पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड (इंग्रजी: Egyptian Vulture; इजिप्शियन व्हल्चर) हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते.

पांढरे गिधाड
Egyptian vulture.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: ॲक्सिपिट्रिफॉर्मेस
कुळ: ॲक्सिपिट्रिडे
जातकुळी: निओफ्रॉन
जीव: एन. परक्नॉप्टेरस
शास्त्रीय नाव
एन. परक्नॉप्टेरस
लिनेयस, १७५८
आढळप्रदेश
आढळप्रदेश
निओफ्रॉन परक्नॉप्टेरस

उपप्रजातीसंपादन करा

पांढऱ्या गिधाडाच्या तीन उपप्रजाती आढळतात. एन. पी. परक्नॉप्टेरस या उपप्रजातीचा आढळप्रदेश सर्वात जास्त असून ते दक्षिण यूरोप, उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व, मध्य आशिया आणि उत्तर-पश्चिम भारतात आढळतात. त्यांची चोच गडद करड्या रंगाची असते. समशीतोष्ण प्रदेशात वीण करणारे पक्षी हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतात.

भारतीय उपखंडात एन. पी. गिंगिनिॲनस ही तिघांपैकी सर्वात लहान आकाराची प्रजात आढळते. हिची चोच पिवळी असते.

ओळखणसंपादन करा

याचा आकार सुमारे घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते. सगळे शरीर मळकट पांढऱ्या रंगाचे असते; डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात; चोच पिवळी; उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात; शेपटी पाचरीसारखी; पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक एकटे किंवा जोडप्याने राहतात.[२]

 
बंगलुरू येथील पांढरे गिधाड उडताना
 
Neophron percnopterus

निवासस्थानसंपादन करा

याला माणसाची मुळीच भीती वाटत नाही. मनुष्यवस्तीत किंवा तिच्या आसपास, विशेषतः जेथे केरकचरा व घाण साठलेली असेल अशा ठिकाणी, हे नेहमी भक्ष्य शोधीत असलेले दिसून येते. एक एक पाऊल टाकीत डुलत डुलत हे चालते. ही गिधाडे सर्व प्रकारची घाण आणि विष्ठा खातात. कधीकधी मेलेल्या जनावराचे कुजणारे मांसदेखील ही खातात. यांच्या घाणेरड्या सवयीमुळे बहुतेक लोक या पक्ष्यांकडे तिरस्कारानेच पाहतात, पण हा एक उपयुक्त पक्षी आहे यात शंका नाही.[२]

प्रजननसंपादन करा

यांची वीण फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत होते. घरटे काटक्या, चिंध्या, केस वगैरे पदार्थांचे बनविलेले असून ते खडकाच्या कपारीत, पडक्या इमारतीत, पडीक तटबंदीतील कोनाड्यात वगैरे ठिकाणी असते; क्वचित वडासारख्या मोठ्या झाडावरही असते. मादी दर खेपेस दोन अंडी घालते; ती पांढरी किंवा फिक्कट विटकरी असून त्यांवर तांबूस तपकिरी किंवा काळे डाग असतात. घरटे तयार करणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना भरविणे ही कामे दोघेही करतात.[२]

धोके आणि संवर्धनसंपादन करा

या गिधाडांचे नैसर्गिक भक्षक नाहीत. पण विजेच्या तारांशी होणाऱ्या टक्करी, शिकार, हेतुपुरस्सर केलेली विषबाधा, जनावरांच्या मृत शरीरातील बंदुकीची गोळी खाल्याने होणारा शिश्याचा संचय आणि कीटकनाशकांचा संचय या सगळ्या मानवी कारणांचा गिधाडांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो. घरट्यातील लहान पक्ष्यांना काही वेळा सोनेरी गरुड, गरुड घुबड आणि लाल कोल्हे पळवून घेऊन जातात. केवळ क्वचितच प्रौढ पक्षी भक्षकांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात.

जवळपास सगळीकडेच पांढऱ्या गिधाडांच्या संख्येत घट झाली आहे. युरोप आणि मध्य पूर्वच्या बऱ्याचश्या भागात यांची संख्या २००१ साली १९८० च्या संख्येच्या तुलनेत आर्धी झाली होती. भारतामध्ये यांच्या संख्येतील घट आणखी जास्त होती. १९९९ पासून या गिधाडांच्या संख्येत दर वर्षी ३५% घट होत आहे.[३] १९६७-७०च्या काळात दिल्लीच्या आसपासच्या भागात पांढऱ्या गिधाडांची संख्या १२,०००-१५,००० होती आणि सरासरी घनता प्रति १० चौ.किमी मध्ये ५ जोड्या एवढी होती. गिधाडांच्या मृत्यूंचा डायक्लोफिनॅक या जनावरांच्या औषधाच्या वापराशी संबंध जोडला गेला आहे.

संदर्भसंपादन करा

  1. ^ बर्डलाइफ इंटरनॅशनल (२०१६). "निओफ्रॉन परक्नॉप्टेरस". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर. २१-०४-२०१७ रोजी पाहिले. 
  2. a b c कर्वे, ज. नी. "गिधाड". मराठी विश्वकोश. खंड ५ (मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ). 
  3. ^ Cuthbert, R.; Green, R.E.; Ranade, S.; Saravanan, S.; Pain, D.J.; Prakash, V.; Cunningham, A.A. (2006). "Rapid population declines of Egyptian vulture (Neophron percnopterus) and red-headed vulture (Sarcogyps calvus) in India". Animal Conservation 9 (3): 349–354. डी.ओ.आय.:10.1111/j.1469-1795.2006.00041.x.