मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हा विभाग 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' येथे १९५९ मध्ये सुरू झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी हे या विभागाचे पहिले विभागप्रमुख होते. त्यानंतर या विभागात डॉ. यू. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. गो. मा. पवार, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रभाकर मांडे या व्यासंगी प्राध्यापकांची नियुक्ती झाली व विभागाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली.

विशेष योगदान

संपादन

मराठवाडयाच्या ग्रामीण भागातून लोकसंग्रहातील प्राचीन हस्तलिखिते मिळविणे, त्यांचे संशोधन व जतन करणे असे मोलाचे कार्यही विभागात पूर्वीपासून चालत आलेले आहे. प्रा. अरविंद थिटे, प्रा. ढोके, प्रा. अरविंद कुरुंदकर  व डॉ. सुधारक चांदजकर या संशोधन साहाय्यकांनी या प्राचीन हस्तलिखितांच्या नोंदीचे कार्य केले. त्यातील काही हस्तलिखितांचे संशोधन डॉ. यू. म. पठाण, यांच्या मार्गदर्शनाखाली कै. अरविंद कुरूंदकर आणि डॉ. सुधाकर चांदजकर यांच्या सहकार्याने करून काही पुस्तकेही विद्यापीठाच्या साहाय्याने प्रकाशित केली आहेत.


थोर कलावादी समीक्षक कै. वा. ल. कुलकर्णी यांनी या विभागात शिक्षण घेणाऱ्या पहिल्या शिक्षित पिढीतील वाचकांची आणि साहित्यिकांची पिढी घडविली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. डॉ. यू. म. पठाण मराठी विभागाचे माजी प्रमुख संत वाङ्मयाचे  गाढे अभ्यासक  म्हणून ओळखले जातात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. लोकसाहित्य या विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी याच विद्यापीठात प्रथम झाली याचे श्रेय डॉ. प्रभाकर मांडे यांना आहे. विभागातीलच माजी विद्यार्थी नंतर विभागातच प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पुढे सदरील विद्यापीठाचे कुलगुरू असा अभिमानास्पद प्रवास असलेले मा. डॉ. नागनाथ कोतापल्ले हे आदर्श होत. शिवाय त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. याप्रमाणेच या विभागाचे माजी विद्यार्थी कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांनाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान प्राप्त झाला. सुरुवातीच्या काळात प्राचार्य डॉ. मा. गो. देशमुख, डॉ. ल. म. भिंगारे, प्रा. भगवंत देशमुख हे ज्येष्ठ समीक्षकही अभ्यागत प्राध्यापक म्हणून विभागात कार्यरत होते.

आज महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि लोकसाहित्य या तीनही प्रवाहांचा अभ्यास संशोधनाचा पातळीवर चालू आहे. या विभागाने दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य या दोन प्रवाहांना अतिशय समृद्ध केले. निर्मितीच्या पातळीवर कार्य करणाऱ्या लेखकांत मोठया प्रमाणात विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. प्राचार्य रा.रं. बोराडे आणि प्रा. फ. मुं. शिंदे हे दोन्ही साहित्यिक अनुक्रमे महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचे[१] आणि रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते दोघेही याच विभागाचे विद्यार्थी होत.जागतिक पातळीवरचे  परदेशी अभ्यासक डॉ. सोनथायमर आणि डॉ. एलिनार झेलियट यांनी या विभागास भेट देऊन दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह पाहून समाधान व्यक्त केले आहे. तसेच डॉ. दुशान डिक यांनीही येथे संशोधन कार्य केले आहे. १९८० पासून मराठी विभागात एम. फिल.च्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. एम. फिल.च्या संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधनही दखल पात्र आहे.

इ.स. २०१८ सालात मराठी विभागात पाच प्राध्यापक असून प्राचीन मराठी वाङ्मय, आधुनिक मराठी वाङ्मय, वाङ्मयाचा इतिहास] लोकसाहित्य, साहित्य समीक्षेची मूलतत्त्वे, दलित-ग्रामीण-स्त्रीवादी‌-आदिवासी साहित्य प्रवाह, भाषिक कौशल्ये, प्रसारमाध्यमे व सृजनशील लेखन तसेच भाषाविज्ञान अशा अभ्यासपत्रिका अभ्यासल्या जातात. तसेच या क्षेत्रातील संशोधनाचे कार्यही तेव्हापासून अविरत सुरू आहे.

मराठी विभागाचे विभागप्रमुख व कार्यकाल

संपादन
अ.क्र. विभागप्रमुख कार्यकाल
प्रा. वा. ल. कुलकर्णी १९५९-१९७३
प्रा.डॉ. यू. म. पठाण १९७३-१९९०
प्रा.डॉ. सुधीर रसाळ १९९०-१९९३
प्रा.डॉ. एस. एस. भोसले १९९३-१९९५
प्रा.डॉ. गंगाधर पानतावणे १९९५-१९९७
प्रा.डॉ. सुदाम जाधव १९९७-१९९९
प्रा.डॉ. शरद व्‍यवहारे १९९९-२००१
प्रा.डाॅ. बाळकृष्‍ण कवठेकर २००१-२००३
प्रा. दत्ता भगत २००३-२००५
१० प्रा.डॉ. भगवान ठाकूर २००५-२००६
११ प्रा.डॉ. प्रल्‍हाद लुलेकर २००६-२००९
१२ प्रा.डॉ. सुदाम जाधव २००९-२०१०
१४ प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर २०१०-२०११
१५ प्रा.डॉ. परशुराम गिमेकर २०११-२०१४
१६ प्रा.डॉ. सतीश बडवे २०१४-२०१७
१७ प्रा.डॉ. अशोक देशमाने २०१७ पासून

संदर्भ

संपादन
  1. ^ https://web.archive.org/web/20180501115245/https://msblc.maharashtra.gov.in/. Archived from the original on 2018-05-01. Missing or empty |title= (सहाय्य)