भारती गोसावी
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
भारती बाळ गोसावी-माहेरच्या दमयंती कुमठेकर (जन्म : २२ जून, इ.स.१९४१) या एक मराठी नाट्यअभिनेत्री आहेत. ५८ वर्षांमध्ये त्यांनी ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्यावर भूमिका केल्या आहेत.
भारती गोसावी यांच्या आईवडिलांना नाटकाची आवड होती. त्यावेळी पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये पृथ्वी थिएटर आणि बालगंधर्वांची नाटके होत. घरी नाटकाचेच वातावरण असल्याने भारतींचा नाटकात प्रवेश झाला. शंकर लोहकरे हे त्यांचे पहिले गुरू.
भारती गोसावी यांनी इ.स. १९५८मध्ये सौभद्र नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. पदार्पणातच त्यांना छोटा गंधर्वांबरोबर काम करायला मिळाले. भारती गोसावी यांनी पुढे संशयकल्लोळ, मानापमान या नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या. पौराणिक, ऐतिहासिक, संगीत नाटकांसह लोकनाट्य, फार्सिकल, कौटुंबिक, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळय़ा नाटकांतून भूमिका करताना भारती गोसावी यांनी अण्णासाहेब किलरेस्कर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा दिग्गज नाटककारांची भाषा समर्थपणे पेलली आहे.
दरम्यानच्या काळात भारती गोसावी यांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण मंडळ, आदी विविध एकांकिका स्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली. विजया मेहता तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धी असत. या स्पर्धांत भारतींना इतकी पारितोषिके मिळाली की शेवटी आयोजकांना त्यांना पत्र लिहून थांबायला सांगितले आणि दुसऱ्यांनाही संधी मिळू द्या अशी विनंती केली.
भारती गोसावी यांचे लग्न नाट्यअभिनेते बाळ गोसावी यांच्याशी झाले. मोठे दीर राजा गोसावी हेही अभिनेते होते. त्यामुळे लग्नानंतरही भारती यांची नाट्यकारकीर्द चालूच राहिली. त्यांनी अत्रे थिएटर्स, कलावैभव, चंद्रलेखा, नाट्यमंदार, पराग आदी नाटकमंडळींच्या नाटकांत कामे केली. काशीनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर आदी दिग्गज नायकांबरोबर भारती गोसावी यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये गीताची भूमिका केली.
नाटके आणि त्यांतील भूमिका
संपादन- अती शहाणी (योजना)
- आम्ही रेडिओ घेतो (रंजना)
- कुणी गोविंद घ्या (प्रतिभा)
- कुर्यात् पुन्हा टिंगलम् (सूनबाई)
- कुर्यात् सदा टिंगलम् (सूनबाई - सुनीता देशपांडे, लीला बापट)
- खट्याळ काळजात घुसली (मिसेस कोटस्थाने
- जळो जिणे लाजिरवाणे (सुशीला)
- तुझे आहे तुजपाशी (गीता)
- तू वेडा कुंभार (वंचा)
- दोघांत एक (स्मिता)
- धन आले माझ्या दारी (अंबिका; अहिल्या)
- नाही म्हणायचं नाही (आई; राणी)
- प्रेमा तुझा रंग कसा (बब्बड)
- बेबंदशाही
- मंगळसूत्र
- मला तुमची पप्पी द्या
- माझा कुणा म्हणू मी (माधवी)
- मुजरा लोककलेचा (पाटलीणबाई)
- या सम हा (नटी-सूत्रधार)
- लग्नाची बेडी (अरुणा; गार्गी; यामिनी; रश्मी)
- वाहतो ही दुर्वांची जुडी (ताई)
- मानापमान
- संशयकल्लोळ (कृत्तिका)
- सुंदर मी होणार (बेबीराजे)
- सौभद्र (रुक्मिणी)
- क्षण एक पुरे प्रेमाचा
सन्मान आणि पुरस्कार
संपादन- अखिल भारतीय नाट्य परिषद, मनोरंजन (पुणे) व भरत नाट्य संशोधन मंडळ या संस्थांतर्फे वयाची पंचाहत्तर आणि रंगभूमीवर ५८ वर्षे पूर्ण केली म्हणून सत्कार (२३-६-२०१६)
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचा २०१५ सालचा चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार (५-११-२०१५)