भूत लेणी

महाराष्ट्रातील प्राचीन लेणी

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात येणाऱ्या मानमोडी डोंगरातील भीमाशंकर आणि अंबा-अंबिका या लेण्यांबरोबरच त्याच डोंगरात भूत लेणी नावाने ओळखल्या जाणारा लेण्यांचा एक तिसरा गट आहे. अंबा-अंबिका गटापासून अर्धा किलोमीटरवर ही लेणी आहेत. डोंगरकड्यालगत आणि झाडीभरल्या या वाटेवरून पंधरा-वीस मिनिटे चालले की ऐन कड्यावर ही भूत लेणी दिसतात.

ही लेणी या डोंगरावरील सर्वात प्राचीन, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकातल्या उत्तरार्धात खोदली गेली आहेत. एकूण ३६ लेणी. यांना ३४ ते ४९ असे क्रमांक दिले आहेत. या लेण्यांत कायकाय आहे? बौद्धविहार, पाण्याचे टाके, चैत्यगृह, ब्राह्मीलिपीतील दानधर्म केल्याचा शिलालेख, चैत्यकमानी, स्तूप, आणि कोरलेली फुलांची नक्षी, नंदीपद आणि त्रिरत्न. श्रीवत्स आणि धम्मचक्र ही शुभचिन्हे. काही पुरुषाकृती आणि बोधीवृक्ष.

लेण्यांमध्ये कोरलेले नाग, गरुड, हत्ती आणि संमिश्र पशुपक्षी मानवाने कोरले असणे शक्य नाही. हे भुतांचेच काम असले पाहिजे, या समजुतीनेच बहुधा या लेण्यांना भूतलेणी म्हणत असावेत.