खनिज तेल

(नैसर्गिक खनिज तेल या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रूड तेल हे जमीनीच्या पोटातून काढले जाणारे खनिज तेल आहे. याच्या शुद्धीकरणा नंतर पेट्रोल, डीझेल व इतर उत्पादने मिळतात.

टेक्सास प्रांतात लुब्बॉक येथे एका विहिरीतून तेल काढले जातांना
 
तेलाचा एक नमुना

जमिनीखालच्या गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय. लाखो वर्षांपूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्याच्यावर माती व वाळूचा थर तयार झाले, जास्त दाब व उष्णता यामुळे या मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतरण झाले. खनिज तेल हे भूगर्भातील विहिरीद्वारे काढले जाते. खनिज तेल हे प्रामुख्याने पंकाश्म, शेल, वाळुकाश्म व चुन खडक यामध्ये भूभागामध्ये सुमारे १००० ते ३००० मीटर खोलीवर सापडते. खनिज तेल हे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल म्हणून ओळखले जाते ते हिरवट, तपकिरी रंगाचे असते. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगाने मिश्रण असून त्यामध्ये आँक्सीजन, नायट्रोजन तसेच अनेक गंधकाची संयुगेही असतात. तेल विहिरीच्या माध्यमातून पेट्रोलियमचे उत्खनन करून, प्रभाजी उर्ध्वपतनाने त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. पेट्रोलियम पासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक बनवले जातात, त्यांचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्य आणि कृत्रिम धागे तयार करण्यासाठी देखील केला जातो.

खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात.त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पेट्रोल), केरोसीन (रॉकेल), जळणासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळवितात. म्हणून नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल(क्रूड ऑइल) असेही म्हणतात. पेट्रोल हा शब्द भारतात व इतर काही देशांत सामान्यपणे मोटारगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिनासाठी वापरतात. हे पेट्रोल खनिज तेलाचा केवळ एक भाग असते. पेट्रोलियम ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘पेट्रा’ म्हणजे खडक आणि ‘ओलियम’ म्हणजे तेल या शब्दांपासून तयार झालेली आहे. म्हणजे पेट्रोलियमाचा शब्दशः अर्थ शिला–तेल असा आहे.

निरनिराळ्या तेलक्षेत्रांतील खनिज तेलांचे रासायनिक संघटन अगदी सारखेच नसते, पण ती मुख्यतः हायड्रोकार्बनी संयुगांच्या मिश्रणांची बनलेली असतात. खडकात आढळणारी हायड्रोकार्बने कधीकधी वायूच्या, तर कधी अतिशय श्यान (दाट) द्रवाच्या किंवा कधीकधी घन स्वरूपात असतात. हायड्रोकार्बनांची घनस्थिती म्हणजे बिट्युमेन व अस्फाल्ट, द्रवस्थिती म्हणजे तेल व वायुस्थिती म्हणजे नैसर्गिक वायू होय. कित्येक ठिकाणी तेलाबरोबर वायुरूप वा घनरूप हायड्रोकार्बने कमीअधिक प्रमाणात आढळतात. म्हणून कधीकधी त्यांचाही समावेश खनिज तेल या संज्ञेत केला जातो.

चित्रदालन

संपादन
 
क्रूड तेलात ऑक्टेन आणि कर्बोदक आढळते.
 
 
 
 
 
तेल सांडल्या नंतर स्वच्छता करण्याचा प्रयत्न करणारे स्वयंसेवक

 

बाह्य दुवे

संपादन