मेहरानगढ

(मेहरानगढचा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)

मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे.
१४६०साली जोसवणाऱ्या राव जोधा या राजाने मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. जोधपुर शहरापासून ४१५ मीटर उंचीवरील हा किल्ला मोठ्या भिंतीमुळे अभेद्य बनला आहे.

मेहरानगढचा किल्ला

प्रख्यात लेखक रूडयार्ड किप्लिंग याने वर्णन केल्या प्रमाणे "हे महाल महाकाय लोकांनी बांधल्यासारखे आणि सूर्याने रंगवल्यासारखे दिसतात".

किल्ल्याची रचनासंपादन करा

मेहरानगढ [१] हा किल्ला जोधपूर शहरातील कोणत्याही भागातून दिसून येतो. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ल्याच्या भिंती ३६ मीटर उंच आणि २१ मीटर रुंद आहेत. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम् उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहे. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच किरात सिंह सोडा या किल्ल्याचे रक्षण करताना धारातीर्थी पावलेल्या सैनिकाची छत्री आहे. प्रवेश करून आत गेल्यावर जयपूरच्या सैन्याने हल्ला करताना बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली भिंतीवरील भोके तसेच एक निखळून पडलेला दरवाजा अजूनही दिसतो.

किल्ल्यात असणाऱ्या सात भव्य दरवाजांमध्ये महाराजा मानसिंह ने बांधलेला 'जय पोळ' (बांधकाम इ.स.१८०६ ) तसेच महाराज अजित सिंह यांनी बांधलेला, मुघलान्वरील विजयाचे प्रतिक असणारा 'फतेह पोळ'(बांधकाम इ.स.१७०७ ) आहेत. लोह पोळ या शेवटच्या दरवाज्यावर १८४३ मध्ये राजा मानसिंह यांच्या बरोबर सती गेलेल्या राण्याच्या हातांचे ठसे आहेत. दुधाकांग्डा पोळ, अमृत पोळ, गोपाल पोळ आणि भेरू पोळ असे एकूण सात दरवाजे या गडाला आहेत.

किल्ल्यात अनेक सुंदर महाल आहेत. मोती महाल, शिश महाल, फुल महाल, सिलेह खाना, दौलतखाना असे अनेक महाल बघण्यासारखे आहेत.

महालातील संग्रहालयात पुरातन पालख्या, हौदे, पाळणे, शस्त्र, कपडे, लघु चित्रे यांचे संग्रह आकर्षकपणे मांडलेले आहेत.

इतिहाससंपादन करा

राठोड घराण्याचा राव रणमल याच्या २४ मुलांपैकी एक म्हणजे राव जोधा. सुमारे हजार वर्षे मंदोर येथे असणारी राठोड घराण्याची राजधानी राव जोधाला असुरक्षित वाटू लागली म्हणून त्याने नवीन राजधानीसाठी योग्य जागेचा शोध घेणे चालू केले. मंदोर पासून सुमारे ६ मैलावर असणारी टेकड्यांनी घेरलेली एक जागा त्याच्या मनात भरली. या टेकडीला 'भाकुरचीडीया' म्हणजे पक्ष्यांची टेकडी असे नाव होते. या टेकडीवर चीडीया नाथजी या नावाचे साधू राहत होते. स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध असणारे चीडीया नाथजी मात्र ती जागा सोडण्यास तयार नव्हते. राव जोधाने अनेक वेळा विनंती करूनही चीडीयानाथ यांनी ती मानली नाही. शेवटी राव जोधाने चारण जमातीतील दोन प्रतिष्ठित लोकांना देशनोक या गावातील करणी माता या चारण संत स्त्रीला मध्यस्थी करण्यासाठी विनंती करण्यासाठी पाठवले.

करणी माता या सुद्धा अतिशय शूर आणि संत म्हणून प्रसिद्ध होत्या. करणी मातांच्या सांगण्यावरून चीडीयानाथ यांनी आपले बस्तान हलवले पण जाताना ते राव जोधाला शाप देऊन गेले कि तुझ्या राजधानीला नेहेमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवेल. अजूनही या भागात दर तीन चार वर्षांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते. चीडीयानाथ यांचा कोप होऊ नये म्हणून राव जोधाने त्यांना एक घर बांधून दिले तसेच त्यांच्या गुहेजवळ एक मंदिर सुद्धा बांधले.

करणी मातांना आमंत्रण करण्यासाठी गेलेल्या दोघा चारण प्रतीष्ठीताना राव जोधाने मथानिया आणि चोपासनी ही दोन गावे भेट दिली. १२ मे १४५९ रोजी मेहरानगढ किल्ल्याची पाया भरणी झाली.

नवीन किल्ल्याचे बांधकाम यशस्वी व्हावे म्हणून तत्कालीन प्रथेनुसार नर बळी देण्याचे ठरले. एक प्रजानन 'राजा राम मेघवाल' याने स्वखुशीने नरबळी जाण्याचे मान्य केले. त्याच्या सन्मानार्थ दिलेल्या जागेत अजूनही त्याचे वंशज राहत आहेत. राज बाग या नावाने ही जागा ओळखली जाते. या माहितीमध्ये संभ्रम आहे कारण काही ठिकाणी या माणसाचे नाव राजीय भाम्बी [२]असेही उल्लेखले गेले आहे.

राठोड वंशीय राजे स्वतःला सूर्यवंशी समजत असल्याने सूर्याच्या (मिहीर - सूर्याचे एक नाव) नावाने 'मिहीर गढ' असे नाव ठेवले, जे पुढे अपभ्रंश होऊन 'मेहरानगढ' असे झाले.

परिसरसंपादन करा

मेहरानगढ किल्ल्यासमोर 'जसवंत थडा' या नावाचे जोधपुर राजघराण्यातील राजांचे संगमरवरी स्मारक आहे.

हा किल्ला सुमारे ६० कोटी वर्षापूर्वी बनलेल्या ज्वालामुखीय खडकावर बनलेला आहे. बाकुचीरीया टेकडीचा ७२ एकराचा भाग 'राव जोधा वाळवंटिय वन' म्हणून संरक्षित केले आहे. या वनात फिरण्यासाठी मार्गदर्शक, कॅफे अशा सोयी आहेत.

मेहरानगढ किल्ल्यावर साहसी खेळांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी 'झिप लाईन'ची सोय आहे.

चित्रपट संदर्भसंपादन करा

सलमान खानच्या 'हम साथ साथ है' चित्रपटाचे चित्रीकरण मेहरानगढ किल्ल्यावर झाले आहे. ख्रीश्चीयान बाले याने अभिनित केलेल्या 'The Dark Night Rises' या चित्रपटातील विहिरीचे चित्रण याच किल्ल्यामधील आहे. सुशांत राजपूतचा 'शुद्ध देसी रोमान्स', १९९४ सालची 'the Jungle Book' ही हॉलीवूड फिल्म मेहरानगढ किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित झाले आहेत

बाह्य दुवेसंपादन करा

http://www.mehrangarh.org/

चित्रदालनसंपादन करा

  1. ^ http://www.mehrangarh.org/
  2. ^ http://www.womensweb.in/2017/06/6-facts-not-known-mehrangarh-fort-jodhpur/