रमेश सहस्रबुद्धे (जन्म : इ.स. १९३८; - पुणे, २८ डिसेंबर, इ.स. २०१६) हे एक मराठी विज्ञानकथा लेखक होते. ते विज्ञान युग या पुण्यात प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाच्या सल्लागार मंडळावर होते. अनेक दिवाळी अंकांत त्यांनी लेखन केले आहे. दैनिक प्रभातच्या दिवाळी अंकात आणि प्रभातने राबविलेल्या ऑल राउंडर या उपक्रमात त्यांचा सहभाग होता.

रमेश सहस्रबुद्धे यांनी मराठी विज्ञान परिषदेमार्फत काढल्या जाणाऱ्या पत्रिकांसाठी आणि मासिकाच्या संपादक मंडळातही काम केले आहे.

सहस्रबुद्धे यांनी आजवर वेगवेगळ्या विषयांवर ७६ पुस्तके लिहिली आहेत. अनेक दिवाळी अंकांमध्ये लेखन केले असून, त्यांनी लिहिलेल्या विज्ञान-कुतूहल, प्राणी-पक्षी निरीक्षण, बोधकथा, वैज्ञानिक आणि थोरांचे किस्से प्रसिद्ध झाले आहेत. अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांमधून त्यांचे लेखन प्रकाशित झाले असून, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्यांची व्याख्यानमालाही प्रदर्शित झाली आहे.

रमेश सहस्रबुद्धे हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे पहिले मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. पुण्याच्या निगडी या उपनगरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते.

पुस्तके

संपादन
  • अजब दुनिया
  • ऐतिहासिक नवलकथा
  • किस्से क्रिकेटचे
  • क्रांतिकारकांच्या कथा
  • जगप्रसिद्ध वैज्ञानिक गुलिमो मार्कोनी (चरित्र)
  • जगदीशचंद्र बोस (चरित्र)
  • टेलिव्हिजन
  • श्रीदासगणू महाराज (चरित्र)
  • निसर्गमित्र
  • फ्रूटसॅलेड
  • निळ्या डोळ्याचा अजब कलावंत राजकपूर (चरित्र)
  • विज्ञानसागरातील दीपस्तंभ
  • जगप्रसिद्ध वैज्ञानिक श्रीनिवास रामानुजन (चरित्र)
  • वैज्ञानिकांच्या गमती
  • वैज्ञानिकांचे जीवन
  • सिनेमा सिनेमा
  • हसवेगिरी
  • जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. होमी भाभा (चरित्र)

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • रमेश सहस्रबुद्धे यांच्या ‘टेलिव्हिजन’ आणि ‘विज्ञानसागरातील दीपस्तंभ’ या दोन विज्ञानविषयक पुस्तकांना राज्य पुरस्कार लाभला असून, यातील एकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.
  • गोवा राज्याच्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाने आठवीच्या पुस्तकात त्यांचा धडा समाविष्ट केला होता.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कला शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या एका लेखाचा समावेश झाला होता..
  • रोहा येथे १९८७ मध्ये झालेल्या विज्ञान परिषदेच्या संमेलनात त्यांच्या विज्ञानविषयक कार्याचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.