पिंपळगाव रोठा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात वसलेले एक गाव आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच पठारावर वसले आहे. येथील मध्ययुगीन कोरठण खंडोबा मंदिर अनेक हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

  ?पिंपळगाव रोठा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ०६′ ३१.४५″ N, ७४° १६′ ४६.६६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ९५१ मी
जिल्हा अहमदनगर
तालुका/के पारनेर
कोड
पिन कोड

• 414303

कोरठण खंडोबा मंदिर

संपादन

कोरठण खंडोबाचे मंदिर मध्ययुगात बांधले गेले. मंदिराच्या प्रवेशद्वारापासच्या शिलालेखानुसार याचे बांधकाम शा.श. १४९१ (इ.स. १५६९ च्या सुमारास) साली पूर्ण झाले[]. इ.स. १९९७ मध्ये चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर (मार्गशीर्ष, शा.श. १९१९) गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार झाला.


पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेले कोरठण खंडोबा मंदिर राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. एकेकाळी बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण; पण सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतींवर बंदी घातल्यानंतर त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारेही हे गाव ठरले. घडीव मूर्ती नसल्याने दररोज देवाचे नवे रूप येथे पहायला मिळते. जुन्या अनिष्ट प्रथा बंद करून नव्या पद्धती स्वीकारणारे गाव म्हणून याकडे पाहावे लागेल. बाजारू स्वरूप न देता देवस्थानचा सुनियोजित विकास करून जुन्या-नव्याचा संगम साधणारे हे ठाणे तसे निराळेच म्हणावे लागले. मंदिराजवळ सापडलेल्या शिलालेखानुसार १४९१मध्ये त्याचे बांधकाम झाल्याचे आढळून येते. 'बिन टाक्याचा देव' म्हणून याला पूर्वी देवाचे 'कोरं ठाणं' आहे, असे म्हणत. त्यानुसार कोरठण खंडोबा नाव प्रसिद्धीला आले. स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांचे दर्शन होते. पुढे स्वयंभू बारा लिंगे आहेत. 'बिन टाक्याचा देव' हे येथील वैशिष्ट्य. त्यामुळे मूर्तीला दररोज स्थानानंतर वस्त्रे, अलंकार चढविले जातात. स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे चिटकविले जातात. त्यामुळे देवाची मूर्ती दररोज नव्या स्वरूपात पहायला मिळते. पगडी, शाल, फुलांचा हार या पारंपरिक सजावटीत मूर्ती चित्ताकर्षक बनते. आपल्याकडे अनादी काळापासून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये खंडोबा देवाला कुलदैवत मानले जाते. भगवान शंकराने मनी आणि मल्ल या दोघाचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाच अवतार धारण केला, तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी होता. खंडोबा अवतार दिवस म्हणूनही चंपाषष्ठीला महत्त्व आहे. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले हा दिवसही खंडोबाचे ठाणे असलेल्या ठिकाणी महत्त्वाचा. हे सर्व उत्सव कोरठणलाही होतात. समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच विस्तीर्ण पठारावरील विलोभनीय मंदिर भक्ती आणि निसर्गाचाही प्रयत्य देते. माळशेजपासून ७० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. माळशेजसारखेच निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात या भागात पाहायला मिळते. जिल्ह्यातील उंच देवस्थानांपैकी हे एक आहे. तेथून पुणे व नगर जिल्ह्यातील बऱ्याच भागाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. १९९७ला ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्या दिवशी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराला सुवर्ण कळस चढविण्यात आला. तो दिवस शुद्ध चंपाषष्ठीचा होता म्हणून दरवर्षी चंपाषष्ठीला मोठा आनंदोत्सव व धार्मिक पर्वणी साजरी होते. हा दिवस संतमेळा दिवस म्हणून साजरा केला जातो. आतापर्यंत अनेक मान्यवर संतांना या दिवशी देवस्थानतर्फे निमंत्रित करण्यात आले होते. संताची कीर्तने- प्रवचने आयोजित करून गावकऱ्यांसाठी धार्मिक विचारांची मेजवाणी दिली जाते. वार्षिक यात्रा, उत्सवासोबतच सोमवती अमावस्या, चंपाषष्ठी आणि दर महिन्याची पौर्णिमा या दिवशीही महाराष्ट्रसह, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांमधून लाखो भाविक येतात. मंदिर पुरातन असले, तरी मधल्या काळात उपेक्षित होते. १९८७ पर्यंत देवस्थान परिसरात मोठया प्रमाणात पशू बळीची प्रथा चालू होती. शेकडो बकऱ्या येथे कापल्या जात. स्थानिकांसोबतच बाहेरचे भाविकही येथे येऊन जत्रा साजरी करीत. त्यानंतर पिंपळगाव रोठा ग्रामस्थांनी त्याविरुद्ध मोहीम उघडून, हरिनाम संकीर्तन करून ती प्रथा बंद केली व देवस्थानची विकासकामे हाती घेतली. हा गावातील क्रांतिकारक निर्णय म्हणावा लागेल. तेव्हापासून बदलाची प्रक्रिया सुरू झाली आणि हे ठाणे नावारूपाला आले. एवढेच नव्हे, तर महिलांच्या पुढाकारातून पिंपळगावात दारूबंदी झाली. ग्रामस्थांच्या पुढाकारातून गावातील यात्रेतील तमाशा आणणे बंद झाले. यात्रेच्या दिवशी होणारा काठ्यांच्या मानाचा वादही मिटविण्यात यश आले. कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडी शर्यती बंद करून केवळ बैलगाड्यांचे देवदर्शन ही जुनी प्रथा सुरू ठेवण्यात आली. पूर्वी या ठिकाणच्या बैलांच्या शर्यतीसाठी मोठे बक्षीस नसतानाही चारशे ते साडेचारशे बैलगाड्या येत. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर आता शर्यत बंद झाली असली, तरी दर्शनासाठी लोक बैलगाडीतून येतात. घरातील माणसेच नव्हे, तर बैलांसह इतरही पाळीव प्राणी खंडोबाच्या दर्शनाला आणण्याची ही प्रथा आहे. दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी भाविकांची कोरठण खंडोबाला गर्दी होते. वर्षभरात सुमारे १५ लाख भाविक येथे भेट देत असल्याचा अंदाज आहे. भाविकांच्या देणगीतून विकासकामे सुरू आहेत. मात्र, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता देवस्थान ट्रस्टमार्फत व्यवस्था करण्यात मर्यादा येत आहेत. सरकारने हे देवस्थान 'क'वर्गातून 'ब'वर्ग दर्जाचे केले, तर जास्त निधी मिळून मोठी कामे करता येऊ शकतील, असे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी सांगितले. पिंपळगाव रोठा गाव आणि मंदिर यामध्ये सुमारे चार किलोमीटरचे अंतर आहे. गावापासून दूर असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारणे तसे कठीणच. यावर मात करीत देवस्थान ट्रस्टने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यातून २० कोटींची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पाच कोटींची कामे झाली. त्यामुळे तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या असून भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्थाही होऊ शकते. या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे येण्यासाठी आठ ते दहा रस्ते आहेत. त्यातील बहुतांश पुणे जिल्ह्यातून येणारे आहेत. पुरातन मंदिराचा केवळ जीर्णोद्धारच नव्हे, तर तेथील प्रथा-परंपरांनाही नवे आयाम देण्याचा प्रयत्न देवस्थान ट्रस्ट आणि गावकऱ्यांचे सुरू आहेत.

यात्रा

संपादन

प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला येथे ३ दिवसांचा यात्रा उत्सव असतो. पहिल्या दिवशी श्री खंडोबाचे मंगलस्नान व पूजेचा विधी असतो. दुसऱ्या दिवशी पारंपारिक बैल गाड्यांचा देव-दर्शनाचा कार्यक्रम असतो.तिसऱ्या दिवशी काठ्यांचा देव-दर्शनाचा कार्यक्रम असतो. येथे मानाच्या काठ्यांची मिरवणूक होऊन यातेची सांगता होते.[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "कोरठण खंडोबा मंदिराचा इतिहास". 2012-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "कोरठण खंडोबा यात्रा उत्सव". 2012-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन

येथील रोटेश्वर या ग्राम देवतेच्या नावावरून या गावाला रोठा हे नाव पडले .या ग्रामदेवतेची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते .