संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते.

पसायदान - ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता करता, शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळ्या) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरीरूपी वाग् यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात .........

जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||

ज्या व्यक्ती खळ (वाईट प्रवृत्तीच्या) आहेत त्यांच्यातील खलत्व (वाईट प्रवृत्ती) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत ! { जेथे भगवंताने "विनाशायच दुष्कृताम्" ( दुष्टांचा नाश करण्यासाठी) मी जन्म घेतो असे म्हंटले, त्याच भगवंताकडे ज्ञानेश्वरांनी प्रेमबुद्धीने असा "प्रसाद" मागितला} पसायदानामध्ये सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी व मनातील दुष्ट भावनांचा नाश व्हावा अशी विनंती ज्ञानेश्वर महाराज करतात. Archived 2016-08-25 at the Wayback Machine.

दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||३||

वेदांनी गायलेल्या "तमसो मा सद्गमय |" ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे, नदीचा प्रवाहित राहणे, त्याच प्रमाणे मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रत्येकाच्या जीवनात आला तर त्या धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल. ह्याचा परिणाम असा होईल की, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल, कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक असेल तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि येथे तर "माउलींनी" 'प्राणिजात' असे बोलून जगातील यच्चयावत प्राणिमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे !

निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, एका भक्ताने हात जोडून प्रत्यक्ष जगन्नीयंत्याकडे केलेली विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान. मनात व्यक्तींचीतही आपपरभाव न ठेवता शुद्ध आणि निरागसतेने परमेश्वराकडे विश्व कल्याणासाठी केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान. आपले इवलेसे हात पसरून त्या ओंजळीत परमेश्वराकडे असं देणं मागणं की ज्यामुळे अखिल विश्वात शांती, समृद्धी, ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नंदावे, यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान.

पसायदान व प्रमाण मराठीतील अर्थ

संपादन

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

मराठी अर्थ

संपादन

आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. ॥ १ ॥
दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांना सत्कर्मे करण्या मध्ये स्वारस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. ॥ २ ॥
पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. ॥ ३ ॥
सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. ॥ ४ ॥
जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत, ॥ ५ ॥
जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. ॥ ६ ॥
तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. ॥ ७ ॥
हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. ॥८ ॥
यावर विश्वेश्वर गूरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ॥ ९ ॥

पसायदानावरील भाष्य

संपादन

१.सारांशाने एखाद्या ग्रंथातील विचार जसा समजतो तसा ज्ञानेश्वरीतील विचार सारांशरूपाने "पसायदानात" मांडलेला आहे. पसायदान ही प्रार्थना आहे. या प्रार्थनेचे वैशिष्ट्य हे की ती धर्म, पंथ, काल या सर्वांच्या पलीकडे आहे. सर्व आणि सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली ती प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वर यांनी चराचर व्यापलेल्या परमेश्वराकडे मागणे मागितले आहे. येथे कोणाही विशिष्ट देवतेचे नाव घेतलेले नाही. कोणत्या विशिष्ट पंथाचाही निर्देश केलेला नाही. हा ईश्वर "विश्वात्मक" आहे.ज्ञानेश्वरांची ईश्वरासंबंधी कल्पना या प्रार्थनेत साररूपाने आलेली आहे. मानवजातीच्या व्यवहारातील सर्व अनिष्टे ज्या प्रवृत्तीतून उत्पन्न होतात ते खलत्व. माणसांची ही खलवृत्ती व्यक्तिगत व सांघिक स्वरूपात कार्य करीत असते. सर्वत्र मंगलाची स्थापना व्हायची असेल तर हे खलत्व नष्ट व्हायला हवे. ज्ञानेश्वर मानतात की ही खलवृत्ती निसर्गदत्त नसून परिस्थितजन्य आहे. माणसाची वृत्ती ही एक सचेतन शक्ती आहे. तिला योग्य कार्य मिळायला हवे.त् यासाठी खलत्व नाहीसे व्हायला हवे. मैत्र म्हणजे निःस्वार्थी, सर्वव्यापी प्रेम. हेच मानवी जीवनाचे, संस्कृतीचे आधारभूत सूत्र होईल. इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हाच संदेश जगाला दिला आहे, आणि प्रसंगी त्यासाठी प्राणार्पणासह सर्व प्रकारचे शासनही स्वीकारलेले आहे.

दुष्कर्म नाहीसे होऊन सर्व विश्व आपापल्या कर्तव्याच्या जाणिवेने कार्यरत असणे अपेक्षित आहे. इच्छा कोणतीही असो, ऐहिक वा आध्यात्मिक, व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनात त्यामुळे संघर्ष होता कामा नयेत. असे सज्जन सर्वांचे आप्त होवोत आणि विश्वात्मकाची उपासना करोत असा आशय यामध्ये आहे.[]

२.ज्ञानेश्वरांचा भाव हृदय परिवर्तनावर दिसतो. मानवी मनाला आंतरिक आनंद लाभावा, सर्वांना अनन्य साधारण शांती मिळावी यासाठी ही प्रार्थना आहे. देवाला येथे "विश्वात्मक" असे विशेषण लावले आहे. जगाला परमवस्तूवाचून वेगळे अस्तित्त्व नाही असे दर्शन ज्ञानेश्वरीत अखंडपणे आलेले आहे. यामध्ये गुरू हाच परमेश्वर असाही एक विचार दिसून येतो. पापी, दुराचारी याऐवजी यामध्ये "खल" हा प्रवृत्तिवाचक शब्द वापरलेला दिसतो. ज्याला आत्मोन्नती साधायची आहे त्याने आपल्यातील वाईट वृत्तींचा बीमोड करायला हवा. सत्संगतीने स्वभावदोष दूर होऊ शकतात. व्यक्तीच्या विकृतींवरील सोपा आणि सहज उपचार सुसंस्कारांचा आहे. तयां सत्कर्मीं रती वाढो म्हणताना त्यात कर्माविषयीचा शास्त्र-चर्चित अर्थ सूचित करायचा आहे. वैयक्तिक स्तरावर सत्कर्माचे प्रेम आणि सामाजिक स्तरावर सर्वांबद्दल प्रीती वाटली पाहिजे. हे घडले तर व्यक्ती आणि समाज यांचे ऐक्य होण्यास उपयोगी ठरेल.[]

३.दुरिताचें तिमिर जावो |विश्व स्वधर्मसूर्यें पाहो |जो जें वांछील तो तें लाहो | प्राणिजात|
दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशात पाहावे, मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.

पाप म्हणजे काय?
सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. `रज-तम'च्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात.[]

परभाषांतील पसायदानाची भाषांतरे[]

संपादन
  • उर्दू अब्दुस सत्तार दळवी []

संदर्भ

संपादन
  1. ^ वि.वा. शिरवाडकर.,"पसायदान"(६९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ), स्मरणिका ,१९९६
  2. ^ डॉ. अशोक कामत,पसायदानाची अपूर्वाई, गोकुळ मासिक प्रकाशन,१९९४
  3. ^ https://mazespandan.wordpress.com/2015/07/08/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/
  4. ^ KHANDARKAR, SHRI SHANKAR MAHARAJ. (2018). SANT JNANESWARA'S PASAYADANA : divine blessings. [Place of publication not identified],: MOTILAL BANARSIDASS. ISBN 8120842081. OCLC 1047554438.CS1 maint: extra punctuation (link)
  5. ^ Google's cache of http://chavata1.blogspot.com/. It is a snapshot of the page as it appeared on 8 Feb 2011 17:12:32 GMT.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिस्रोत
पसायदान हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.