फ्रेंच राज्यक्रांती

अठराव्या शतकातील राज्यक्रांती

फ्रेंच राज्यक्रांती (फ्रेंच: Révolution française) म्हणजे फ्रान्समध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९९ या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ होय. या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित युरोपच्या इतिहासास कलाटणी दिली. अनेक शतके फ्रान्सवर राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही राज्यक्रांतीच्या तीनच वर्षांमध्ये उलथून पडली. कट्टर डाव्या विचारसरणीच्या राजकीय गटांच्या, रस्त्यावर उतरलेल्या लोकशक्तीच्या व शेतकऱ्यांच्या एकत्रित रेट्यामुळे फ्रेंच समाजावरचा सरंजामशाहीवादी, धर्मशास्त्रप्रणीत मूल्यव्यवस्थेचा पगडा ओसरून समाजात मोठे पुनरुत्थान घडून आले. जुन्या रूढीगत परंपरा, तसेच राजेशाही, सरंजामशाही, धर्मसत्ता यांच्या योगे रुजलेल्या सामाजिक कल्पना व उतरंडीची व्यवस्था झुगारून दिल्या गेल्या व त्यांच्या जागी समता, नागरिकत्व, आणि मानवी हक्क ही प्रबोधक मूल्ये अंगिकारली गेली. या काळात मॅान्टेस्क्यू या विचारवंताने 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' मांडला होता. तसेच फ्रान्समधील अनियंत्रीत राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्समधील बुद्धिवादी लोकांवर मोठ्या प्रमाणात पडला होता. जॉ जॅकवेस रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते.

बास्तीय किल्ल्याचा पाडाव, १४ जुलै, इ.स. १७८९

इ.स. १७८९ च्या मे महिन्यात भरलेल्या "ल एता-जेनेरो", अर्थात समाजातील पुरोहित, सरंजामदार महाजन व सामान्यजन अशा तीन इस्टेटींच्या, सर्वसाधारण सभेमधून क्रांतीची ठिणगी पडली. जून महिन्यात तिसऱ्या इस्टेटीने टेनिस कोर्टावर प्रतिज्ञा घेतली; तर जुलै महिन्यात बॅस्तिये किल्ल्याचा पाडाव झाला. ऑगस्ट महिन्यात मानवाच्या व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात इतिहासप्रसिद्ध झालेल्या व्हर्सायवरच्या मोर्च्याने राजदरबाराला पॅरिसला परतण्यास भाग पाडले. पुढील काही वर्षे विविध मुक्तिवादी गट आणि परिवर्तनवादी प्रयत्नांना हाणून पाडू पाहणारी दक्षिणपंथी राजसत्ता यांच्यादरम्यान संघर्ष घडतच राहिले.

बाह्य दुवे

संपादन
  • "कोलंबिया एन्सायक्लोपीडिया या ज्ञानकोशातील फ्रेंच राज्यक्रांतीविषयक नोंद" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)