बँक मेळपत्रक

(बँक जुळवणीपत्रक या पानावरून पुनर्निर्देशित)

बँक खाते पुस्तक अथवा खाते उतारा या प्रमाणे असणारी शिल्लक ही व्यावसायिकाच्या रोख पुस्तकानुसार येणाऱ्या शिलकी इतकीच असायला हवी . पण काही कारणांमुळे या शिल्लक रकमेत तफावत येऊ शकते. या तफावतीची करणे शोधून दोन्ही पुस्तकातील शिल्लक रकमेचा मेळ घालणाऱ्या विवरणास बँक मेळपत्रक किंवा बँक जुळवणीपत्रक असे म्हणतात.

व्याख्या

संपादन

बँक मेळपत्रक हे एक असे विवरण आहे की जे रोख पुस्तकातील बँक रकान्याची शिल्लक तसेच बँक खातेपुस्तकातील शिल्लक यातील फरकाचा मेळ घालण्यासाठी तयार केले जाते आणि दोन्ही शिल्कांमध्ये फरक का पडला याची कारणे दर्शवते.[]

बँक मेळपत्रकाची गरज

संपादन

१) बँकेत जमा होणाऱ्या रकमेवर तसेच कर्मचाऱ्यांनी रोख नोंदी अद्ययावत ठेवल्या आहेत की नाही यावर बँक मेळपत्रकामार्फत लक्ष ठेवता येते. कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी वाढते.

२) रोख रकमेची हाताळणी तसेच बँकेतील शिल्लक रक्कम यामध्ये घोटाळा होण्याची शक्यता कमी होते.

३) रोख पुस्तक किंवा बँकेचे खाते पुस्तक यामध्ये गाळलेल्या नोंदी तसेच चुका ओळखण्यासाठी बँक मेळपत्रक उपयुक्त ठरते.

४) केवळ बँकेच्या खाते पुस्तकात असणाऱ्या नोंदी समजतात.[]

रोख पुस्तक आणि बँक खाते पुस्तक यात फरक पडण्याची कारणे

संपादन

१) काळामधील तफावत - व्यवहारांची लेखापुस्तकात केलेली नोंद आणि बँकेच्या पुस्तकात झालेली नोंद या मध्ये उशीर होऊ शकतो. उदा. एखाद्या धनकोला दिलेला धनादेश व्यवसायाच्या लेखा मध्ये लगेच लिहिला जातो परंतु बँकेत समाशोधन होऊन त्या धनादेशाचे शोधन होण्यास वेळ जातो, बँकेत जमा केलेले पण बँकेने अजून वसूल न केलेले धनादेश.

२) बँकेत परस्पर नोंदवले गेलेले व्यवहार - व्याजाची रक्कम खात्यावर जमा होणे, खात्यावर परस्पर जमा किंवा नावे होणारे लाभांश, विमा रक्कम, सेवा शुल्क इत्यादी व्यवहार, खातेदाराच्या सूचनेप्रमाणे शोधन केली गेलेली वीज , दूरध्वनी देयके, कर्जाचे हप्ते इत्यादी, अनादर झालेलेल धनादेश अथवा विपत्र (बिल)

३) मानवी चुका - व्यवहार नोंदवण्यामध्ये झालेल्या चुका उदा. एखादा व्यवहार लिहिण्याचे राहून जाणे, रक्कम चुकीची लिहिणे, दुसऱ्या खात्यावरील रक्कम नजरचुकीने जमा किंवा नावे करणे.

बँक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत

संपादन

बँक मेळपत्रक बनवणे ही एका व्यवसायाची गरज असते.[]

१) मेळपत्रक बनवण्याची सुरुवात रोख पुस्तक किंवा बँक खाते पुस्तकातील शिल्लक रक्कम घेऊन शेवट दुसरी शिल्लक कशी आली तो शोधण्यामध्ये होतो.त्यामुळे एक कुठली तरी शिल्लक मेळपत्रकासाठी घ्यावी. उदाहरणासाठी आपण रोख पुस्तकातील शिल्लक रकमेने सुरुवात करू.

२) समजा रोख पुस्तकातील रक्कम एखाद्या व्यवहारामुळे वाढत असेल तर त्या व्यवहारासमोर + चिन्ह करतात. आपण दिलेला धनादेश बँकेत अजून वटवला गेला नाही म्हणजेच रोख पुस्तकातील शिल्लक वाढेल. किंवा बँक खात्यामध्ये मुदत ठेवीची रक्कम जमा झाली तर रोख पुस्तकातील शिलकीत ती वाढवावी लागेल.

३) त्याच प्रमाणे रोख पुस्तकातील शिल्लक कमी करणाऱ्या व्यवहारांसमोर - (वजा ) चिन्ह करतात. कर्जाचा हप्ता बँक खात्यातून वळता केला गेला. याची नोंद रोख पुस्तकात करून शिल्लक कमी करावी लागेल.

४) अशा प्रकारे एका पुस्तकात दिसणाऱ्या पण दुसरीकडे न दिसणाऱ्या सर्व व्यवहारांची मोजणी करून बँक खाते पुस्तकाची शिल्लक कशी आली हे समजू शकते.

५) रोख पुस्तका प्रमाणे बँक खात्याच्या नावे असणारी शिल्लक बँकेत मात्र ग्राहकाच्या खात्यावर जमा शिल्लक म्हणून दाखवली जाते. त्याच प्रमाणे व्यापाऱ्याने बँकेतून उचल (ओव्हरड्राफ्ट) घेतली असेल व्यापाऱ्याच्या रोख खात्यामध्ये बँकेची शिल्लक जमा दिसते म्हणजेच त्या धंद्याच्या दृष्टीने बँक ही धनको बनते. थोडक्यात आपण बँकेच्या पुस्तकाप्रमाणे की व्यापाऱ्याच्या पुस्तकाप्रमाणे शिल्लक बघतो आहोत यावर शिल्लक रकमेचा अर्थ लावावा लागतो.

प्रारूप

संपादन

रोख पुस्तकाची नावे शिल्लक ही अनुकूल शिल्लक म्हणून ओळखली जाते. तर रोख पुस्तकातील जमा शिल्लक बँकेतून घेतलेली उचल (ओव्हरड्राफ्ट ) दर्शवते.

बँक मेळ पत्रक दिनांक ३१- मार्च - २०१८ रोजीचे
विवरण अधिक करावयाचे घटक

रुपये.

वजा करावयाचे घटक

रुपये

रोख पुस्तकानुसार शिल्लक / बँक खाते पुस्तकानुसार शिल्लक / बँकेतील उचल XXXX
(+) शिल्लक वाढवणारे व्यवहार XXXX
(-) शिल्लक कमी करणारे व्यवहार XXXX
बँक खाते पुस्तकानुसार शिल्लक / बँकेतील उचल / रोख पुस्तकानुसार बँकेतील शिल्लक XXXX

संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.accountingtools.com/articles/2017/5/17/bank-reconciliation
  2. ^ ESSENTIALS OF FINANCIAL ACCOUNTING By ASISH K. BHATTACHARYYA pg no197 ISBN no 8120353153, 9788120353152
  3. ^ https://www.accountingcoach.com/bank-reconciliation/explanation