बंजारा

भारतीय गोर बंजारा समाज ( Indian Gor - Banjara Community )


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन वंश आहे. या गोरवंशीय लोकांनाच भारतात बहुतांशी 'गोर बंजारा' या नावाने ओळखले जाते. गोर-बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा महत्त्वाचा घटक होय. भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे बघितल्या जाते. काटक, लढवय्या, साहसी व निसर्गप्रेमी अशी त्यांची खरी ओळख. त्यांचे पुर्वीचे मुख्य स्थान राजपुताना, मारवाड मानले जाते. मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर राजपुतानाचा जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे अनेक टोळया राजस्थानमधून दक्षिण मध्य, उत्तर भारतातील काही राज्यामध्ये तर काहींनी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश मध्ये येऊन वेगवेगळ्या नावांनी राहू लागली. महाराणा प्रताप सोबत काही टोळ्या जंगलात गेल्या आणि जंगलात आपले बस्तान त्यांनी बसविले.

बंजारा जमातीच्या समुदायासाठी गोरमाटी असाही एक शब्दप्रयोग केला जातो. 'मातीशी जुळलेला माणूस' , 'मातीशी नातं ठेवणारा माणूस' म्हणजे गोरमाटी. हिंदी भाषेत 'गौर' नावानेही ओळखले जाते. अर्थातच गोरमाटी हा शब्दप्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकीयांसाठीच करताना दिसतात. तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही. अनेक सिनेगीतातून, हिंदी काव्यरचना इत्यादींमधून 'बंजारा' या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आपणास सापडतो. 'बंजारा' लोकगणासाठी व्यापक अर्थाने गोरबंजारा, गौर बणजारा असा शब्द प्रयोग होताना दिसतो .

आपल्या भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात बंजारा समाज हा 'बंजारा' , गोर-बंजारा' 'गोरमाटी' , 'लमाणी', 'लभाण' , लभाणी', 'लभाणा', 'सुगाळी' , 'बाजीगर', 'नायक' इत्यादी अनेकविध नावाने ओळखला जातो. परंतु या समुदातातील विविध उपसमुहाचे व्यवसाय पूर्वी जरी भिन्न होते, परंतु यातील अनेक उपसमुह हे स्वतः बंजारा नाव धारण केल्याने बंजारा म्हणून ओळखू लागली. गौरबंजारा ही क्षत्रिय जमात असून यात अनेक शूरवीर, छोट्या छोट्या भूभागाचे साम्राज्याचे अधिपती असल्याचे संदर्भ ही इतिहासात सापडतो. आजमितीला बंजारा समाज हा भारतातील जवळ जवळ सर्वच राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळते.

• बंजारा शब्दाचा अर्थ व उत्पत्ती :-

१. वाणिज्यकार :- ऋग्वेदात व्यापाराशी संबंध असणाऱ्या व्यक्तीस 'वाणिज्य' असे म्हटले आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती 'वाणिज्य' या संस्कृत शब्दापासून झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. गोर-बंजारा लोक पूर्वीच्या काळी कापडाचे तागे, अन्नधान्य, मसाले पदार्थ , शस्त्रसाठा पुरवीत .पद्धतशीरपणे आपल्या बैलांच्या पाठीवर लादून भारतातील वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असत. जीवनावश्यक वस्तू आपल्या बैलांच्या पाठीवर लादून व्यापार करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला 'लदेणी' असे म्हणतात.

'वाणिज्य' या संस्कृत शब्दासाठी हिंदी भाषेत 'बनज' असा शब्द प्रयोग आढळतो. 'बनज' म्हणजे व्यापार करणाऱ्यांस 'बनिज' असे संबोधले जाई. पुढे 'बनिज' या शब्दावरून 'बंजारा' हा शब्द रूढ झाला असावा असा युक्तिवाद केला जातो. २. बनचर :- 'बंजारा' हा लोकवाचक शब्द 'बनचर' या हिंदी शब्दावरून रूढ झाला असावा असाही तर्क वर्तविला जातो. व्यापाराच्या निमित्ताने 'रानोमाळ भटकंती करणारा' या अर्थाने बंजारा शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे, असे गोर- बंजारा संस्कृतीचे अभ्यासक आत्माराम राठोड, डॉ.सुभाष राठोड म्हणतात. 'बनचर' म्हणजे वनात वास्तव्य करणारा लोकसमूह.

बंजारा लोकगणाच्या संदर्भात एक बाब अशी दिसते की, बंजारांची लोकवस्ती आजही प्रामुख्याने डोंगराळ भागात डोंगर पायथ्याच्या जवळ असल्याचे दिसून येते. त्यांचे डोंगराळ भाग निवडण्यामागे एक मुख्य कारण असे दिसते की गोर-बंजारांकडे मोठ्या प्रमाणात गुरे - ढोरे होती. त्यांना चारण्यासाठी ते वनाचा आसरा घेत असत. कालांतराने त्यांचा परंपरागत लदेणीचा व्यवसाय बंद पडल्याने ते जेथे होते तेथेच त्यांना स्थिरावणे भाग पडले असावे व 'बनचर' या शब्दाचे अपभ्रंश रूप 'बंजारा' असे झाले असावे. म्हणून 'बनचर' या शब्दापासून 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती झाली असावी हेही नाकारता येत नाही. परंतु राजपुतान्यातील अस्थिरतेमुळे क्षत्रिय समुह वेगवेगळ्या प्रदेशात रानावनात राहू लागली, यालाच पुढे बंजारा हे नाव धारण केल्याचेही संदर्भ इतिहासात सापडतो. गौर बंजारा समाजात राठोड, पवार, चव्हाण आणि जाधव हे प्रमुख कुल मानले जातात. यांची वंशावळी व गोत्र राजस्थानमधील क्षत्रियाशी बरीचशी मिळतेजुळते आहे. आजही त्यांच्या नावात अधिकतेने 'सिंह किंवा 'सिंग' असे नावापुढे लावले जाते. उदा. फुलसिंग, लाल सिंग, चतुरसिंह, हरीसिंघ वगैरे, तसेच गोत्र देखील राणावत, रणसोत, रामावत, सांगावत , झरपाल, बिंजरावत, मेघावत, खेतावत, धेगावत गोरावत, आमगोत, पालतीया , मालोत, पंवार, सांगावत, उधावत, धारावत, लोकावत, जाठरोत वगैरे. कुलदैवत महाकाली, जगदंबा असुन यालाच महागौरी असे म्हणतात. महागौरी हे गौर वंश सुचक दिसून येते. गौर बंजारा समाजात सातीभवानीला पुजल्या जाते. भगवान शंकराचा वाहन असलेल्या नंदीची पुजा आजही मोठ्या आस्थेने केली जाते. यालाच 'गराशा' असेही म्हटले जाते.

भारतीय गोर-बंजारा समाज एक आदिम क्षत्रिय समाजगण असून त्यांची लोकसंस्कृती ही तितकीच पुरातन व लौकिक असल्याचे दिसते. गोर बंजाराचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य व पराक्रम यांनी समृद्ध आहे. उपजतच कष्टाळू, मुलत:च सृजनशील असा हा समाजगण असून आपले सांस्कृतिक आविष्कार सण-उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच-गाण्यात आनंद शोधणाऱ्या बंजारा समाजाने काशीदाकारी सारख्या अनेक कलाकुसरींची मनोभावे जपणूक केली आहे.

संपूर्ण भारतात गोरबंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या वस्त्या आहेत. लदेणी व्यवसायाच्या निमित्ताने मध्य युगापर्यंत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात अविरत भटकंतीचे जीवन जगत होता. आपला परंपरागत व्यवसाय इंग्रजांच्या आगमनानंतर उद्ध्वस्त झाल्याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तो एका ठिकाणी स्थिरावल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. गोरबंजारा वस्तीस्थानास 'तांडा' असे म्हणतात. 'तांडा' मध्ये प्राचीन काळापासून आजही 'सेनं सायी वेस' ही वैश्विक कल्याणासाठी सामुदायिक प्रार्थना केली जाते.[१][२][३][४][५][६][७]

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ LOHGARH -The worlds largest fort,The capital of the sikh kingdom. दिल्ली: ब्ल्यू रोज पब्लिशर्स. २०१९.
  2. ^ पाटील, बळीराम हिरामण (२०१२). बंजारा लोगोका इतिहास. गुजरात: नवदुर्गा प्रकाशन.
  3. ^ राठौड, डॉ. जयपाल सिंह (२०१५). बंजारो का सांस्कृतिक इतिहास. जोधपूर, राजस्थान: राजस्थानी ग्रंथागार.
  4. ^ राठोड, डॉ. गोविंदसिंह. मारवाड की सांस्कृतिक धरोहर.
  5. ^ कापडी, रामसिंह (१९६३). गोर वंश का इतिहास. हरियाणा.
  6. ^ बलजोत, इंदरसींग (२०१२). गोर राजपूतो के अनमोल रतन. पंजाब.
  7. ^ Vaidya, C. V. (१९२१). History of Medieval Hindu.