महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
स्थापना
संपादनमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) ही पुण्यातील बालवर्गापासून ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. या संस्थेची सुरुवात इ.स. १८६० साली, महागावकर इंग्लिश स्कूल, पूना या पासून झाली.[१] नारो रामचंद्र उर्फ नाना महागावकर यांची ही शाळा होती. त्यानंतर ही शाळा श्री.बापू भाजेकर ह्यांच्याकडून १८७४ साली वामन प्रभाकर भावे, वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर ह्यांच्याकडे हस्तांतरित झाली. त्यावेळी तिचे नाव पूना नेटिव इन्स्टिट्यूशन असे होते. महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे संस्थेचे पहिले सचिव आणि खजिनदार होते. पूना नेटिव इन्स्टिट्यूशनने महाराष्ट्र कॉलेजची स्थापना इ.स.१८९६ साली केली होती परंतु ब्रिटीशांच्या रोषामुळे ते इ.स.१८९९ मध्ये बंद करावे लागले.[२]
नामांतर
संपादनपूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशनचे रूपांतर पुढे इ.स.१९२२ साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले. ही संस्था पुण्यात मुलांचे भावे स्कूल, मुलींचे भावे स्कूल (रेणुका स्वरूप मेमोरिअल हायस्कूल), बालशिक्षण मंदिर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, आणि एमईएस कॉलेज ऊर्फ आबासाहेब गरवारे आर्ट्स-सायन्स कॉलेज आणि गरवारे कॉमर्स कॉलेज चालवते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुण्याव्यतिरिक्त अहमदनगर, कळंबोली, पनवेल, बारामती, बेलापूर, रत्नागिरी, सासवड, शिरवळ आदी गावांमध्ये शाळा आहेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० व्या वर्षाच्या पूर्तीनिमित्त प्रकाशित झालेल्या 'ध्यासपंथे चालता' या इतिहास-ग्रंथाचे प्रकाशन फेब्रुवारी २०२२ मध्ये भारताचे उपराष्ट्रपती मा.श्री.वेंकैया नायडू यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले. डॉ.केतकी मोडक या त्याच्या लेखिका आहेत.