पूर्व मुक्तमार्ग (मुंबई)
पूर्व मुक्तमार्ग (Eastern Freeway) हा मुंबई शहरामधील एक नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. हा मार्ग घाटकोपर येथे सुरू होतो व दक्षिण मुंबईच्या पी. डि'मेलो रस्त्याजवळ संपतो. कोणताही काटरस्ता अथवा वाहतूकनियंत्रक सिग्नल नसलेला हा महामार्ग पूर्णपणे द्रुतगती स्वरूपाचा असून ह्यावर अवजड वाहने, दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने, बैलगाड्या, पादचारी इत्यादींना प्रवेश नाही. ह्या मार्गावर वाहनांना थांबता येत नाही
पूर्व मुक्तमार्ग | |
---|---|
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | १६.८ किलोमीटर (१०.४ मैल) |
सुरुवात | पूर्व द्रुतगती महामार्ग, घाटकोपर |
शेवट | पी. डि'मेलो रस्ता, दक्षिण मुंबई |
स्थान | |
शहरे | मुंबई |
राज्ये | महाराष्ट्र |
मुंबईच्या पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा इत्यादी स्थानांसोबत एका जलद दुव्याने जोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गाची संकल्पना रचली गेली. केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत ह्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध कररून दिला. एम.एम.आर.डी.ए.ने तीन टप्प्यांमध्ये ह्या मार्गाचे काम हाती घेतले. १२ जून २००१३ रोजी पी. डि'मेलो रस्ता ते चेंबूरच्या पांजरपोळापर्यंतचा १३.५९ किमी लांबीचा टप्पा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. १६ जून २०१४ रोजी उर्वरित भागाचे काम पूर्ण झाले व संपूर्ण १६.८ किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग वापरात आला.
पूर्व मुक्तमार्गाच्या बांधकामासाठी ₹ १,३४६ कोटी इतका खर्च आला असून ह्यामध्ये अनेक उड्डाणपूल व बोगदे बांधले गेले आहेत. खाजगी वाहनांखेरीज बेस्टचे अनेक मार्ग हा रस्ता वापरतात. २०१३ साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवी मुंबईमधील प्रवाशांच्या सोयीसाठी पूर्व मुक्त मार्गावरून जाणारी पनवेल ते मंत्रालय अशी वातानुकुलीत बस सेवा सुरू केली.