द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की
द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की[१] हा गर्डा लर्नर लिखित खंड आहे. हा १९८६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केला. यात आपल्या २५ वर्षांच्या संशोधन,लेखन व अध्यापनाच्या दीर्घ अनुभवानंतर लेखिका या ठाम निष्कर्षावर येतात कि,स्त्रियांचा इतिहास शोधणे व मांडणे ही स्त्रीमुक्ती साध्य करण्याकरिता अपरिहार्य अशी बाब आहे.[२]
पुस्तकाचे सार
संपादनकाळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या- त्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा इतिहास रचला गेला तेव्हा-तेव्हा इतिहासामध्ये त्या समाजातील स्त्रिया मात्र अदृश्यच राहिल्या.इतिहासलेखनाची सत्ता ही नेहमीच पुरुषांकडे असल्याने केवळ पुरुषांच्या नोंदी व विश्लेषण हेच इतिहास म्हणून या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये आजवर पुढे आले. स्त्रियांचे समाजनिर्मितीतील कर्तेपण, त्यांचे अनुभव यांच्या नोंदी मात्र इतिहासामध्ये जाणीवपूर्वकरित्या झाल्याच नाहीत. पितृसत्ताक अकादामिक विश्वाने सिद्धांकनाच्या निर्मितीपासून स्त्रियांना नेहमीच दूर ठेवले व याचे समर्थन म्हणून स्त्रियांच्या शारीरिक मर्यादांचे निमित्त पुढे केले. काळाच्या एका टप्प्यावर समाजनिर्मिती करणारा,मुक्त,सत्ताधारी असणारा स्त्रिया हा घटक नंतरच्या टप्प्यावर मात्र गुलाम बनतो,त्याचे कर्तेपण नाकारले जाते व जो केवळ एक प्रतिभाहीन असे पुनुरुत्पादनाचे साधन ठरतो.स्त्रियांच्या या अवनतीला पितृसत्ताक व्यवस्था जबाबदार असलेली दिसते.परंतु मातृसत्ता,स्त्रीराज्य लयास जाऊन पितृसत्ताक व्यवस्थेचा उदय होणे ही काळाच्या कुठल्यातरी एका टप्प्यावर घडलेली एक घटना नाही तर साधारणत: २५०० वर्षांपासून विकसित होत गेलेली ही एक दीर्घ अशी प्रक्रिया आहे.पितृसत्ताक व्यवस्थेने खाजगी मालमत्ता,लैंगिक नियंत्रण व राज्यसंस्था यांच्या आधारे बळकटी मिळवली.मार्क्सवादी विश्लेषणानुसार खाजगी संपत्तीतून स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण आले.परंतु स्त्रियांच्या लैंगिकतने त्यांचे वस्तूकरण होत या वस्तुकरणातूनच खाजगी मालमत्तेचा उदय झाला का याचा वेध या पुस्तकात घेतलेला आहे. पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणामध्ये स्त्रियांच्या गुलामगिरीचा शोध लेखिका घेतात.टोळ्यांमध्ये होणारी युद्ध थांबवण्याकरिता स्त्रियांची देवाणघेवाण केली जाऊ लागली. नंतरच्या टप्प्यावर युद्धामध्ये स्त्रिया जिंकल्या जाऊ लागल्या व गुलाम म्हणून त्यांची विक्री होऊ लागली.गुलामीची ही जी प्रथा सुरू झाली त्यामध्ये केवळ स्त्रियांचाच समावेश होता का? तर निश्चितच यामध्ये पुरुषांचाही समावेश होता.परंतु स्त्रियांच्या लैंगिकतेवर त्यांची गुलामगिरी उभी राहिली.लैंगिकतेतूनच स्त्रीचा वर्ग निश्चित झाला व लैंगिक सम्बंधाद्वारेच तिला उत्पादनाच्या साधनांशीही जोडून घेणे शक्य झाले.स्त्रियांच्या गुलामगिरीला या टप्प्यावर सुरुवात झालेली असली तरी एकाच वेळी सर्वच स्त्रिया गुलाम बनवल्या जात नाहीत.स्त्रियांचे दुय्यमत्व रूढ होऊनही अध्यत्मिक क्षेत्रामध्ये देवता म्हणून स्त्रियांना स्थान मिळालेले दिसते.मात्र सुरुवातीच्या टप्प्यावर पुनर्निर्मितीची शक्ती असणाऱ्या या मातृदेवता पुरुषदेवतेची पवित्र पत्नीदेवता म्हणून पितृसत्ताक व्यवस्था त्यांना पुढे आणते आणि याच टप्प्यावर स्त्रीची लैंगिकता प्रकट करणे पाप ठरते,पत्नी बनणे व माता असणे पवित्र व गरजेचे ठरते. या पुढच्या टप्प्यावर तत्त्वज्ञानातून स्त्रिया म्हणजे अपूर्ण मानव हा विचार पश्चिमी सभ्यतेमध्ये रूढ होऊन यातूनच पितृसत्ताक सिद्धांकन अधिक घट्ट व्हायला कारणीभूत ठरतो.[३]
निष्कर्ष
संपादनस्त्रियांच्या दुय्यमत्वाचे व गुलामगिरीचे पितृसत्ताक व्यवस्थेने इतके नैसर्गिकिकरण केले आहे की स्त्रिया या केवळ शोषितच आहेत हा सिद्धांत एकप्रकारे मान्यता पावतो व शोषणाच्या या जाणिवेतूनच स्त्रियांचा संघर्ष उभा करतात.प्रस्थापित अकादामिक क्षेत्रात प्रवेश मिळवण्याची धडपड करतात. परंतु जसे नाटकात पुरुषांच्या सोबतीने अभिनय केल्याने केवळ सहकलाकार इतकीच ओळख मिळते व नाटकाचे दिग्दर्शन,नेपथ्य,विषयाची मांडणी याची मालकी नाटकाच्या पुरुष मालकाकडेच राहते तसेच केवळ प्रस्थापित अकादामिक क्षेत्रात शिरकाव करून पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळू शकणार नाही. तर याकरिता स्त्रियांना आपल्या कर्तेपणाचा इतिहास शोधावा लागेल व पितृसत्ताक सिद्धांकनाप्रमाणे पुरुषांना ज्ञानउत्पादनातून न वगळता स्त्री व पुरुष दोहोंना केंद्र मानत इतिहासाचे नव्याने लेखन करावे लागेल.[४]
संदर्भ
संपादन- ^ Lerner, Gerda (1988-02-18). The Creation of Patriarchy: The Origins of Women's Subordination. Women and History, Volume 1. Oxford, New York: Oxford University Press. ISBN 9780195051858.
- ^ "Gerda Lerner | Austrian-born American writer and educator". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-04-04 रोजी पाहिले.
- ^ Bennett, Judith M. (1993). "Review of The Creation of Feminist Consciousness: From the Middle Ages to Eighteen- Seventy". The American Historical Review. 98 (4): 1193–1195. doi:10.2307/2166622.
- ^ Carpenter, K. M. N. (2003). "Fireweed: A Political Autobiography (review)". NWSA Journal (इंग्रजी भाषेत). 15 (3): 210–211. doi:10.1353/nwsa.2004.0004. ISSN 2151-7371.