विषुवांश
खगोलीय विषुववृत्तावर[श १] वसंतसंपात[श २] बिंदूपासून पूर्वेकडे असलेल्या खगोलीय वस्तूच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे[श ३] कोनीय अंतर म्हणजे विषुवांश (इंग्रजी: Right Ascension (RA) - राईट असेन्शन; चिन्ह: α) होय.[१]
स्पष्टीकरण
संपादनज्याप्रमाणे पृथ्वीवरील ठिकाणाचे निश्चित भौगोलिक स्थान दर्शविण्यासाठी अक्षांश व रेखांश हे सहनिर्देशक वापरतात; त्याचप्रमाणे खगोलीय पदार्थांचे खगोलावरील (इतर ताऱ्यांच्या संदर्भातील) स्थान अथवा दिशा दर्शविण्यासाठी विषुवांश किंवा होरा आणि क्रांती हे दोन खगोलीय निर्देशक वापरतात. यांपैकी विषुवांश रेखांशाशी व क्रांती अक्षांशाशी समतुल्य आहे.[१]
खगोलीय विषुववृत्त व क्रांतिवृत्त (सूर्याचा वार्षिक भासमान गतीचा मार्ग) ही एकमेकांना वसंतसंपात व शरदसंपात या बिंदूंमध्ये छेदतात; खगोलीय उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदूंमधून जाणारी वर्तुळे म्हणजे होरावृत्ते ही विषुववृत्ताला लंब असतात. अशा प्रकारे एखाद्या स्वस्थ पदार्थाचे होरावृत्त खगोलीय विषुववृत्ताला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे वसंतसंपात या संदर्भबिंदूपासून पूर्वेकडे असलेले कोनीय अंतर म्हणजे विषुवांश होय. म्हणजे वसंतसंपात व खगोलीय पदार्थ यांच्यातून जाणाऱ्या दोन होरावृत्तांमधील कोनीय अंतर विषुवांशाने मोजले जाते. विषुवांश बहुधा अंशांऐवजी तास, मिनिटे व सेकंद या एककात देतात. हे अंतर ० ते २४ तास एवढे असू शकते. याचा अर्थ ० ते ३६० अंशांचे २४ भाग (वा एकके) करून त्यांना तास म्हणतात. अशा तऱ्हेने १ तासात १५ अंश येतात व १ अंशाची ४ मिनिटे होतात. पृथ्वीचे एक अक्षीय भ्रमण पूर्ण होताना २४ तासांत तारे एक फेरी पूर्ण करताना दिसतात. म्हणून अंशांऐवजी तास हे एकक निवडण्यात आले आहे. विषुवांश व क्रांती हे सहनिर्देशक बव्हंशी स्थलनिरपेक्ष व कालनिरपेक्ष आहेत. म्हणजे ते निरीक्षकाचे स्थान आणि पृथ्वीचे स्थान यांवर अवलंबून नसतात. अर्थात संपात बिंदूंच्या विलोम (उलट्या) गतीमुळे कालांतराने विषुवांशात किंचित फरक पडत जातो. म्हणून विषुवांश देताना त्यासाठी कोणत्या वर्षाचा संपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला होता, ते नमूद करावे लागते.[१]
अगस्त्य ताऱ्याचा विषुवांश ६ ता. २०मि. आहे. याचा अर्थ या ताऱ्यांतून जाणारे होरावृत्त हे खगोलीय विषुववृत्ताला वसंतसंपाताच्या पूर्वेस ६ तास २० मि. (म्हणजे ९५ अंश) अंतरावर असलेल्या बिंदूमध्ये छेदते.[१]
चिन्हे आणि लघुरूप
संपादनएकक | किंमत | चिन्ह | षष्टिक-मान प्रणाली | रेडियनमध्ये |
---|---|---|---|---|
तास | १⁄२४ वर्तुळ | ( h ) | १५° | π⁄१२ rad |
मिनिट | १⁄६० तास, १⁄१,४४० वर्तुळ | ( m ) | १⁄४°, १५' | π⁄७२० rad |
सेकंद | १⁄६० मिनिट, १⁄३,६०० तास, १⁄८६,४०० वर्तुळ | ( s ) | १⁄२४०°, १⁄४', १५" | π⁄४३,२०० rad |
संदर्भ
संपादन- ^ a b c d अ. ना. ठाकूर. "विषुवांश". मराठी विश्वकोश. खंड १६. १० मार्च २०१६ रोजी पाहिले.