बानी देशपांडे उर्फ विद्याधर लक्ष्मण देशपांडे (१९२७ - ४ डिसेंबर, २०१५) हे एक भारतीय कम्युनिस्ट पुढारी होते. ते कमुनिस्ट पक्षाचे टोलेजंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणाऱ्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे जावई- त्यांच्या रोझा नावाच्या मुलीचे पती होते.

बानी देशपांडे हे १९५० साली स्टुडन्ट फेडरेशनचे कार्यकर्ते होते. पुढे कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव पडून ते कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य झाले. त्यांना १९५४ साली कम्युनिस्टांच्या चळवळीत तुरुंगवास झाला. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे व त्यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते.

कम्युनिस्ट असले तरी त्यांना इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे हिंदुस्थानी परंपरागत तत्त्वज्ञान, वेदवाङ्मय याविषयी इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे घृणा नव्हती. त्यांचा संस्कृतचा आणि वेदान्ताचा गाढा अभ्यास होता. दोन वर्षांच्या अथक अभ्यासाअंती त्यांनी ‘युनिव्हर्स ऑफ वेदान्त’ हे पुस्तक लिहिले.

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी स्वतः या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. डायलेक्टिक्स वेदान्तात आहे, असे बानींनी पुस्तकात म्हटले आहे. पाश्‍चात्त्य देशांकडे ओढा असलेल्या हिंदुस्थानींना आपल्या देशाबद्दल, भूतकाळाबद्दल आणि संस्कृतीबद्दल बोलायला कमीपणा वाटतो. विशेषतः हिरोडोरस, अ‍ॅरिस्टॉटल, एपिक्यूरस आणि हेगेल यांच्याविषयी बोलणे प्रतिष्ठेचे आणि आधुनिक वाटते तर बादरायण, व्यास, पतंजली किंवा शंकराचार्य यांच्याविषयी बोलणे केवळ मागासलेपणाचेच नव्हे तर राष्ट्रीय अभिनिवेशवादाचे प्रतीक आहे, असे बानींनी सांगितले आहे. या पुस्तकाला कॉ. डांगे यांनी प्रस्तावना दिल्यामुळे डांगे यांच्यावर कम्युनिस्टांनी त्यावेळी सडकून टीका केली होती. मात्र तरीही डांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले

२००१ साली दिल्ली येथील ‘वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स’ मध्ये बानींनी ‘थिएरॉटिकल फाऊंडेशन ऑफ ट्वेंटिएथ सेंच्युरी फिझिक्स इन एन्शन्ट इंडिया’ या रिसर्च पेपरचे वाचन केले. आइनस्टाइनचा भौतिकवाद प्राचीन हिंदुस्थानात होता, असे ठामपणे सांगणारा हा अभ्यास होता.

बानींचे ग्रंथलेखन संपादन

  • कम्युनिस्ट मुव्हमेंट अॅन्ड दि इंडियन नॅशनल काँग्रेस
  • ’डांगे एक इतिहास' या रोझा देशपांडे यांच्या आगामी पुस्तकासाठी लेखनसहभाग
  • मार्क्सवादी दर्शन की वैदिक परंपरा (हिंदी)
  • युनिव्हर्स ऑफ वेदान्त