मालती बेडेकर
मालती बेडेकर (मार्च १८, इ.स. १९०५ - मे ७, इ.स. २००१) या मराठीतल्या आद्य स्त्रीवादी लेखिका समजल्या जातात. त्यांनी सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके, पाच नाटके, एक चित्रपटकथा लिहिल्या तसेच पाच इंग्लिश पुस्तकांची मराठी भाषांतरे केली.
मालतीबाई बेडेकर | |
---|---|
टोपणनाव | बाळूताई |
जन्म |
मार्च १८, इ.स. १९०५ अलिबाग |
मृत्यू | मे ७, इ.स. २००१ |
शिक्षण | बी.ए. |
ओळख
संपादनत्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. त्यांच्या आईचे नाव इंदिरा खरे तर वडिलांचे नाव अनंतराव खरे होते. कृष्णाबाई मोटे या लेखिका आणि समाजशास्त्रज्ञ त्यांच्या मोठ्या भगिनी होत. १९३८ साली बाळुताईंचा विवाह विश्राम बेडेकरांशी झाला.
मालती बेडेकर यांनी आपले काही लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने लिहिले आहे. ते लिखाण कृष्णाबाई मोटे यांचे पती ह.वि. मोटे यांनी प्रकाशित केले. या पुस्तकांनी महाराष्ट्रात त्याकाळी प्रचंड खळबळ उडाली होती. ही पुस्तके लिहिण्यापूर्वी श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी किंवा बाळुताई खरे या नावांनीही मालतीबाईंनी लेखन केले आहे.
प्रकाशित साहित्य
संपादन- अलंकार-मंजूषा
- कळ्यांचे निःश्वास (लघुलेख संग्रह, विभावरी शिरुरकर नावाने, इ.स. १९३३)
- खरेमास्तर (१९५३)
- घराला मुकलेल्या स्त्रिया
- पारध (नाटक)
- बळी (कादंबरी. १९५०)
- मनस्विनीचे चिंतन
- वहिनी आली (नाटक)
- विरलेले स्वप्न (कादंबरी)
- शबरी (१९५६)
- साखरपुडा (पटकथा, या पटकथेखाली सही होती मालतीबाई बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर)
- हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (सहलेखक : के. एन. केळकर ??)
- हिंदोळ्यावर (कादंबरी, विभावरी शिरुरकर नावाने, इ.स. १९३३)
- हिरा जो भंगला नाही (नाटक, पहिला प्रयोग १६ जून १९६९ या दिवशी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला.)
खरेमास्तर ही मालती बेडेकर यांच्या वडिलांच्या जीवनावर आधारित चरित्रवजा कादंबरी असून त्याचा इंग्लिश भाषेत अनुवाद झाला आहे.
सन्मान
संपादन१९८१ साली अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मालतीबाई उभ्या होत्या. पण अवघ्या सात मतांनी त्यांचा पराभव झाला गो.नी. दांडेकर निवडून आले. त्या संमेलनात मंत्र्यांनी हस्तक्षेप केला व महाराष्ट्र सरकारने तीन पुस्तकांना बक्षिसे नाकारली. याचा निषेध म्हणून त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत समांतर साहित्य संमेलन भरले. हे संमेलन लेखक व पत्रकारांनी भरवले होते. या समांतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मालतीबाई बेडेकर होत्या.