साईबाबा
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
साईबाबा (१८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय अवलिया फकीर व संत होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.[१]
श्रीसचिदानंद सदगुरू साईबाबा | |
![]() साई बाबा | |
निर्वाण | १५ ऑक्टोबर, १९१८), अश्विन शुद्ध दशमी, शके १८४० शिर्डी, महाराष्ट्र |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | शिर्डी , महाराष्ट्र |
प्रसिद्ध वचन | "अल्ला मालिक" व "श्रद्धा आणि सबुरी" |
श्री साईसच्चरित ग्रंथातील अध्याय ४ अनुसार श्री साईबाबांचा जन्म, त्यांचे मातापिता, त्यांचा धर्म, जात आणि पंथ याबाबत कोणतीच माहिती अधिकृतपणे मिळू शकत नाही. भक्तांसाठी श्री साईबाबा एका तरुणाच्या रुपात शिरडीला निंबाखाली प्रकट झाले. श्री साईबाबा शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहत, जिला ते "द्वारकामाई" असे संबोधित. ते नित्य पांढऱ्या रंगाची मांजरपाटाची कफनी परिधान करत असत. ते डोक्यालाही पांढरे फडके बांधायचे. अनेक वर्षे तरटाचा तुकडा हेच त्यांचे आसन होते. साईबाबा आपला डावा हात लाकडी कठड्यावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करून धुनीजवळ बसत. हळूहळू त्यांची महती लोकांच्या लक्षात आली. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरून त्यांच्या अवतार कार्याच्या उत्तरार्धात त्यांनी हजारो लोकांना शिरडीकडे आकर्षित केले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दशकात सर्व पुजासाहित्यानिशी समारंभपूर्वक त्यांची पूजा सुरू झाली, आणि द्वारकामाईला राजदरबाराचे स्वरूप प्राप्त झाले. तरी देखील बाबांनी आपली साधी जीवनशैली बदलली नाही. भक्तांना त्यांचे ईश्वरी प्रेम आणि वरदान प्रत्यक्ष प्राप्त होत असे. बाबा भक्तांना आपला ईश्वर आाराधनेचा मार्ग बदलू देत नसत. साई या शब्दाचा अर्थ 'मालक' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “अल्ला मालिक" "श्रद्धा सबुरी" हे साईंचे बोल होते.[१]
१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसऱ्याच्या दिवशी श्री साईबाबांनी शिर्डीत महासमाधी घेतली.[२] बाबांच्या कृपेने आजही भक्तांना अनुभव येतो. त्यामुळे बाबांप्रती भक्तांची निष्ठा व सबुरी निर्माण होते. बाबांचे दरबारी आलेल्या भक्ताच्या सर्व व्यवहारी अपेक्षा, मनोकामना बाबांपर्यंत निश्चित पोहोचतात व ते त्या पूर्ण करतात. कोणीही बाबांचे दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नाही अशी सर्व सामान्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे.[१]
श्री साईसच्चरित ग्रंथातील सत्य नोंद
संपादनश्री साईबाबांच्या हयातीत त्यांच्या जन्मस्थानाचा, मातापित्यांचा तसेच धर्म आणि पंथांचा शोध कोणास लागला नाही. स्वतः श्री साईबाबांनीही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. बहुतांश साईभक्त ज्या ग्रंथास प्रमाण मानतात त्या श्री साईसच्चरित ग्रंथातसुद्धा श्री साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत कोणताच उल्लेख सापडत नाही. " जन्म बाबांचा कोण्या देशी । अथवा कोण्या पवित्र वंशी । कोण्या मातापितरांच्या कुशी । हे कोणासी ठावे ना ।। " या श्री साईसच्चरितातील अध्याय ४ मधील ११३व्या ओवीत[३] उल्लेख केल्या प्रमाणे बाबांच्या जन्माबाबत कुठेही कोणतीच खात्रीलायक माहिती सापडत नाही.
श्री साईबाबांची समकालीन सरकारी दस्तऐवजांमधील नोंद
संपादनश्री साईबाबांच्या काळात तत्कालीन ब्रिटिश सरकारने सर्वप्रथम आपल्या अहमदनगर कलेक्टरेट सर्व्हेमध्ये तसेच विकली रिपोर्टस ऑफ क्रिमिनल इंटेलिजन्स ऑन पॉलिटीकल सिचूएशन या महत्वपूर्ण दस्तऐवजांमध्ये श्री साईबाबांची नोंद केलेली आहे. श्री साईबाबांना तत्कालीन लोक आपापल्यापरीने साधू, अवतार, फकीर तसेच अवलिया मानत असे महत्वपूर्ण निरीक्षण या दस्तऐवजात पाहण्यास मिळते.[४] क्रांतिकारक श्री. गणेश श्रीकृष्ण खापर्डे, सन्मानीय श्री. हरी सीताराम दीक्षित, पूर्वी खान्देशात असलेले भाटे नावाचे एक मामलतदार, श्री. चांदोरकर ( त्याकाळचे उपजिल्हाधिकारी आणि कोपरगावचे माजी मामलतदार) ई. अशा उच्चशिक्षित साईबाबांच्या भक्तांची नोंद या दस्तऐवजांमध्ये केलेली आढळून येते. तसेच बाबांनी कोणत्याही उपासनापद्धतीचा अवलंब केला नसल्याचेही यात नमूद केले आहे. हे तीन रिपोर्ट जानेवारी सन १९११, जुलै सन १९१२ तसेच ऑगस्ट सन १९१२ मध्ये लिहले गेले होते.[५]
कार्य
संपादनसाईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला.
भक्त समुदाय
संपादनसाईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो.
साई बाबा आणि स्वामी स्वरूपानंद
संपादनजून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला. कारण त्यांच्या मतानुसार साई हे ईश्वर वा अवतार नसून एक सर्वसामान्य मनुष्य होते. त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केली.[६]
श्री साईबाबांवरील महत्वपूर्ण संदर्भग्रंथ
संपादन- शिलधी (के. भ. गव्हाणकर)
- शिरडीचे साईबाबा (के. भ. गव्हाणकर)
- श्री साईनाथ स्तवनमंजरी (ग. द. सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज)
- श्री साईसच्चरित (गो. र. दाभोळकर ऊर्फ हेमाडपंत)
- श्री साईबाबा (लेखक - स्वामी साईशरणानंद अनुवादक - वि. बा. खेर)
- निर्वाणीचा सखा (वा. रं. गोखले)
- श्री क्षेत्र शिर्डीचे महान संत श्रीसाईमहाराज यांचे चरित्र (पां. बा. कवडे)
- साई सागरातील ८८ मोती (लेखक - बी. व्ही. नरसिंहस्वामी अनुवादक - श्री. ग. आंबेकर)
- ईश्वर आहे नाही का म्हणतोस ? - श्री साईनाथांचा शरणार्थी (लेखक - स्वामी साईशरणानंद अनुवादक - वि. बा. खेर)
- श्री साईबाबा (प्रा. डॉ. माधवराव दीक्षित)
- श्री साईनाथ सगुणोपासना (कृ. जो. भीष्म)
संदर्भ
संपादन- ^ a b c "History | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi". www.sai.org.in. 2023-07-09 रोजी पाहिले.
- ^ "मंदिर परिसर | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi". www.sai.org.in. 2023-07-09 रोजी पाहिले.
- ^ DABHOLKAR, GOVIND RAGHUNATH. "SHRI SAI SATCHARITRA MARATHI - ADHYAY 4" (PDF).
- ^ "Weekly Reports of the Director of Criminal Intelligence on the Political Situation, during January 1911". INDIAN CULTURE (इंग्रजी भाषेत). 2023-04-11 रोजी पाहिले.
- ^ "Weekly Reports of the Director, Criminal Intelligence, on the Political Situation, during August 1912". INDIAN CULTURE (इंग्रजी भाषेत). 2023-04-11 रोजी पाहिले.
- ^ "Swaroopanand Saraswati tender apology before MPHC for controversial statement against Shirdi's Sai Baba". 2015-09-24. ISSN 0971-8257.