ऑपरेशन ओव्हरलॉर्ड

(नॉर्मंडीची लढाई या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑपरेशन ओव्हरलॉर्ड तथा नॉर्मंडीची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची निर्णायक मोहीम होती. ६ जून, इ.स. १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांनी केलेल्या नॉर्मंडीवरील चढाईने सुरू झालेली ही मोहीम ३० जून रोजी जर्मन सैन्याने सीन नदीपल्याड माघार घेतल्यावर संपली. या मोहीमेच्या अंतर्गत दोस्त राष्ट्रांनी युरोपमध्ये आपले सैन्य कायमचे घुसवले व त्याद्वारे येथून पुढे जर्मनीचा पूर्ण पाडाव केला.

६ जूनच्या पहाटे दोस्त राष्ट्रांच्या १,२०० विमानांनी हजारो सैनिक फ्रांसमध्ये उतरवले व सकाळी ५,००० नौकां नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर चालून गेल्या. एका दिवसात १,६०,००० सैनिक नॉर्मंडीत उतरले व किनाऱ्यावरील अनेक ठिकाणची तटबंदी त्यांनी उद्ध्वस्त केली. अमेरिकन सैन्य युटा बीच, ओमाहा बीच, ब्रिटिश सैन्य स्वोर्ड बीच, गोल्ड बीच तर कॅनडाचे सैन्य जुनो बीच या पुळणींवर उतरले. सुरुवातीच्या या हल्ल्यात यानंतर दोस्तांनी ऑगस्टअखेरपर्यंत नॉर्मंडीतून २०,००,००० सैनिक युरोपमध्ये घुसवले.

ही मोहीम चालविण्याचा निर्णय दोस्त राष्ट्रांनी मे १९४३मध्ये झालेल्या ट्रायडेंट कॉन्फरन्समध्ये घेतला होता. त्याच वेळी अमेरिकेच्या ड्वाइट डी. आयझेनहोवर यांची मोहीमेचे सरसेनापती तर युनायटेड किंग्डमच्या बर्नार्ड मॉंटगोमरी यांची नेमणूक आक्रमक सैन्याच्या सेनापतीपदी करण्यात आली.

ही मोहीम फत्ते करण्यासाठी दोस्तांनी अनेक नवीन तंत्रज्ञाने विकसित केली. जर्मनीची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन बॉडीगार्ड ही मोहीम चालवली. याने जर्मनीला युरोपवरील आक्रमणाचे ठिकाण व काळवेळ बिलकुल कळले नाही.