दासगणू महाराज

मराठी संत, कवी व कीर्तनकार

गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज (६ जानेवारी १८६८, (उमरी) - २५ नोव्हेंबर १९६२, (पंढरपूर)) हे मराठी संत, कवीकीर्तनकार होते.

दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात.[]

महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.

१९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला.

साईभक्ती

संपादन

दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते.

पुस्तके

संपादन

दासगणू महाराजांच्या प्रमुख रचना अशा आहेत :

  • श्री आऊबाई चरित्र
  • ईशावास्य भावार्थ बोधिनी
  • श्री गजानन विजय : या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.
  • गोदामाहात्म्य : ब्रह्मपुराणातील गौतमीमाहात्म्यावर आधारलेला, गोदावरी नदीचे व तिच्या तीरावरील तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य वर्णन करणारा एकतीस अध्यायांचा पद्य ग्रंथ. श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे ह्यांनी शके १९१९ मध्ये प्रकाशित केला आहे.
  • भक्त लीलामृत
  • भक्तिसारामृत,
  • भाव दीपिका
  • शंकराचार्य चरित्र
  • शिर्डी माझे पंढरपूर (साईबाबांची आरती)
  • संत कथामृत
  • साई स्तवनमंजिरी
  • गुरुचरित्र सारामृत ग्रंथ

स्फुट रचना :

सदगुरुरायानें जला तेल केले दीप उजळील लक्षावधी

ठेवुनिया दीप उशापायथ्याशीं पहुडे फळिसी गुरुमूर्ती तू
गणू म्हणे माया दुर्धर अंधार ज्ञानदीप थोर म्हणूनी लावा

शिवविष्णूब्रह्मारूप बाबा साई भाव दुजा काही मानू नका
सदगुरुरायाच्या पायाची जी धूळ तेंच गंगाजळ शुद्ध माना
अमृताआगळीं मुखींची वचनें तींच माना मनें गीता जेवीं
गणू म्हणे बाबा वसंत सोज्ज्वळ भक्तांनो कोकीळ व्हा रे तुम्ही

शिर्डी क्षेत्राचा महिमा

संपादन



शिर्डीक्षेत्र नोहे पचंबा बाजार तेथें दुकानदार परमार्थाचा
ऐहिक सुखाचीं खेळणीं बाहुल्या समूळ फेंकिल्या गुरुरायें
कां कीं तयामाजीं किमपिना अर्थ फसतील व्यर्थ पोरें माझीं
गणू म्हणे पोर पचंब्यासी जातें किरकिरेंच घेतें आवडीनें

कर्म भक्ती ज्ञान बाजारीं या माल मनीं जो वाटेल तोचि घ्यावा
तिघांची किंमत एक आहे जाणा फळहि तिघांना एकचि हो
भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी सांई सदगुरुसी दुजें न लगे
गणू म्हणे भाव नाणें जयापाशीं त्यानें बाजाराशीं येथें जावें

तू माझा आधार मी तुझा आश्रीत होई कृपावंत पांडुरंगा
होई कृपावंत तू शुद्ध गौतमी मी एक ओहोळ मशीं देई स्थळ पायापाशीं
मशी देई स्थळ तू साच कस्तुरी माती मी निर्धारी मला धरणें दुरीं नाही बरे
मला धरणें दूरी गणू हा अज्ञान करावे पालन देऊनियां ज्ञान ब्रीदासाठी देऊनिया ज्ञान

दासगणू महाराजांची चरित्रे

संपादन
  • दास गणू महाराज (डॉ. यू.म. पठाण)
  • श्रीदासगणू महाराज (लेखक - रमेश सहस्रबुद्धे)
  • संतकवी दासगणू महाराज चरित्र (लेखिका - मुग्धा दिवाडकर)
  • संतकवी दासगणू महाराज चरित्र आणि काव्यवचन (लेखक - स्वामी वरदानंद भारती ऊर्फ प्राचार्य अनंत दामोदर आठवले उर्फ आप्पा)
  • सन्मार्ग दीपक/श्रीदासगणू महाराज यांचे चरित्र (वसुधा देशपांडे)

संदर्भ

संपादन
  1. ^ "दास गणू महाराज: लेखक - डॉ.यू.म.पठाण".[मृत दुवा]

www.santkavidasganu.org

बाह्य दुवे

संपादन