ब्रह्मचर्य

(ब्रम्हचर्य या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रह्मचर्य हा योगाच्या आधारभूत स्तंभांपैकी एक आहे. ब्रह्मचर्याश्रम हा वैदिक धर्माश्रमानूसार माणसाच्या आयुष्याचा प्रथम भाग आहे. हा काळ साधारणतः वयाच्या ०-२५ वर्षे या कालखंडात असतो. आणि या आश्रमाचे पालन करत प्रत्येक विद्यार्थांना भावी आयुष्यासाठी विद्याग्रहण करावी लागते.

पाच नियम

संपादन

ब्रम्हचर्य आश्रमांचे नियम -

नारद म्हणतात – गुरुकुलात निवास करणाऱ्या ब्रह्मचाऱ्याने आपली इंद्रिये स्वाधीन ठेवून दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे,

गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवावे आणि त्यांच्या हिताचे असेल तेच कार्य करावे.

सायंकाळी आणि प्रातःकाळी गुरू, अग्नी, सूर्य आणि श्रेष्ठ देवतांची उपासना करावी आणि मौन राहून एकाग्रतेने गायत्रीचा जप करीत दोन्ही वेळेची संध्या करावी. (१-२)

गुरुजी जेव्हा बोलावतील, तेव्हा संपूर्ण शिस्त पाळून त्यांच्याकडून वेदांचे अध्ययन करावे.

पाठाच्या प्रारंभी आणि शेवटी त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करावा.

शास्त्राच्या आज्ञेनुसार मेखला, मृगचर्म, वस्त्र, जटा, दंड, कमंडलू, यज्ञोपवित आणि हातामध्ये दर्भपवित्र धारण करावे.

सायंकाळी आणि प्रातःकाळी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरुजींना समर्पित करावी. त्यांनी अनुज्ञा दिली तर भोजन करावे, नाहीतर उपास करावा.

आपल्या शीलाचे रक्षण करावे.

थोडे खावे,

आपले काम निपुणतेने करावे,

श्रद्धा ठेवावी आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे.

स्त्री आणि स्त्रियांच्या अधीन राहणारे यांच्याशी आवश्यक असेल, तेवढाच व्यवहार करावा.

जो गृहस्थाश्रमी नाही आणि ब्रह्मचारी आहे, त्याने स्त्रियांविषयी चाललेल्या गोष्टींपासून अलिप्त राहावे.

इंद्रिये अतिशय बलवान आहेत. प्रयत्‍न करणाऱ्यांचे मनसुद्धा ती क्षुब्ध करून त्यांना आपल्याकडे ओढतात.

तरुण ब्रह्मचाऱ्याने तरुण गुरुपत्‍नीकडून

भांग पाडणे, शरीराला मालिश करणे, स्नान घालणे, उटणे लावणे यांसारखी कामे करून घेऊ नयेत.

स्त्रिया अग्नीप्रमाणे तर पुरुष तुपाच्या घड्याप्रमाणे होत.

आपल्या कन्येबरोबरसुद्धा एकांतात राहू नये.

इतर वेळी सुद्धा जरुरीपुरतेच तिच्याजवळ असावे.

जोपर्यंत हा जीव आत्मसाक्षात्काराने हा देह आणि इंद्रिये केवळ आभास आहेत असा निश्चय करून स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत “हा पुरुष आणि ही स्त्री” हे द्वैत संपत नाही. तोपर्यंत त्याची भोगबुद्धी कायम असते. हे निश्चित. (३-१०)

शील-रक्षणाचे हे सर्व नियम गृहस्थ व संन्यासी या दोघांनाही लागू आहेत.

गृहस्थाश्रम्याने गुरुकुलात राहून गुरूची सेवा करणे हे (समयानुसार) ऐच्छिक आहे. कारण पत्‍नीच्या ऋतुकाळी त्याला तेथून घरी जावे लागते.

ब्रह्मचाऱ्याने काजळ घालणे, तेल लावणे, मालिश करणे, स्त्रियांची चित्रे काढणे, मांस खाणे, मद्य पिणे, फुलांचे हार घालणे, अत्तर, सुवासिक तेल, चंदन लावणे आणि अलंकार घालणे यांचा त्याग करावा.

अशा प्रकारे गुरुकुलात वास्तव्य करून द्विजांनी आपली शक्ती आणि आवश्यकता पाहून वेद, त्यांची सहा अंगे आणि उपनिषदे यांचे, अध्ययन करावे. तसेच त्यांचा अर्थ समजून घ्यावा. तसेच जर सामर्थ्य असेल, तर गुरू मागतील तेवढी दक्षिणा द्यावी. नंतर त्यांच्या आज्ञेने गृहस्थ, वानप्रस्थ किंआ संन्यास आश्रमात प्रवेश करावा किंवा जन्मभर ब्रह्मचर्याचे पालन करीत त्याच आश्रमात राहावे.

जरी भगवंत स्वाभाविकपणे सर्व ठिकाणी व्यापून असल्यामुळे त्यांचे येणेजाणे असू शकत नाही, तरीसुद्धा अग्नी, गुरू, आत्मा आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वतःच्या अंशभूत जीवरूपाने ते प्रविष्ट आहेत, असे पाहावे.

अशा प्रकारे आचरण करणारा ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी किंवा गृहस्थ विज्ञानसंपन्न होऊन परब्रह्मतत्त्वाचा अनुभव घेतो.

संदर्भ

संपादन

श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध-७ वा-अध्याय १२ वा ब्र (११-१६)

संपादन
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम  
ब्रह्मचर्याश्रमगृहस्थाश्रमवानप्रस्थाश्रमसंन्यस्ताश्रम