पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजी शब्द 'patriarchy' साठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता सारख्या शब्दांचा वापर केला जातो. 'कुटुंबामध्ये चालणारी पित्याची सत्ता' हा त्याचा शाब्दिक अर्थ आहे.

पितृसत्ता ही सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या कार्यरत असणारी सत्तेची संरचना आहे. ज्याच्या आधारे स्त्रीयांना दुय्यमत्त्व दिले जाते.

भेदभाव, दुर्लक्ष, नियंत्रण, शोषण, दडपशाही, हिंसा या स्वरूपात स्त्रियांवर कुटुंबात, कामाच्या ठिकाणी व समाजात दुय्यमत्व लादले जाते.[१]

आधुनिक स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्त्वाची संकल्पना म्हणून 'पितृसत्तेचा विचार होतो. स्त्रीवादी चळवळ, स्त्री-अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्तेचा विरोध' करणे हा एक कार्यक्रम असतो.'लिंगभाव' या संकल्पनेबरोबरच 'पितृसत्ता' ह्या संकल्पनेचा वापर स्त्रियांना संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व देण्यासाठी केला जातो, असा स्त्रियांचा आक्षेप असतो.

पितृसत्ता ही एक विशिष्ट समाजामध्ये पुरुष अधिकार व सत्तेची रचना स्पष्ट करणारी संज्ञा नसून याकडे एक विश्लेषणात्मक श्रेणी म्हणून बघणे आवश्यक आहे. [२]

पितृसत्तेचा उगमसंपादन करा

पितृसत्ता म्हणजे स्त्रियांना दुय्यम मानणारी, स्त्रियांवर दुय्यमत्व लादणारी सत्ता म्हणून पितृसत्तेचा विचार केला जातो. मुळात पितृसत्ता म्हणजे काय हे समजून घेताना पितृसत्तेचे विविध कोटीक्रम \ पैलू समजून घेणे आवश्यक आहे. पितृसत्ता ही कोणत्या प्रकारची सत्ता आहे. पितृसत्ता ही निर्माण  झाली ती कशी टिकवली जाते याविषयी ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. गर्डा लर्नर पितृसत्तेच्या निर्मितीविषयी त्यांच्या 'द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की' या पुस्तकात मांडतात कि, पुरुषांप्रमाणेच स्त्रियांदेखील इतिहासाचा विषय व इतिहासाच्या कर्त्या होत्या, स्त्रियांनी विश्वाच्या निर्मितीमध्ये पुरुषांइतकेच किवा त्याहीपेक्षा अधिक योगदान दिले आहे. अलीकडच्या काळापर्यंत इतिहासकार हे पुरुष होते आणि त्यांनी केवळ पुरुषांनी केलेल्या घटनांचीच नोंद केली. इतिहासकारांनी पुरुषांच्या अनुभवाला महत्त्वाचे स्थान दिले. स्त्रियांनी जे अनुभवले आणि स्त्रियांना जे महत्त्वाचे वाटले. त्याच्या नोंदी झाल्याच नाहीत. पुरुषांच्या अनुभवला इतिहासकारांनी इतिहास मानले होते.

पितृसत्तेची निर्मिती ही प्रत्यक्षरित्या आदिम राज्यसंस्थेमधून झाली आहे कारण आदिम राज्य संस्थेचा  पितृसत्तेची संरचना व कुटुंब हाच महत्त्वाचा घटक होता. पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्रियांच्या लैंगिकतेवर पुरुषांचे नियंत्रण आले. गर्दा लर्नरच्या मांडणीनुसार हे स्पष्ट होते की, विविध सामाजिक व्यवस्थामधील पितृसत्तेचा अभ्यास करून असा निष्कर्ष निघतो कि, पितृसत्ताक व्यवस्थेला मूळ असा उगम नसून ही व्यवस्था प्रक्रियेतून विकसित होत गेलेली व्यवस्था आहे.[३]

भारतातील  पितृसत्ता : कामगार, वर्ग, धर्मसंपादन करा

पितृसत्ता या सामाजिक संरचनेतून स्त्री कामगारांचा विचार केला तर असे दिसून येते की, पितृसत्ता या व्यवस्थेमुळे स्त्री कामगारांना औद्योगिक क्षेत्रात दडपशाही किंवा शोषणाला सामोरे जावे लागते.

श्रमिक म्हणून त्यांना दुय्यमत्वाचा दर्जा किवा वागणूक मिळते. स्त्री आणि पुरुष यांच्या कामाचे वाटप लिंगभाव विभाजनावर आधारित असते. पुरुषांच्या तुलनेने त्यांच्याबरोबर किंवा अधिक काम करूनही स्त्री कामगारांना वेतन हे पुरूषांपेक्षा कमीच दिले  जाते. [४]

कौटुंबिक जबाबदारी स्त्रिया पार पाडत असल्यातरी ते काम विनावेतन स्वरूपाचे असून त्याची दखल राष्ट्रीय उत्पन्नात घेतली जात नाही. पितृसत्तेचा जसा स्त्रियांवर परिणाम होतो तसा तो पुरूषांवर ही होतो. उच्चवर्गीय पुरुष हे कनिष्ठ वर्गातील पुरुषांचे शोषण करतात, ज्यांच्याकडून  साफसफाईचे व इतर कामे ही कनिष्ठ जातीय कामगारांकडून करवून घेतली जातात. [५]

औद्योगिक क्षेत्रातील श्रमिकांना किंवा मजुरांना मालक जे काम देतात ते करावे लागते. या क्षेत्रात मालक व मजूर यांच्यात एकतर्फी संबंध असल्यामुळे स्त्रियांप्रमाणे पुरुष कामगारांना सर्व स्तरातून येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अर्थातच पुरुष कामगार सुद्धा स्त्रियांप्रमाणेच एक दुर्लक्षित घटक बनून राहतो.

यानंतर भारतीय समाजात पितृसत्ता आणि वर्ग यांचा विचार केला असता सामाजिक वर्गाचे वर्गीकारण तीन भागात केले आहे. यामध्ये उच्च, मध्यम, कनिष्ठ वर्गाचा समावेश होतो. यात उच्च् वर्गाचा विचार केला असता यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय यांचा समावेश होतो. विभिन्न सामाजिक आणि राजनैतिक सिद्धांतानुसार शक्तिशाली वर्ग हा नेहमीच इतर वर्गावर आपली पकड मजबूत करण्यात प्रयत्नशील असतात. मध्यम वर्गामध्ये जमीनदार आणि धनी व्यापारी यांचा सामावेश होतो हा वर्ग कनिष्ठ वर्गावर अवलंबून असतो.

कनिष्ठ वर्गाचा विचार केला असता ते नेहमीच रोजगारासाठी तसेच मोलमजुरीसाठी उच्च आणि मध्यम वर्गावर अवलंबून असतात. पितृसत्ताक समाजात वर्ग आणि कामगाराच्याप्रमाणे धर्माच्या आधारे स्त्रियांचे स्थान हे दुय्यम ठरते आणि पुरुष वरचढ ठरतात. सदरील परिस्थितीला पुरुषी मानसिकता जबाबदार ठरते आणि तेवढीच धर्म आणि परंपरा जबाबदार ठरते. धर्मामुळे स्त्रियांवर बंधने लादली जातात.  पितृसत्तेत अशी एक विचारधारा आहे, ज्यामध्ये स्त्रिया या नेहमी आपल्या पतीद्वारे शासित केल्या जातात. स्त्रीवादी परिप्रेक्षातून धर्म या संकल्पनेत स्त्रीच्या शरीराला नेहमीच पुरुषाची संपत्ती मानली जाते म्हणून स्त्रियांना गुलाम बनविण्यात धर्मच कारणीभूत ठरतो. धर्मामुळे महिला सक्षमीकरणात बाधा येते तसेच समाजातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, धार्मिक बंधने व नियमने पाळत आल्यामुळे थोडक्यात ‘धर्म’ हा स्त्रियांना ‘दुबळे’ ठरविण्याचा सामाजिक संरचनेचा भाग आहे .

पेट्रीआरकल बारगेन / पितृसत्तात्मक वाटाघाटीसंपादन करा

लिंगभाव अभ्यासक /संशोधक डेनिस कान्दियोती ह्यांनी १९८८ मध्ये ‘Patriarchy Bargain’ (पितृसत्तात्मक वाटाघाटी) या त्यांच्या लिखाणामध्ये पितृसत्तेचे विविध पैलू दिले. कान्दियोती लिंगभावाच्या वाटाघाटीबद्दल मुख्य संहिता मांडतात , पितृसत्ता ही फक्त पुरुषच स्त्रीयांवर  गाजवतात असे नसून स्त्रियादेखील स्त्रियांवर पितृसत्ता गाजवतात. त्याचे स्प्ष्टीकरण या आधारे आहे कि, पितृसत्ताक समाजाचा परिणाम मुख्यत: कुटुंबपध्दतीवर असतो. कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुख ज्येष्ठ पुरुष हा कुटुंबातील इतर पुरुष, पत्नी व इतर स्त्रियांवर पितृसत्ता गाजवतात आणि  स्त्रिया ह्या अप्रत्यक्षपणे त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रियांवर पितृसत्ता गाजवतात ह्याचे मूळ कारण हे त्या स्त्रियांना स्वतःची सुरक्षित बाजू म्हणूनच वर्चस्व गाजवतात.

जसे कि, पितृसत्ताक (पितृवांशिक) कुटुंबपद्धतीमध्ये वयस्कर स्त्री ही कुटुंबावर सत्ता प्रस्थापित करू शकते मात्र तिच्यापेक्षा वयाने लहान स्त्री गाजवू शकत नाही. लहान स्त्री ही तिच्यापेक्षा लहान स्त्रीवर सत्ता गाजवते, घरातील सासू ही तिच्या मुल आणि सुनेवर सत्ता प्रस्थापित करते थोडक्यात पितृसत्तेच्या वाटाघाटी नुसार अप्रत्यक्षपणे स्त्री देखील स्वतः सुरक्षित बाजू टिकविण्यासाठी पितृसत्तेचा आधार घेते .

संशोधक कान्दियोती ह्या “Patriarchy Bargain’’च्या मांडणीतून समाजामध्ये स्त्रिया याच स्त्रियांच्या वैरीण आहेत या विचारसरणीबाबत चिकित्सक लेखन करतात .[६]

पितृसत्ता आणि जातव्यवस्थासंपादन करा

प्रख्यात स्त्रीवादी विचारवंत उमा चक्रवर्ती, व्ही. गीता आणि मेरी जॉन यांनी जात आणि पितृसत्ता यांच्या आंतरसंबंधाची मांडणी केली आहे.

उमा चक्रवर्ती आपल्या जेंडरिंग कास्ट या पुस्तकात मांडतात की भारतात ब्राह्मणी  पितृसत्ता ही पूर्वीपासून अस्तित्वात होती तसेच जात आणि पितृसत्ता यांचा आंतरसंबंध आहे.

जातीतील विवाह हे स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण करण्यासाठी तसेच उच्च जातीतील पुनरुत्पादनावर नियंत्रण करण्यासाठी होते. उच्च जातीतील स्त्रिया या जातव्यवस्था टिकवण्याचे प्रवेशद्वार असतात.

मनूच्या मांडणीनुसार स्त्रिया या स्वभावाने नैसर्गिकदृष्ट्या उग्र असतात त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. सदरील नियंत्रण हे धर्माच्या आधारे स्त्रीवर ठेवले जाते. उच्च वर्गातील स्त्रियांची  लैंगिकता ही पवित्र ठेवताना कनिष्ठ वर्गातील पुरुषांची लैंगिकता ही धोका म्हणून पहिली जाते. ब्राह्मणी  पितृसत्तेमध्ये जात व्यवस्था ही स्त्रियांवर कधी दबाव आणून तर कधी सहमतीने टिकवली जाते. जातीची उतरंड/सोपान आणि लिंगभावाची उतरंड/सोपान हे जातीव्यवस्था टिकवणाऱ्या मुलभूत व्यवस्था आहेत.

शेतीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये जमिनीला आर्थिक आणि सामाजिक मूल्य होते. जातीच्या आधारावर तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता आणि लिंगभावाच्या आधारावर तुम्हांला जमिनीमध्ये कितपत हस्तक्षेप करता येऊ शकतो हे निर्धारित होते. जमीन, लिंगभाव आणि जात ह्या एकमेकांशी संबंधित असलेले सत्तासंबध हे स्त्रीयांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवून कार्यरत आहेत.[७] [८]

  1. ^ Bhasin, Kamala (1998). What is Patriarchy?. New Delhi: Kali for Women. ISBN 8185107734.
  2. ^ Geetha, V (2009). Patriarchy. Kolkata: Stree. p. 5. ISBN 8185604460.
  3. ^ Lerner, Gerda (1988). The creation of Patriarchy. United Kingdom: Oxford University press. ISBN 9780195051858.
  4. ^ Papanek, Hanna (1979). "Family status production The "work" and "non-work" of women". Signs. vol. 4, No.4: 775–781 – JSTOR द्वारे.
  5. ^ Deshmukh-Ranadive, Joy (2002). Spaces for Power: Women's Work in South and South East Asia. New Delhi: Rainbow Publishers Ltd. ISBN 8186962565.
  6. ^ Kandiyoti, Deniz (September,1988). "Bargaining with Patriarchy" (PDF). Gender and Society. Vol.2, No.3: 274–290 – UIB द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ Chakravarti, Uma (2009). Gendering Caste through a feminist lens. Kolkata: Mandira Sen for STREE. p. 66. ISBN 8185604541.
  8. ^ Chakravarti, Uma (1993). "Conceptualising Brahmanical Patriarchy in early India : Gender, Caste, Class and State". Economic and Political Weekly. Vol.28, No.14: 579–585 – JSTOR द्वारे.