद ‘अभिरुची’मध्ये छापून आणला. मुंबईतल्या रुईया कॉलेजातून १९५२ मध्ये बी.ए. व १९५४ मध्ये मराठी व संस्कृत विषय घेऊन एम. ए. झालेल्या पटवर्धनांचे शिक्षण कठीण परिस्थितीत झाले.[६]. मात्र तेथे त्यांना श्री.पु. भागवत आणि न.र.फाटक यांच्यासारखे प्राध्यापक मिळाले. शिक्षणासाठी त्यांना ... आणि ... शिष्यवृत्या मिळाल्या. [७]. शिक्षणासोबत त्यांनी सरकारी नोकरीही केली(कार्यकाळ आणि काय काम ते हवे ) . [८]

महाविद्यालयीन प्राध्यापकी कारकीर्द संपादन करा

शिक्षण पूर्ण झाल्यावर पटवर्धनांनी सिडनेहॅम, रुईया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापन केले (कार्यकाळ हवेत).[८]

संपादकीय कारकीर्द संपादन करा

श्री.पु. भागवत यांच्या आग्रहावरून ते 'मौज' साप्ताहिकात नोकरीस लागले (१९४९). [२] दैनिक लोकसत्ताच्या वृत्तनोंदीनुसार नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रुळलेली वाट बदलणारे आणि घाट सुघड करणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. [७] अनेक लेखक राम पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखकांचा मौजच्या कार्यालयात अनेकदा येत असत. दैनिक दिव्य मराठीच्या प्रतिनिधींच्या वृत्तनोंदीनुसार ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत.[५] ‘गोळीबंद’ लेखनाचे ते पुरस्कर्ते होते. (गोळीबंद हा त्यांचाच शब्द.) लेखन कसे ‘कसून’ करायला हवे (‘कसून’ हा शंकर वैद्य सरांचा शब्द) किंवा लेखन हे निर्दोष असायला हवे. ( हा बहुधा श्री. पुं.चा शब्द). या पद्धतीच्या लिखाणासाठी ‘सत्यकथा’ इरेला पेटली होती. आणि त्यांचे ते ‘इरेला पेटणे’ केवळ एका मासिकांसाठी नव्हते, तर ते समस्त मराठी वाङ्‌मयासाठी होते.


१९६०पर्यंत त्यांनी 'मौज'चे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. 'मौजे'त संपूर्ण जीवनाचे प्रतिबिंब पडेल असं साहित्य मिळवून छापले. त्यासाठी वसंत पळशीकर, संभाजी कदम, ज्ञानेश्वर नाडकर्णी, अशोक रानडे अशा विविध क्षेत्रांतल्या लेखक मंडळीना लिहिण्यास प्रवृत्त केले. १९६०नंतर त्यांनी 'सत्यकथा'ची धुरा स्वीकारली आणि 'सत्यकथा' बंद होईपर्यंत ती खाली ठेवली नाही..[२]


'मौज'मधून निवृत्त झाल्यावर त्यांनी मारुती चित्तमपल्ली यांचे 'चकवा चांदण', मीना प्रभूंचे 'माझं लंडन', श्रद्धानंद महिला आश्रमावर आधारित अचला जोशी यांचे 'आश्रम नावाचे घर' ही पुस्तके संपादित केली. सरोजिनी वैद्य यांच्या आग्रहास्तव त्यांनी राज्य मराठी परिषदेची काही पुस्तकेही संपादित केली होती. ज्ञानदेवीचे ३ खंड, आठवणीतल्या कविता - ४ खंड यांचे संपादनही त्यांचे होते. [९] इ.स. १९८५ मध्ये शांता शेळके यांचा 'अनोळख' हा काव्यसंग्रह त्यांनी संपादित केला.[१०]

टीका आणि प्रतिवाद संपादन करा

राम पटवर्धन यांना आवडलेले लेखनच सत्यकथेच्या माध्यमातून छापले जात असे, असा आरोप करून लघुनियतकालिकांतील लेखकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सत्यकथा ही सदाशिवपेठी आहे, असे आरोप त्यांच्यावर झाले. वेळप्रसंगी राजा ढाले वगैरे मंडळींनी सत्यकथेच्या अंकाच्या प्रतींचे प्रातिनिधिक दहन केले. [११] पण राम पटवर्धन खुल्या मनाचे संपादक होते, अंकाचे दहन करू इच्छिणारे लोक सत्यकथेच्या प्रती आणण्याचे विसरले तर राम पटवर्धनांनी कार्यालयातील सहकाऱ्यांमार्फत नाराज आंदोलक मंडळींना सत्यकथेच्या प्रतीही पाठवल्या. [१२]


पटवर्धन यांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिले, लिहिते केले. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी `सत्यकथे’त आणले.[१३]लेखकाला व्यापक सामाजिक, सांस्कृतिक भान हवे म्हणून पटवर्धन सत्यकथेच्या प्रत्येक अंकात ’परिक्रमा’नावाचे सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेणारे प्रदीर्घ, आठ-दहा पानी सदर लिहीत.

अनुवाद/लेखन कारकीर्द संपादन करा

साहित्याच्या विश्वात साहित्य संपादक या नात्याने स्वतःचा वेगळा ठसा उठवूनही पटवर्धनांनी स्वतः मात्र फारसे लेखन केले नाही. कॉलेज जीवनातच पटवर्धनांनी चेकाव्हच्या काही कथांचे भाषांतर केले होते. महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकीयानुसार मार्जोरी रॉलिंग्जच्या ' द इयरलिंग'चा 'पाडस' हा त्यांनी केलेला अनुवाद गाजला. राम पटवर्धन यांनी 'नाइन फिफ्टीन टु फ्रीडम' या पुस्तकाचा 'अखेरचा रामराम' या नावाने मराठी अनुवाद केला, तसेच. बी.के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक 'योगदीपिका' नावाने मराठी भाषेत आणले.[४] या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत राम पटवर्धन यांचे अनुवादक म्हणून नाव नजरचुकीने छापले गेले नव्हते. एका विख्यात इंग्रजी प्रकाशनसंस्थेने ही चूक दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी दुरुस्त केली. अनुवादाच्या नेमकेपणाबद्दल पटवर्धन आग्रही असत. ते पहाटे चार वाजताउठून योगासने करीत, त्यांचे परिणाम जाणून घेत आणि मगच अनुवाद पुढे चालू ठेवत.

निधन संपादन करा

१९९७ - ९८ पर्यंत चुनाभट्टी परिसरात ते वास्तव्यास असत.[९] ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमागील आनंदपार्क संकुलात १९९८ पासून ते मुला-नातवंडांसमवेत राहात होते. ३ जून २०१४ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्‍नी ललिता, अनिरूद्ध, श्रीरंग ही मुले, सून आणि नात ऋजुता असा परिवार आहे.[७]


तळटीप: संपादन करा

या लेखाचे प्रारंभिक लेखन ऐसी अक्षरे http://www.aisiakshare.com या मराठी संस्थळावर विकिपानांसाठी या सदरातून केले गेले आह

संदर्भ संपादन करा

 1. ^ http://ardheakash.blogspot.in/2014/06/blog-post_4.html[permanent dead link]
 2. ^ a b c d http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/editor-ram-patwardhan/articleshow/36017585.cms
 3. ^ http://ramjagtap.blogspot.in/2014/06/blog-post.html
 4. ^ a b "संपादक राम पटवर्धन कालवश-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-12-02 रोजी पाहिले.
 5. ^ a b "404 page". divyamarathi.bhaskar.com (इंग्रजी भाषेत). 2018-12-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
 6. ^ http://tarunbharat.net/Encyc/2014/6/5/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=N[permanent dead link]
 7. ^ a b c "साक्षेपी संपादक राम पटवर्धन कालवश". Loksatta. 2014-06-04. 2018-12-02 रोजी पाहिले.
 8. ^ a b "साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांचे निधन". divyamarathi. 2018-12-02 रोजी पाहिले.
 9. ^ a b "विचारांशी बांधिलकी...-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-12-02 रोजी पाहिले.
 10. ^ SHELAKE, SHANTA J. (2012-11-01). ANOLAKH. Mehta Publishing House.
 11. ^ : http://www.tarunbharat.net/Encyc/2014/6/7/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E2%80%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E2%80%99.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=N[permanent dead link]
 12. ^ "साहित्यपूजक". Lokmat. 2014-06-07. 2018-12-02 रोजी पाहिले.
 13. ^ http://navshakti.co.in/featured/169870/[permanent dead link]